Tsunami In Stock Market: इराण-इस्रायल तणावाचा 'बॉम्ब' आज भारतीय शेअर बाजारावर पडला आहे. 2 ऑक्टोबरच्या सुट्टीनंतर गुरुवारी शेअर बाजार उघडले तेव्हा सकाळपासूनच घसरण सुरु झाली आहे. BSE सेन्सेक्स 1264 अंकांच्या घसरणीसह उघडला.
त्याच वेळी, NSE निफ्टी देखील 345 हून अधिक अंकांच्या घसरणीसह उघडला. दुपारपर्यंत ही घसरण अधिक खोलवर गेली. बीएसई सेन्सेक्समधील घसरणीची पातळी 1800 अंकांच्या पुढे गेली. तर एनएसईचा निफ्टी 550 अंकांनी घसरला आहे.
शेअर बाजारातील हा भूकंप मोठ्या कंपन्यांना सहन करता आला नाही. रिलायन्स इंडस्ट्रीजपासून ते एशियन पेंट्स, मारुती सुझुकी, आयसीआयसीआय बँक, आयटीसी, महिंद्रा आणि एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये 4 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे.
शेअर बाजारातील घसरणीचा परिणाम गुंतवणूकदारांच्या संपत्तीवरही झाला. बीएसईचे मार्केट कॅप 11 लाख कोटी रुपयांनी घसरून 364.28 लाख कोटी रुपये झाले आहे, जे गेल्या सत्रात 374.86 लाख कोटी रुपये होते.
इराणने मंगळवारी इस्रायलवर केलेल्या ताज्या हल्ल्यानंतर जगभरातील बाजारात गोंधळाची भीती होती. जेव्हा 2 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात व्यापार झाला तेव्हा त्याचा बाजारावर परिणाम कमी होता.
आशियातील मुख्य बाजारपेठ असलेल्या जपानच्या Nikkei 225 निर्देशांकात 2% पर्यंत वाढ झाली आहे. त्याच वेळी, अमेरिकेच्या S&P 500 निर्देशांकात 0.79 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर शेअर बाजारातील रिकव्हरीची प्रक्रियाही डाऊ जोन्समध्ये 39.55 अंकांच्या वाढीच्या रूपाने दिसून आली आहे. आयटी कंपन्यांचा मुख्य निर्देशांक नॅसडॅकही 14 अंकांच्या वाढीसह ग्रीन झोनमध्ये आला आहे.
दरम्यान, भारताचा शेजारी देश चीनचा CSI 300 निर्देशांक 314 अंकांनी मजबूत झाला आहे. शांघाय कंपोझिट इंडेक्स देखील 249 अंकांपर्यंत ग्रीन झोनमध्ये राहिला आहे. केवळ हाँगकाँगच्या हँग शेंग निर्देशांकात 700 अंकांपर्यंत घसरला आहे.
शेअर बाजारातील घसरणीमागील मुख्य कारण म्हणजे मध्यपूर्वेतील वाढता तणाव. हिजबुल्लाहचा नेता हसन नसराल्लाहच्या मृत्यूनंतर इराणने इस्रायलवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचा हल्ला करून प्रत्युत्तर दिले.
या संघर्षाचे मोठ्या प्रमाणावर युद्धात रुपांतर होण्याचीही शक्यता आहे. अशा स्थितीत गुंतवणूकदार आता शेअर बाजाराऐवजी सोन्यासारख्या कमी जोखमीच्या मालमत्तेकडे वळू लागले आहेत. विशेषतः विदेशी गुंतवणूकदार बाजारातून पैसे काढून घेत आहेत.
भू-राजकीय तणावामुळे जगातील बहुतांश शेअर बाजारांमध्ये घसरण पाहायला मिळाली. तिन्ही प्रमुख यूएस निर्देशांक बुधवारी रात्री उशिरा जवळपास सपाट बंद झाले. गुंतवणुकदारांची नजर आता यूएस बेरोजगारीच्या आकडेवारीकडे आणि 4 ऑक्टोबर रोजी प्रकाशित होणाऱ्या नॉन-फार्म पेरोल अहवालकडे आहे.
दरम्यान, आशियाई बाजारात हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत होता. राष्ट्रीय सुट्टीसाठी शांघायचे निर्देशांक 8 ऑक्टोबरपर्यंत बंद राहतील आणि आज राष्ट्रीय स्थापना दिनानिमित्त दक्षिण कोरियाची बाजारपेठ बंद होती.
SEBI ने एक परिपत्रक जारी करून माहिती दिली आहे की फ्युचर्स अँड ऑप्शन्स (F&O) बाबत केलेले नवीन नियम 20 नोव्हेंबरपासून लागू होतील. सेबीने म्हटले आहे की, फ्युचर्स अँड ऑप्शन्सचे नियमन करण्यासाठी नवीन फ्रेमवर्क लागू केले आहे. F&O मध्ये, कॉन्ट्रॅक्टचा आकार रु. 5-10 लाखांवरून रु. 15 लाखांपर्यंत वाढविला आहे.
गेल्या काही काळापासून भारतीय शेअर बाजार उच्च मूल्यांकनावर व्यवहार करत आहेत. एवढा वेळ सुरू असलेल्या तेजीमुळे प्रत्येक मोठ्या बातमीवर गुंतवणूकदारांकडून प्रॉफिट बुकींग होताना दिसत आहे.
याशिवाय गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारातही देशांतर्गत गुंतवणूकदारांचा कमी सहभाग दिसून आला. आत्तापर्यंत, शेअर बाजारातील प्रत्येक घसरणीत देशांतर्गत गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली होती.
चीनमधील मदत पॅकेजच्या घोषणेनंतर गुंतवणूकदार चीनकडे वळत असल्याने भारतीय शेअर बाजारात अस्वस्थता आहे. परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजाराऐवजी चीनच्या बाजारात गुंतवणूक करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.