‘द अनयुज्वल बिलेनिअर्स’, ‘कॉफी कॅन इन्व्हेस्टिंग’ अशा गुंतवणूकविषयक प्रसिद्ध पुस्तकांचे लेखक सौरभ मुखर्जी यांना आजच्या भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल कमालीचा अभिमान आहे.
- सौरभ मुखर्जी
‘द अनयुज्वल बिलेनिअर्स’, ‘कॉफी कॅन इन्व्हेस्टिंग’ अशा गुंतवणूकविषयक प्रसिद्ध पुस्तकांचे लेखक सौरभ मुखर्जी यांना आजच्या भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल कमालीचा अभिमान आहे. भारतीय शेअर बाजारातील यशस्वी कंपन्यांच्या मानसिकतेचा ते शोध घेत असतात. त्यातून समोर येणारी सूत्रे ते भारतीय गुंतवणूकदारांसमोर मांडतात. मार्सेलस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर या कंपनीचे ते संस्थापक आणि मुख्य गुंतवणूक अधिकारी आहेत. त्यांच्याशी झालेल्या संवादाचा सारांशः
जगभरातील घडामोडींचा परिणाम
किरकोळ गुंतवणूकदाराला जगातील घटना-घडामोडींचा सतत अभ्यास करत राहण्याची काही आवश्यकता नाही. अनेकदा गुंतवणूकदार अनावश्यकपणे अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँकेच्या निर्णयांकडे डोळे लावून बसतात. एक सूत्र लक्षात ठेवा. अमेरिकेत फेडरल रिझर्व्ह बँक दर काही वर्षांनी पैसे स्वस्त करते. अमेरिका जगातील निम्मे तेल वापरणारा देश आहे.
फेडरल रिझर्व्ह बँकेने पैसा स्वस्त केला, की तेल स्वस्त होते. भारताला फायदा होतो. १९८३ ते १९८७, २००३ ते २००७, २००८ ते २०१०, २०२० ते २०२३ या काळातील परिस्थिती पाहा. ज्या ज्या वेळी अमेरिकेने पैसा स्वस्त केला, त्या त्या वेळी भारताला लाभ झाल्याचा इतिहास आहे. अमेरिकेतील गुंतवणूकदार भारतात येऊ लागतात आणि भारताची अर्थव्यवस्था वाढू लागते.
चीनमधील गुंतवणूक
अमेरिकेची चीनमधील गुंतवणूक दरवर्षी ३.५ ट्रिलियन डॉलर इतकी प्रचंड आहे. त्यापैकी फक्त अर्धा ट्रिलियन गुंतवणूक भारतात आली, तर भारतीय शेअर बाजाराचा निर्देशांक साठ हजारांवर गेला. अमेरिकी सरकारच्या धोरणानुसार चीनमधील गुंतवणूक टप्प्याटप्प्याने काढून घेतली जाईल. ती गुंतवणूक भारतात होण्याची सर्वाधिक शक्यता आहे.
कारण, चीनच्या तुलनेत भारतीय बाजाराने उत्तम परतावा दिल्याचा नजिकचा इतिहास आहे. त्यामुळे, पुढच्या पाच वर्षांत भारतीय शेअर बाजारात परकीय गुंतवणूक वाढत जाईल. आता, कल्पना करा चीनमधील सर्व ३.५ ट्रिलियन डॉलर गुंतवणूक दरवर्षी भारतात येऊ लागल्यास आजचा साठ हजारांवरचा निर्देशांक कुठे जाईल!
भारतीय यशकथा
भारतीय शेअर बाजारात अशा कंपन्या आहेत, ज्यांनी दहा-पंधरा-वीस वर्षांत शेकडो पट परतावा दिला आहे. परिणामी, केलेल्या गुंतवणुकीत शेकडो पट वाढ झाली आहे. विशेषतः ज्या कंपन्यांच्या सेवा अथवा उत्पादनांची मक्तेदारी आहे, अशा कंपन्यांबाबतीतच्या या यशकथेत एक साम्य आहे. या कंपन्यांचे प्रमुख अत्यंत सामान्य भारतीय आहेत.
ते कधीही झगमगाटात येत नाहीत. ''मी सामान्य माणूस आहे,'' अशीच त्यांची वर्तणूक असते. जे कमावतात, ते आरडाओरडा करून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न कधीही करत नाहीत. ते प्रसिद्धीच्या कोलाहलापासून दूर राहतात.
या साध्या माणसांनी चालवलेल्या कंपन्या अत्यंत सक्षमपणे बाजारपेठेवर नियंत्रण ठेवून आहेत. बजाज फायनान्स, फाईन ऑरगॅनिक्स, मोल्टेक पॅकेजिंग, एचडीएफसी बँक अशी कित्येक उदाहरणे भारतात आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या साध्या माणसांनी प्रामाणिकपणे आणि कठोर परीश्रमाने भारतीय शेअर बाजार वाढविला आहे.
गुंतवणुकीसाठी क्षेत्राची निवड
कोणत्या क्षेत्रात (सेक्टर) गुंतवणूक करावी, याची निवड करतानाही ''बाहुबली'' निकष ठेवावा. एखादे क्षेत्र वाढते आहे, म्हणून गुंतवणूक केली तर अपेक्षित परतावा मिळेलच असे नाही. उदा. विमान वाहतूक क्षेत्र भारतात सातत्याने वाढते आहे.
तथापि, या क्षेत्रात मक्तेदारी निर्माण करणे कोणत्याही कंपनीसाठी अत्यंत कठीण आहे. सर्व कंपन्यांना सारखेच नियम आहेत, त्या कंपन्या एकाच विमानतळाचा वापर करत आहेत, विमानतळावरील सेवा-सुविधा सर्वांनाच समान आहेत. तिकीटदरही जवळपास समान आहेत. अशा परिस्थितीत ज्या कंपन्या तिकीट दर कमी करतील, त्याच्याकडे प्रवासी वाढू शकतील. तिकीट दर कमी करणे म्हणजे नफ्याचे प्रमाण कमी करणे.
मग, मक्तेदारी निर्माण होण्याची शक्यताच मावळते. अशीच परिस्थित दूरसंचार क्षेत्रात आहे. तिथेही कोणत्याही कंपनीच्या मक्तेदारीची शक्यता नाही. त्यामुळे, क्षेत्राची निवड करताना स्पर्धा, स्पर्धेचे नियम, नफ्याचे प्रमाण यांचा विचार आवश्यक आहे. मक्तेदारी असलेल्या कंपनीत गुंतवणूक केल्यास क्षेत्र कोणतेही असो परताव्याची शक्यता वाढते.
भारताचा भविष्यकाळ
थोडा वेगळा विषय आहे, पण आवर्जून सांगायचा आहे. बहुतांश मध्यमवर्गीय भारतीयांचे स्वप्न असते, की मुला-मुलीला शिकायला परदेशात पाठवावे. तिथेच त्याने-तिने स्थिर व्हावे वगैरे. विचार करा, भारताची अर्थव्यवस्था सात-आठ टक्क्यांनी वाढते आहे.
ज्या देशांमध्ये तुम्ही मुला-मुलीला शिकायला पाठवत आहात, त्यांना ''सेटल'' करू पाहात आहात त्या देशांची अर्थव्यवस्था दोन-तीन टक्क्यांनीही वाढताना दमते आहे. मग पालक म्हणून तुम्ही योग्य निर्णय करत आहात का? भारताचा आर्थिक भविष्यकाळ उज्ज्वल आहे.
गुंतवणूक आज ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटसारखी झाली आहे. मात्र, कुठल्याही क्रिकेटमध्ये संयमही लागतो आणि धैर्यही. बाजारात घसरण होत असताना गुंतवणूकदाराकडे राहूल द्रविडसारखा संयम हवा आणि संधी मिळताच शुभमन गिलसारखे षटकार लगावण्याचे धैर्यही हवे.
अल्गॉरिदम तुमच्यासमोर पर्याय देतात. अल्गॉरिदम म्हणजे काही अल्लाउद्दीनचा दिवा नाही. गुंतवणूक किंवा खरेदी-विक्रीसाठी सर्वस्वी अल्गॉरिदमवर अवलंबून राहाता येणार नाही. ते योग्यही नाही. मानवी बुद्धी, आकलन आणि अल्गॉरिदमने सुचवलेले पर्याय असा एकत्रित विचार केला, तरच लाभाचे आहे.
कोणती कंपनी टाळावी?
१. कंपनीचा ताळेबंद (बॅलन्स शीट) पाहावी. लेखापरीक्षणावरील खर्च वाढत असल्याच धोका असू शकतो.
२. नफ्यापेक्षा रोकड (कॅशफ्लो) कमकुवत असेल, तर धोका असू शकतो
३. कंपनीच्या सेवा अथवा उत्पादनांची मक्तेदारी नसेल, तर बाजारपेठेत तीव्र स्पर्धेमुळे नफ्याचे प्रमाण घटत राहते
कंपनी कशी निवडावी?
१. ज्या कंपनीत गुंतवणूक करायची आहे, ती स्वच्छ आहे का?
२. प्रवर्तकांनी (प्रमोटर्स) गेल्या दहा-पंधरा वर्षांत यशस्वी व्यवसाय केला आहे का?
३. कंपनी ''बाहुबली'' आहे का? म्हणजे कंपनीची सेवा अथवा उत्पादनांची बाजारपेठेवर मक्तेदारी आहे का?
वरील तिन्ही प्रश्नांची उत्तरे पडताळून पाहिली आणि उत्तर हो असेल, तर गुंतवणूक करायला हरकत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.