पुणे : प्रसिद्ध सराफी पेढी पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सच्या (पीएनजी ज्वेलर्स) ‘आयपीओ’साठी आज बोली लावण्याच्या अंतिम दिवशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुमारे ६२.५३ पट बोली लागली आहे. कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून ३३० कोटी रुपये उभे केले असून, अँकर गुंतवणूकदारांनी नऊ सप्टेंबर रोजी बोली लावली होती.
मंगळवारी (ता. १०) हा आयपीओ खुला झाला होता. या आयपीओमध्ये ८५० कोटी रुपयांपर्यंतचे नवे शेअर आणि ‘ऑफर फॉर सेल’अंतर्गत एसव्हीजी बिझनेस ट्रस्टच्या प्रवर्तकांच्या २५० कोटी रुपयांच्या शेअरचा समावेश आहे. एकूण ११०० कोटी रुपयांच्या या ‘आयपीओ’साठी प्रतिशेअर ४५६ ते ४८० रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यात आला होता.