Tata Elxsi : टाटा एलेक्सी (शुक्रवारचा बंद भाव : रु. ७,७५३)

‘टाटा एलेक्सी’ ही टाटा समूहाची अभियांत्रिकी, संशोधन आणि विकास क्षेत्रात कार्यरत असलेली कंपनी आहे.
Tata Elxsi
Tata Elxsi Sakal
Updated on

‘टाटा एलेक्सी’ ही टाटा समूहाची अभियांत्रिकी, संशोधन आणि विकास क्षेत्रात कार्यरत असलेली कंपनी आहे. ही कंपनी परिवहन, प्रसारण, माध्यमे, आरोग्यसेवा आणि इतर उद्योगांना डिझाइनिंग आणि उत्पादन अभियांत्रिकी सेवा प्रदान करते.

ही कंपनी ऑटोनॉमस ड्रायव्हिंग, अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम, विद्युतीकरण प्रकल्प; तसेच डिजिटायझेशन प्रकल्प कार्यरत करण्यासाठी ग्राहकांशी संलग्न आहे. ‘टाटा’ हा ब्रँड कंपनीला, ग्राहकांना; तसेच कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यास मदत करत आहे.

मार्च २०२३ पर्यंत वर्षभरात कंपनीने एकूण ७५५ कोटी रुपये निव्वळ नफा कमविला होता. जागतिक पातळीवर वातावरण आव्हानात्मक असतानादेखील मागील तीन तिमाही निकालानुसार, कंपनीचा एकूण निव्वळ नफा सुमारे ५९५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. येत्या २३ एप्रिलला कंपनी ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या तिमाही; तसेच आर्थिक वर्षाच्या कामगिरीचे निकाल जाहीर करेल.

टाटा एलेक्सी कंपनीने फेब्रुवारीमध्ये क्लाउड-नेटिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी; तसेच दूरसंचार क्षेत्रात प्रगत उपाय योजना देण्यासाठी ‘टेलिफोनिका’ या युरोप आणि लॅटिन अमेरिकेत कार्यरत असलेल्या दूरसंचार कंपनीबरोबर भागीदारी केली आहे.

भारतातील क्रिटिकल केअर इनोव्हेशन ड्रायव्हिंगसाठी जागतिक वैद्यकीय आणि सुरक्षा तंत्रज्ञान उत्पादने तयार करणारी अग्रगण्य उत्पादक ‘ड्रेगर’ कंपनीबरोबर भागीदारीची घोषणा केली आहे. ‘ड्रेगर’ ही कंपनी पुण्यातील ‘टाटा एलेक्सी’च्या सुविधेमध्ये नवे ऑफशोअर डेव्हलपमेंट सेंटर स्थापन करून संशोधन आणि विकासातील उपस्थिती वाढवत आहे.

‘टाटा एलेक्सी’चे हेल्थकेअर आणि लाइफसायन्स बिझनेसचे प्रमुख पंकज मधुकर वाणी यांच्यानुसार, ‘ड्रेगर’बरोबर काम करताना कंपनीकडे उत्पादनविकासामध्ये आपले नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान, डिझाइन आणि अभियांत्रिकी प्रवीणता एकत्रित करण्याची अनोखी संधी आहे.

कर्जाचे प्रमाण अत्यल्प ठेवून धंद्यात गुंतविलेल्या भांडवलावर प्रतिवर्ष सुमारे २० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवत, ही कंपनी कार्यक्षेत्रात प्रगती करत आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये या कंपनीच्या शेअरने १०,७६० रुपयांचा उच्चांक नोंदवला होता.

हा शेअर सध्या महाग वाटत असला, तरी दीर्घावधीमधील व्यवसायात वृद्धीची शक्यता आणि क्षमता लक्षात घेता या कंपनीच्या शेअरमध्ये जोखीम लक्षात घेऊन मर्यादित प्रमाणात गुंतवणूक करण्याचा गुंतवणूकदारांनी जरूर विचार करावा.

(डिस्क्लेमर ः लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.