- विक्रम अवसरीकर
आजकाल जे काही आपल्याला शेअर बाजारात बघायला मिळत आहे, त्याचा अर्थ लावणे भल्याभल्यांना जमत नसेल; पण एक गोष्ट नक्की, की शेअर बाजारात आज पैसे लावले, की उद्या त्याचा चांगला परतावा मिळेलच, अशी खात्री सर्वसामान्य माणसाला वाटू लागली आहे. त्यामुळेच म्युच्युअल फंडात वाढलेले गुंतवणूकदार आणि जबरदस्त वेगाने वाढत असलेली डी-मॅट खाती दिसत आहेत.
यांतील किती गुंतवणूकदार सर्व गोष्टी नीट समजावून घेऊन गुंतवणूक करत आहेत आणि किती कोणाच्या सांगण्यावरून? किती लोक आरंभशूर आहेत आणि किती जण खरेच गांभीर्याने याकडे बघत आहेत? हे सांगणे कठीण आहे.
तेव्हा त्याची चिंता न करता, ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत, त्या गोष्टी आपण करू. आपण एखादा शेअर घेतला, तर तो कधी विकायचा, कधी आणखी घ्यायचे, फायदा कधी काढून घ्यायचा आदी गोष्टींत स्वतःलाच लक्ष घालावे लागेल.
ते कधी शक्य असते-नसते, ते ज्याच्या त्याच्यावर आहे. बाजारात गुंतवणूक करायची आहे; पण तितका धोकाही पत्करायचा नाही, अशा लोकांसाठी इंडेक्स फंडातील गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध आहे.
एखाद्या नातेवाइकाच्या घरी एखादे फळ भेट घेऊन जायच्या ऐवजी फळांची करंडीच घेऊन गेलो, तर त्यांना किती आनंद होईल? इंडेक्स फंड किंवा ‘ईटीएफ’ नेमके हेच करतात. इंडेक्स फंड किंवा ‘ईटीएफ’मध्ये त्या-त्या इंडेक्समधील शेअर त्या-त्या टक्केवारीनेच घेतलेले असतात.
इंडेक्स म्हटले, की आपल्याला फक्त ‘निफ्टी’ किंवा ‘सेन्सेक्स’ इतकेच वाटते. मात्र फार्मा, टेक्नॉलॉजी, कमोडिटी, एफएमसीजी, ऑटो, कन्झप्शन, नॅस्डॅक, हँगसेंग असे अनेक इंडेक्स आहेत. यांमध्ये गुंतवणूक केली, तर आपल्याला सर्व फळांची करंडीच मिळते.
म्युच्युअल फंड वा ‘ईटीएफ’ हे सर्व ‘इंडेक्स’मध्ये आपापली करंडी घेऊन आपल्याकडे येतील. त्यामुळे उसळत्या बाजारात कोणत्या तरी एका शेअरमध्ये किंवा वेगवेगळ्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी, सर्वच्या सर्व फळबागेत आपण गुंतवणूक केली, असे या माध्यमाबद्दल म्हणता येईल.
हे फंड किंवा ‘ईटीएफ’ हे त्या-त्या इंडेक्समधील शेअरमध्ये निष्क्रिय गुंतवणूकदार असतात. ते स्वतः कधीही उड्या मारायला जात नाहीत, त्यामुळे संपूर्ण बाजाराचा जसा कौल असेल, तशाच प्रकारचा परतावा यातून मिळेल. ‘ईटीएफ’मधील गुंतवणूक ही फंडापेक्षा स्वस्त पडते. त्यामुळे उसळत्या बाजारात काही रक्कम इंडेक्स फंड किंवा ‘ईटीएफ’मध्ये नक्की ठेवावी.
योजनांची काही उदाहरणे
यूटीआय निफ्टी ५० फंड, निप्पॉन निफ्टी बीज, एचडीएफसी सेन्सेक्स प्लस, आयसीआयसीआय प्रु. हेल्थ केअर ईटीएफ, मोतीलाल ओसवाल नॅस्डॅक १०० ईटीएफ आदी. ही केवळ उदाहरणे आहेत; गुंतवणूक सल्ला नव्हे. त्यासाठी स्वतः अभ्यास करावा, तज्ज्ञांची मदत घ्यावी आणि मगच गुंतवणुकीबाबत निर्णय घ्यायला हवा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.