अपूर्णांकात शेअर घेणे शक्य होणार का?

डोळस गुंतवणूकदार एका कंपनीत १० टक्क्यांपेक्षा अधिक गुंतवणूक करणार नाही.
share market will it be possible to buy shares in fractions
share market will it be possible to buy shares in fractionssakal
Updated on

- नीलेश साठे

एमआरएफ, हनीवेल ऑटोमेशन, पेज इंडस्ट्रीज, श्री सिमेंट आणि अॅबॉट या कंपन्यांमध्ये कोणते साधर्म्य आहे? साधर्म्य एकच आणि ते म्हणजे यापैकी कोणत्याही कंपनीचा केवळ एक शेअर खरेदी करायचा म्हटले, तर आपले बँक खाते रिकामे होईल.

कारण या कंपन्यांच्या एका शेअरचा बाजारातील भाव २५ हजार रुपये ते एक लाख रुपये आहे. स्वाभाविकच, आपल्याला केवळ २० हजार रुपये या कंपनीत गुंतवायचे असतील, तर ते शक्य नाही. मात्र, या शेअरचा १/४ किंवा १/२ भाग आपल्याला मिळू शकला असता, तर या कंपनीत गुंतवणूक करण्याचा आपण विचार करू शकलो असतो.

अपूर्णांकात शेअर उपलब्ध झाल्यास...

अशी सुविधा मिळाल्यास, याचे बहुविध फायदे होऊ शकतात. पहिला म्हणजे अनेक गुंतवणूकदार जे या कंपन्यांचे शेअर खरेदी करू शकत नाहीत, ते या कंपन्यांत आपले पैसे गुंतवून चांगल्या कंपन्यांमध्ये भागीदार होऊ शकतील. भारतात केवळ तीन टक्के लोक शेअर बाजारात गुंतवणूक करतात.

इतर देशांच्या तुलनेत हे प्रमाण नगण्य आहे. चीनमध्ये हे प्रमाण १३ टक्के, तर अमेरिकेमध्ये ५५ टक्के आहे. अपूर्णांकात शेअर उपलब्ध झाल्याने जास्त गुंतवणूकदार शेअर बाजाराकडे आकृष्ट होण्याची शक्यता आहे, त्यायोगे शेअरची उलाढाल वाढेल आणि या शेअरच्या भावातील चढ-उतारास पायबंद बसेल.

अनेक लोक कमी किमतीत मिळतात म्हणून ‘पेनी स्टॉक’ म्हणजे ज्या शेअरचा भाव १० रुपयांहूनही कमी असतो, अशा शेअरमध्ये गुंतवणूक करतात आणि अनेकदा नुकसान सोसतात. अशी मंडळी चांगल्या कंपन्यांचे अपूर्णांक शेअर खरेदी करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

डोळसपणे गुंतवणूक

शेअर बाजारात एक पथ्य पाळावे लागते ते म्हणजे, ‘नेव्हर कीप ऑल एग्ज इन वन बास्केट’ म्हणजेच एकाच कंपनीत आपली गुंतवणूक न करता विविध क्षेत्रातील अनेकविध कंपन्यांचे शेअर खरेदी करावे. डोळस गुंतवणूकदार एका कंपनीत १० टक्क्यांपेक्षा अधिक गुंतवणूक करणार नाही. मात्र, पाच लाख रुपयांएवढी मोठी रक्कम शेअर बाजारात लावायची असेल,

तर अशावेळी ‘एमआरएफ’चा केवळ एक शेअर घेतला, तरी एकूण गुंतवणुकीपैकी २० टक्क्यांहून अधिक गुंतवणूक एकाच कंपनीत होईल. कारण त्या शेअरची किंमत जवळपास एक लाख १० हजार रुपये आहे. असे करणे योग्य नाही. अशावेळी ५० ते ६० हजार रुपये गुंतवून ‘एमआरएफ’चा १/२ शेअर मिळाला, तर कदाचित लोक अशा गुंतवणुकीचा विचार करतील.

‘एमआरएफ’सारख्या जास्त बाजारमूल्य असणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. यात हनीवेल ऑटोमेशन, पेज इंडस्ट्रीज, थ्रीएम इंडिया, श्री सिमेंट, अबॉट इंडिया, नेस्ले, बॉश, प्रॉक्टर अँड गॅम्बल आदींचा समावेश आहे. या कंपन्यांचे दर्शनी मूल्य १० रुपये असून, बाजारभाव एक लाख १० हजार रुपयांपासून एक लाख १६ हजार रुपयांपर्यंत आहे.

या कंपन्या आपल्या शेअरचे विभाजन करून पाच, दोन किंवा एक रुपये अशा दर्शनी मूल्याचा करू शकतात; पण ती एक खर्चिक बाब असते, शिवाय आपल्या कंपनीच्या शेअरचा खूप जास्त बाजारभाव आहे, हे एक प्रतिष्ठेचे लक्षण मालक मानतात आणि म्हणून शेअरविभाजन टाळतात. या कंपन्यांना शेअर विभाजनास वाव तरी आहे, लार्ज कॅप श्रेणीमधील अनेक कंपन्यांच्या शेअरचे दर्शनी मूल्य आधीच एक रुपया आहे.

टीसीएस, एचडीएफसी बँक, एचयूएल, आयटीसी, एसबीआय, एशियन पेंट्स, टायटन, सन फार्मा आदी कंपन्यांना, तर शेअर विभाजन करणेदेखील शक्य नाही. अशा स्थितीत शेअर बाजाराची तरलता वाढवायचा असेल, तर अपूर्णांकात शेअर उपलब्ध करून देण्याशिवाय पर्याय नाही. अशा भागधारकांना वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित राहू दिले नाही किंवा त्यांना ठरावांवर मतदानाचा अधिकार दिला नाही, तरी चालेल मात्र, त्यांना कंपनीच्या लाभात भागीदार होण्याची संधी मिळणे आवश्‍यक आहे.

‘सेबी’कडून अपेक्षा

‘सेबी’ असे ऐतिहासिक बदल करण्याची शक्यता वाटत नाही. मात्र, ‘सेबी’ कंपन्यांना अपूर्णांकी शेअर देण्याची मुभा देऊ शकेल किंवा सक्ती करू शकेल. मात्र, त्यासाठी कंपनी कायद्यात; तसेच ‘सेबी’च्या नियमांमध्ये बदल करावे लागतील. ‘सेबी’ने हे प्रत्यक्षात आणले, तर शेअर बाजारात अधिक लोकांना यावे आणि बाजाराची उलाढाल वाढावी, यासाठी एक क्रांतिकारी पाऊल ठरेल.

अमेरिकेत सुविधा

बहुतेक देशांमध्ये ही सोय उपलब्ध नाही. मात्र, अमेरिकेत अशा अपूर्णांकातील शेअरना मागणी आहे. याचे मुख्य कारण म्हणजे तिथे ब्रोकरना आपल्या नावे शेअर खरेदी करून ते आपल्या खातेदारांना वितरीत करण्याची मुभा आहे. जेव्हा कुणी ब्रोकरकडे अपूर्णांकी शेअर मागतो, तेव्हा तो आपल्याकडील शेअरचा हिस्सा त्या ग्राहकाच्या नावे करतो. भारतात अद्याप तशी सोय उपलब्ध नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.