वर्गातील संवादाची भाषा

वर्गाध्यापनात मुख्यतः शिक्षकांनी बोलायचे, स्पष्टीकरण द्यायचे, मुलांनी विचारले तेवढ्याच प्रश्नांची उत्तरे द्यायची, ती प्रमाण भाषेत आणि शक्य तितकी बिनचूक द्यायची, हा पारंपरिक शिक्षणातील आदर्श होता.
वर्गातील संवादाची भाषा
वर्गातील संवादाची भाषाsakal
Updated on

वर्गाध्यापनात मुख्यतः शिक्षकांनी बोलायचे, स्पष्टीकरण द्यायचे, मुलांनी विचारले तेवढ्याच प्रश्नांची उत्तरे द्यायची, ती प्रमाण भाषेत आणि शक्य तितकी बिनचूक द्यायची, हा पारंपरिक शिक्षणातील आदर्श होता. मात्र अशा साचेबंद संवादामुळे मुलांच्या विकासावर, स्वयंप्रेरणेवर मर्यादा पडतात, हे आता स्पष्ट झाले आहे. विशेषतः प्राथमिक स्तरावर मुलांनी त्यांच्या स्वतःच्या भाषेत- मग ती कितीही तोडकीमोडकी का असेना- भरपूर बोलावे, स्वतःचे विचार, भावना व्यक्त कराव्यात, शंका विचाराव्यात, वर्गातील इतर मित्रमैत्रिणींशी बोलून गटाने किंवा जोडीने समस्यांची उकल करावी, प्रयोग करावे, शैक्षणिक खेळ खेळावे, याला आता फार महत्त्व आहे. म्हणजेच वर्गात शिक्षक-विद्यार्थी असा फक्त एकतर्फी संवाद न होता, शिक्षक-विद्यार्थी, विद्यार्थी-शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थी असे संवाद औपचारिक, अनौपचारिक अशा दोन्ही स्वरूपांत आणि मोकळ्या वातावरणात घडून येणे अपेक्षित आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही शिक्षकांनी सुरवातीपासूनच सतत औपचारिक, प्रमाण भाषेचा आग्रह न धरता मुलांना समजेल, आपलीशी वाटेल अशी भाषा वापरावी यावर भर देण्यात आला आहे. बोलताना मुलांच्या चुका झाल्या तरी त्यांना नाउमेद न करता शिक्षकांनी हळूहळू प्रमाण भाषेकडे नेणारा पूल बांधावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

मुलांच्या रोजच्या बोलण्यातील भाषा आणि माध्यम भाषा- मग ती इंग्रजी, प्रमाण मराठी अशी कोणतीही असो- यांत खूप फरक असेल तर शिक्षकांना हे पूल बांधण्याचे काम अधिकच कुशलतेने आणि संवेदनशीलतेने करावे लागते. पण प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे? वर्गातील संवाद आणि भाषा यांच्यातील हे बदल खरोखर घडत आहेत का? हे बदल स्वीकारण्याची, त्यासाठी वेगवेगळी तंत्रे वापरण्याची शिक्षकांची मानसिक आणि भाषिक तयारी किती आहे, त्यावर वर्गातील संवादाचा आणि पर्यायाने मुलांच्या पदरात पडणाऱ्या शिक्षणाचा दर्जा अवलंबून असला तरी बऱ्याच ठिकाणी शिक्षकांची अशी तयारी नाही, असे दिसते. ती तयारी करून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शिक्षकांच्या हाताशी त्या-त्या बोली भाषांमधील किंवा बोली-प्रमाण, मातृभाषा-माध्यमभाषा असे द्वैभाषिक स्वरूपाचे विपुल साहित्य असले पाहिजे, ही गरज राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नमूद केलेली आहे. त्याशिवाय शिक्षकांना आपल्या शाळेच्या भागातील बोलीभाषा किमान कामापुरत्या तरी सहज शिकता येतील अशी ऑनलाइन किंवा इतर प्रकारे सोय करणे, यशस्वी शिक्षकांनी वापरलेल्या तंत्राची देवघेव करता येईल, त्याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेता येईल अशी व्यासपीठे, संधी निर्माण करणे असेही उपाय करता येतील.

शिक्षकांना प्रमाण भाषा लिहिण्याबोलण्यात अडचण असेल, तर त्यासाठी त्यांच्या गरजांवर आधारित वेगवेगळे कोर्सेस आणि संदर्भ साहित्य उपलब्ध करून देणे, स्वयं-मूल्यमापनाच्या सुविधा पुरवणे, हेही करावे लागेल. इंग्लिश भाषेच्या बाबतीत तर या अनुषंगाने प्रचलित पद्धती, समजुतींचा फेरविचार करण्याची विशेषच गरज आहे. इंग्लिशच्या तासाला फक्त आणि फक्त इंग्लिशच बोलले पाहिजे हा आग्रह लहान मुलांच्या अभिव्यक्तीला आणि बऱ्याचदा त्यांच्या शिक्षकांच्याही अभिव्यक्तीला मारक ठरतो आणि वर्गातील सगळा संवाद कृत्रिम, अतिशय मर्यादित होऊन जातो. याउलट कोणत्या प्रश्नांचे प्रतिसाद फक्त इंग्लिशमध्ये घ्यायचे आणि कोणत्या विचारप्रवर्तक बाबींची चर्चा द्वैभाषिक, मिश्र भाषिक रीतीने घडू द्यायची याची योग्य आखणी केली, तर मुलांची अभिव्यक्ती आणि विषयाची समज दोन्ही अधिक चांगल्या प्रकारे विकसित होतील.

वर्गात मुलांना चुकतमाकत बोलायची परवानगी हवी, पण शिक्षकांना मात्र ती नाही, याचेही भान फक्त इंग्रजीतून बोलण्याचा अट्टाहास धरताना राहत नाही. ते ठेवले पाहिजे. कारण मुले ऐकून ऐकून शिक्षकांच्या चुकाही आत्मसात करतात. वर्गात दडपून चुकीचे इंग्लिश बोलणाऱ्या शिक्षकांपेक्षा ठरावीक कामांसाठीच पण प्रयत्नपूर्वक बरोबर इंग्लिश बोलणारे आणि इतर वेळी मुलांची भाषा वापरणारे शिक्षक कितीतरी चांगले! त्या खेरीज डिजिटल साधने वापरून मुलांना उत्तम इंग्लिशचे भरपूर नमुने ऐकवणेही आज सहज शक्य आहे. हे मार्ग वापरून मुले आपल्यापेक्षाही सरस इंग्लिश बोलू शकतील, अशी तरतूद शिक्षक आज करू शकतात. वर्गातील संवादाला अकृत्रिम पण दर्जेदार स्वरूप देणे ही शैक्षणिक परिवर्तनाची पहिली पायरी मानली पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.