आर्थिक वर्ष संपल्यानंतर तीन ते चार महिन्यात कंपन्यांकडून होणाऱ्या लाभांशाच्या घोषणेमुळे शेअर बाजारात जणू काही मान्सूनचे आगमन
आर्थिक वर्ष संपल्यानंतर तीन ते चार महिन्यात कंपन्यांकडून होणाऱ्या लाभांशाच्या घोषणेमुळे शेअर बाजारात जणू काही मान्सूनचे आगमन होते. एखाद्या कंपनीने लाभांशाची घोषणा केली, की बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण होते आणि तो शेअर चर्चेत येतो. नव्या गुंतवणूकदाराला या सर्व गोष्टींचे कुतूहल असते.
लाभांशाविषयी महत्त्वाचे मुद्दे
शेअरवरील लाभांश हा कायम शेअरच्या दर्शनी मूल्यावर (फेस व्हॅल्यू) दिला जातो. उदाहरणार्थ, सध्याचा बाजारभाव २००० रुपये असलेल्या शेअरवर (ज्याचे दर्शनी मूल्य १० रुपये आहे), ३० टक्के लाभांश जाहीर झाला,
तर मिळणाऱ्या लाभांशाची रक्कम ही दहा रुपयांच्या ३० टक्के म्हणजे तीन रुपये असते. गुंतवणूकदाराने तो शेअर २००० रुपयांना खरेदी केला असेल, तर मिळणारा तीन रुपये लाभांश हा त्याच्या गुंतवणुकीच्या फक्त ०.१५ टक्का आहे.
शेअर बाजाराच्या तांत्रिक भाषेत याला ‘डिव्हिडंड यिल्ड’ म्हणतात. ‘डिव्हिडंड यिल्ड’ जेवढा, अधिक तेवढा संबधित शेअर लाभांशाच्या दृष्टीने जास्त फायदेशीर समजावा.
शेअरवर मिळणारा लाभांश हा एका ठराविक दिवशी (रेकॉर्ड डेट) गुंतवणूकदारांना मिळतो. त्या दिवशी ज्या गुंतवणूकदारांकडे तो शेअर असेल, त्यांना त्या लाभांशाचा लाभ मिळतो. मात्र, लाभांश मिळाल्यानंतर त्या शेअरचा बाजारभाव लाभांशाच्या रकमेएवढा कमी होतो.
उदाहरणार्थ, आपण पाहात असलेल्या वरील उदाहरणात, २००० रुपये बाजारभाव असलेल्या या शेअरवर तीन रुपये लाभांश मिळणार आहे. हा लाभांश मिळाल्यानंतर या शेअरचा बाजारभाव तीन रुपयांनी आपोआप कमी होईल.
या पद्धतीमुळे शेअर बाजारात फक्त अल्पकाळ येऊन लाभांशाचा फायदा घेऊन लगेच बाहेर पडण्याचा एखादा गुंतवणूकदार विचार करीत असेल, तर ते शक्य होत नाही. त्यासाठी त्याला त्या शेअरचा बाजारभाव थोडा तरी वर जाण्याची वाट पाहावी लागते.
शेअर बाजाराच्या तांत्रिक भाषेत लाभांश मिळण्यापूर्वीच्या बाजारभावाला ‘कम डिव्हिडंड प्राइस’ म्हणतात, तर लाभांश मिळाल्यानंतरच्या बाजारभावाला ‘एक्स डिव्हिडंड प्राइस’ म्हणतात.
गुंतवणूकदाराला मिळणारी लाभांशाची रक्कम पाच हजार रुपयांपेक्षा अधिक असेल, तर त्यावर दहा टक्के दराने आणि गुंतवणूकदाराने ‘पॅन’ दिला नसेल, तर वीस टक्के दराने ‘टीडीएस’ कापला जातो.
आपल्या गुंतवणुकीचे योग्य प्रकारे नियोजन करून आपण लाभांशाच्या स्वरूपात चांगला फायदा करून घेऊ शकतो.
कंपनी - लाभांशाची टक्केवारी - रेकॉर्ड डेट
कल्पतरू प्रोजेक्ट्स - ३५० - ६ जुलै
बायोकॉन - ३० - ७ जुलै
अंबुजा सिमेंट -१२५ - ७ जुलै
एल अँड टी टेक्नॉलॉजी - १५०० - ७ जुलै
पिकॉस हॉटेल्स -३० टक्के - ११ जुलै
त्यासाठी चांगले ‘डिव्हिडंड यिल्ड’ असलेले शेअर शोधून काढावेत. तसेच, जेव्हा शेअर बाजार कोसळतो, तेव्हा नियमितपणे लाभांश देणाऱ्या कंपन्यांचे शेअर खरेदी केल्यास भविष्यात मिळणारा ‘डिव्हिडंड यिल्ड’ चांगला मिळतो.
चांगल्या कंपन्यांचे शेअर नियमितपणे खरेदी करीत राहिल्यास मिळणारी लाभांशाची रक्कम मोठी असू शकते. कंपनीने बोनस शेअर दिल्यास भविष्यात त्या शेअरवरदेखील लाभांश मिळतो. दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून गुंतवणूक केल्यास लाभांशाचा खरा लाभ होतो.
(लेखक इंदिरा ग्लोबल बिझनेस स्कूल येथे संचालक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.