डॉ. वीरेंद्र ताटके
इंडेक्स फंड ही संकल्पनाच खूप आकर्षक आहे. कारण इंडेक्स फंडामध्ये लार्ज कॅप फंड आणि डायव्हर्सिफाइड फंड यांचे मिश्रण असल्याने या दोन्ही प्रकारच्या फंडाचे फायदे अशा फंडातील गुंतवणुकीतून मिळतात. त्यामुळे २४ वर्षांपूर्वी बाजारात आलेल्या ‘यूटीआय निफ्टी ५० इंडेक्स फंड’ या फंडाची गोष्ट ऐकण्यासारखी आहे. या फंडाने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निर्देशांक असलेल्या ‘निफ्टी’मध्ये समाविष्ट असलेल्या ५० कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणारा हा पॅसिव्ह प्रकारचा फंड आहे. प्रदीर्घ अनुभव या फंडाच्या पाठीशी असल्याने या फंडाचा पाया एकदम मजबूत आहे, असे म्हणता येईल.