फिएम इंडस्ट्रीज (शुक्रवारचा बंद भाव : रु. १,८५०)

कंपनीचा प्रमुख व्यवसाय वाहन उद्योगातील दुचाकी विभागातून येतो.
fiem industries ltd share price investment share market marathi news
fiem industries ltd share price investment share market marathi newssakal
Updated on

fiem industries ltd : फि एम इंडस्ट्रीज ही कंपनी देशातील वाहनांसाठी प्रकाशयंत्रणा, दिशादर्शक यंत्रणा आणि रिअर व्ह्यू मिरर आदी भागांचे उत्पादन करणाऱ्या आघाडीच्या उत्पादकांपैकी एक आहे. ही कंपनी प्रामुख्याने दुचाकींसाठी प्रकाशयंत्रणा, आरसे आणि प्लॅस्टिक-मोल्डेड भागांचा पुरवठा करते.

कंपनीचा प्रमुख व्यवसाय वाहन उद्योगातील दुचाकी विभागातून येतो. या कंपनीने देशात सर्वप्रथम दुचाकींसाठी ‘एलइडी’ दिवे सादर केले. सध्या या बाजारपेठेतील ३० टक्क्यांपेक्षा अधिक हिस्सा या कंपनीकडे आहे.

इलेक्ट्रिक वाहनांमधील प्रकाशयंत्रणा, दिवे यांचा विचार करता, या क्षेत्रातील प्रमुख ग्राहकांसाठी ही कंपनी मुख्य पुरवठादार आहे. यामाहा, होंडा, टीव्हीएस, रॉयल एनफिल्ड, ओला, हार्ले डेव्हिडसन आदी अनेक मोठ्या कंपन्या फिएम इंडस्ट्रीजच्या ग्राहक आहेत.

जागतिक उत्पादकांबरोबर धोरणात्मक तांत्रिक संबंध प्रस्थापित केल्याने कंपनी प्रगत आणि किफायतशीर उत्पादने प्रदान करत आहे. भारतीय आणि जागतिक मानकांनुसार एलईडी आणि लाइट असेंब्लीच्या प्रगत तंत्रज्ञान विकासासाठी कंपनीकडे तीन जागतिक दर्जाची संशोधन, विकास आणि डिझाइन केंद्रे आहेत.

गोगोरो इंडियासोबतच्या सामंजस्य करारामुळे कंपनीला उत्पादनात वैविध्य; तसेच इलेक्ट्रिक वाहनांसाठी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात प्रवेश करणे शक्य आहे. कंपनीने नवे ग्राहक जोडले असून, कर्जही लक्षणीयरीत्या कमी केले आहे. ‘हब असेंब्ली’सारख्या नव्या उत्पादनांवर कंपनी काम करत आहे. कंपनीच्या उत्पादनसुविधा मुख्य वाहन उत्पादकांच्या प्रकल्पाजवळ आहेत, त्यामुळे दळणवळण खर्चात बचत होते.

सध्या जाहीर झालेल्या निकालानुसार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा महसूल ४७५ कोटी रुपये झाला आहे, तर निव्वळ नफा ३६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनी धंद्यात गुंतविलेल्या भांडवलावर सातत्याने वार्षिक २० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवत आहे.

आगामी काळातील ‘ईव्ही’ अर्थात विद्युत वाहनांचा वाढता कल आणि वाहन क्षेत्रातील ‘एलईडी’चा वापर; तसेच दिग्गज ग्राहकवर्ग लक्षात घेता ‘फिएम इंडस्ट्रीज’च्या शेअरमध्ये दीर्घावधीच्या दृष्टीने मर्यादित धोका स्वीकारून गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकेल.

(या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.