‘लाल दिव्या’खालचा अंधार

स्पर्धापरीक्षा आणि एकूण निवडप्रक्रिया यांची विश्वासार्हता टिकवणे हे महत्त्वाचे आव्हान आहे.
exam
examsakal
Updated on

दे शभरातील लाखो विद्यार्थी ज्या स्पर्धापरीक्षांसाठी अहोरात्र मेहेनत घेतात, ज्यात त्यांची आर्थिक, भावनिक गुंतवणूक असते, अशा या परीक्षा आणि एकूण निवडप्रक्रिया यांचीच विश्वासार्हता धोक्यात आली, तर त्यांच्यात येणारे वैफल्य हे किती तीव्र असेल, याची कल्पनाही करता येणार नाही. त्यामुळेच प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी दिव्यांगांसाठीच्या सवलतीचा फायदा घेताना खोटी कागदपत्रे सादर केल्याच्या आरोपामुळे खळबळ उडाली नसती तरच नवल. या कथित गैरप्रकारांच्या चौकशीसाठी कर्मचारी व प्रशिक्षण विभागाने एकसदस्य समिती नेमली. ती पंधरा दिवसांत अहवाल सादर करणार आहे. प्रशिक्षणार्थी म्हणून नेमणूक झाल्यानंतर या महिला अधिकाऱ्याचे एकेक कारनामे चव्हाट्यावर आले. केबिनच हवे असा हट्ट त्यांनी धरला आणि आपल्या मोटारीवर अंबर दिवा लावला.

दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र सादर करणाऱ्या खेडकर सहावेळा बोलावूनही वैद्यकीय चाचणीला हजर राहिल्या नाहीत, असे केंद्रीय प्रशासकीय लवादाने जाहीर केले. हे सगळे सुरू असतानाच ‘‘पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपला छळ केला’’, असा गंभीर आरोप खेडकर यांनी केला; परंतु आरोपांच्यासंदर्भात जबानीसाठी बोलावले असता तिथेही त्या हजर राहिल्या नाहीत, असे पोलिसांनी सांगितले. असा हा सर्वव्यापी गोंधळ सुरू असताना साहजिकच विद्यार्थी, पालक आणि सुजाण नागरिकही सध्याच्या पद्धतीत कोणते सुधारणात्मक उपाय योजले जाणार, याविषयीच्या प्रश्नाने अस्वस्थ आहेत. अशा परिस्थितीत मनोज सोनी यांनी ‘यूपीएससी’च्या अध्यक्षपदाचा वैयक्तिक कारण पुढे करून राजीनामा दिल्याची बातमी प्रसिद्ध झाली. केंद्र सरकारने हा राजीनामा स्वीकारला किंवा नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पण ज्यावेळी संस्थेची विश्वासार्हताच पणाला लागली आहे, अशावेळी तिच्या कप्तानानेच जबाबदारीतून मुक्त करा, असे सांगणे याने ती अस्वस्थता आणखीनच वाढणार नाही काय?आपल्याकडे पारदर्शित्व, उत्तरदायित्व वगैरे मोठमोठ्या शब्दांची उधळण सतत केली जाते, पण त्याचा रोकडा प्रत्यय देण्याची वेळ येते, तेव्हा या सगळ्या गोष्टी गायब झालेल्या दिसतात. मनोज सोनी यांची ‘यूपीएससी’च्या अध्यक्षपदाची मुदत २०२९ पर्यंत होती. गेल्या वर्षीच ते या पदावर आले होते. सर्वसाधारण परिस्थितीत जर एखाद्या उच्चपदस्थाने असा निर्णय घेतला तर समजून घेता येतो. परंतु सध्याच्या गोंधळवर कोणतेही भाष्य न करता, व्यवस्थेत कोणत्या सुधारणा हव्या आहेत, आपण त्यासाठी काय प्रयत्न केले, वगैरे काहीही न सांगता अशाप्रकारे राजीनामा देणे याने आधीच निर्माण झालेला संशयकल्लोळ वाढू शकतो. संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. तिथे या संपूर्ण प्रश्नाची समग्र चर्चा व्हायला हवी. लोकसभेत बळ वाढलेल्या विरोधकांनीही त्यासाठी हा प्रश्न लावून धरायला हवा. एखादा उमेदवार निरनिराळ्या व्यवस्था आपल्याला हव्या तशा वाकवत असेल, तर हे व्यवस्थेलाच आलेले विकलांगत्व नव्हे काय? एकीकडे दिव्यांगत्वाच्या खोट्या प्रमाणपत्रांच्या आरोपांच्या चौकशीची वेळ येते आणि दुसरीकडे स्नायूंच्या विकाराने ग्रस्त असलेल्या (मस्क्युलर डिस्ट्रॉफी) कार्तिक कन्सलला चारवेळा आय.ए.एस परीक्षा उत्तीर्ण होऊनही सेवेत सामावून घेतले जात नाही. कारण काय तर या परीक्षांबाबतच्या सरकारी नियमावलीत या विशिष्ट आजाराचा अंतर्भाव नाही. असे अंतर्विरोध तयार होत असतील तर संपूर्ण नियमावलीचा आढावा घेऊन नवी घडी बसवावी लागेल.

पूजा खेडकर प्रकरणातील आत्तापर्यंतचा घटनाक्रम लक्षात घेता हे प्रकरण लोकांच्या रेट्यामुळे तडीस नेले जाईलही. परंतु सर्वांगीण सुधारणांना हात घातला नाही, तर अशी नवनवी प्रकरणे उद्‍भवतच राहतील. सडके आंबे शोधून काढून तातडीने दूर फेकले नाहीत, तर अनर्थ ओढवेल. सनदी सेवेत प्रवेश करू इच्छिणाऱ्यांपैकी काहींच्या अधिकारपदाविषयी किती विपरीत कल्पना आहेत, याचेही ढळढळीत दर्शन पूजा खेडकर यांच्या वर्तनातून दिसले. ‘व्हीआयपी कल्चर’ निकालात काढून प्रशासन हे लोकाभिमुख असले पाहिजे, असे सतत सांगितले जाते. खरे तर मोटारींवरचे लाल दिवे हा प्रकार बंद करण्यात आला, तो त्यामुळेच. लोकसेवेसाठी आपली नियुक्ती होत आहे, याची जाणीव जर समाजात आपण निर्माण करू शकत नसू, तर नक्कीच कुठेतरी चुकते आहे. ब्रिटिशांनी स्वतःचे हितसंबंध राखण्यासाठी नोकरशाहीची रचना केली आणि विशेषाधिकाराची तटबंदी उभारली. स्वतंत्र लोकशाही देशातही नोकरशाही आणि त्यातील अधिकार यांबाबत तीच धारणा असेल तर त्याइतके दुर्दैव नाही. पूजा खेडकर यांच्या प्रकरणाच्या निमित्ताने असे अनेक मुद्दे ऐरणीवर आले आहेत. ‘पायाभूत संरचना’ या विकासाचा पाया असतात. त्यात केवळ भौतिक सुविधांची उभारणी अभिप्रेत नसते. आपल्या सर्व यंत्रणा, व्यवस्था नियमानुसार आणि कार्यक्षमपणे चालणे, त्यांची कार्यात्मक स्वायत्तता जपली जाणे हेही भक्कम संरचनेत अपेक्षित असते. असे जोमदार संस्थाजीवन निर्माण करता आले तरच देशाच्या बाबतीत मोठी स्वप्ने पाहणे शक्य होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.