अहिल्यादेवींची ज्ञानसंवर्धनाची दृष्टी

सांस्कृतिक, धार्मिक परंपरा आणि आर्थिक विषयाची सांगड घालून समाजात बदल घडविण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी विशेष प्रयत्न केले.
Rajmata Ahilyadevi Holkar
Rajmata Ahilyadevi HolkarSakal
Updated on

- रामभाऊ रुस्तुमराव लांडे

सांस्कृतिक, धार्मिक परंपरा आणि आर्थिक विषयाची सांगड घालून समाजात बदल घडविण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी विशेष प्रयत्न केले. ज्ञान संपादन व संवर्धन याविषयी आस्था हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक विशेष पैलू. त्रिशताब्दी जयंतीवर्षानिमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कर्तृत्व बहुपैलू असे होते. त्यांना केवळ राजकारणच नव्हे, तर विविध विषयांत स्वारस्य होते. ज्ञानाविषयी आस्था होती. त्या अतिशय धार्मिक वृत्तीच्या होत्या आणि त्यांच्या संग्रहात अनेक धार्मिक ग्रंथांसह लोकोपयोगी पुस्तके होती. अहिल्यादेवी त्या त्या विषयाच्या जाणकार लोकांना आपल्या दरबारात बोलावून घेऊन त्यांच्याबरोबर ग्रंथांवर चर्चा करीत. त्यांचा यथोचित सन्मान करीत असत.

जुन्या जाणत्या लोकांचा अनुभव सर्वांसाठी मैलाचा दगड असतो, त्यामुळे असे जाणते लोक आपल्या पदरी असावेत, या विचाराप्रमाणे अहिल्यादेवींनी जाणत्या लोकांची पारख करून त्यांना महेश्वरात राजाश्रय बहाल केला होता. त्यांनी ज्ञानाचा आणि ज्ञानी लोकांचा सन्मान करण्याची परंपरा सुरू केली होती. अहिल्यादेवी होळकर यांचा धर्मावर प्रचंड विश्वास होता, म्हणून त्यांनी विविध धार्मिक पुस्तके व शास्त्रावर चर्चा घडवून आणली होती. जे लोक धर्माच्या नावाखाली रयतेचे शोषण करीत होते, त्यांना धर्मातील चालीरीतीनुसार चोखपणे उत्तर देण्याचे धाडस अहिल्यादेवींनी धर्मग्रंथाच्या आधारे वेळोवेळी केलेले दिसून येते. दुर्मिळ पोथ्या, धार्मिक ग्रंथ, महत्त्वाच्या विषयांवरील पुस्तके यांचे जतन करण्याची त्यांची दृष्टी वाखाणण्याजोगीच.

ज्ञानेश्वरी ग्रंथाचे महेश्वर येथे पारायण त्यांनी केले. भगवद्‍तगीतेचा भावार्थ ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून समजून घेतल्यानंतर अहिल्यादेवींनी ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या अनेक प्रती तयार करून घेतलेल्या आहेत. त्यांनी तयार करून घेतलेल्या ज्ञानेश्वरीच्या हस्तलिखित ग्रंथाची प्रत इंदूरच्या शासकीय संग्रहालयात जतन करण्यात आलेली आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या पारायणासाठी त्यांनी खास व्यक्तीची नियुक्ती केली होती. माळव्यात शिलेदारीसाठी गेलेल्या मराठी भाषिक लोकांना ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायणात अहिल्यादेवी सहभागी करुन घेत असत.

कीर्तन, भजन, पारायण, आख्यान करणाऱ्या लोकांना होळकर राज्यात मोठा सन्मान होता. अहिल्यादेवींनी महेश्वर ते पंढरपूर अशी पालखी सुरू केली. माऊलींच्या आळंदी गावाशी नाते जोडलेले आहे. आळंदीत अहिल्यादेवींनी श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर स्थापन केलेले असून तिथे नियमितपणे पूजाअर्चा केली जाते.

ग्रंथसंग्रह आणि संवर्धन

ग्रंथसंग्रह आणि संवर्धन याविषयी त्यांना कमालीची आत्मीयता होती. त्यांच्या संग्रहातील काही ग्रंथांच्या नावावर नजर टाकली तरी या त्यांच्या पैलूची उत्तम कल्पना येते. श्रीहरी (अठरा भाग), मुहूर्त चिन्तामणी, स्वर्ग आरोहण, वान पर्व, पंचतरणी गीता, गीता-गोविन्द, व्यंकटेश स्तोत्र, अध्यात्म रामायण (सात भाग), उद्योग पर्व, ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी नमन्, कान्यकुब्ज माहात्म्य, द्रोण पर्व, रुक्मिणी स्वयंवर, मल्हारी कवच, भगवद्‍गीता, रूद्र न्यास, श्रवण निर्णय, विष्णू सहस्रनाम, रघुवंश, भीष्मपर्व इत्यादी ग्रंथ अहिल्यादेवींच्या संग्रही होते. या ग्रंथांचे महत्त्व समजून घेऊन त्यांनी या ग्रंथाच्या अनेक हस्तलिखित तयार करून घेतल्या होत्या.

सुंदर वळणदार अक्षर असलेले तसेच व्याकरण माहिती असलेल्या लोकांना हस्तलिखित तयार करण्याचे काम देऊन दुर्मिळ ग्रंथसंपदेचे संवर्धन आणि जतन अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले आहे. आजही त्यांच्या संग्रही असलेले ग्रंथ शासनाच्या पुराभिलेखारात संरक्षित केलेले आढळून येतात.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सांस्कृतिक, धार्मिक परंपरा आणि आर्थिक विषयाची सांगड घालून समाजात बदल घडवण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले दिसून येतात. त्यांनी महेश्वर येथे विविध शास्त्र आणि विषयातील पारंगत ज्ञानसंपन्न लोकांना राजाश्रय दिला. महेश्वर येथील विठ्ठलराय कानुगो यांचे दप्तरात विषय व शास्त्रप्रवीण व्यक्तींची यादी मिळाली.

त्यात वेदशास्त्रसंपन्न, शास्त्र-व्याकरणाचे पंडित, कीर्तनकार, पुराणअभ्यासक, ज्योतिषतज्ज्ञ, संस्कृततज्ज्ञ, संस्कृतीचे अभ्यासक, वैद्यकशास्त्राचे तज्ज्ञ अशांचा समावेश आहे. ते देशाच्या वेगवेगळ्या भागांतून आले होते, हे विशेष. या सर्वांना वार्षिक वर्षासनासह दैनंदिन पूजाअर्चेसाठी खर्चाची तरतूद करून देण्यात आली होती.

याचे तपशील या कागदपत्रांत सापडतात. ही यादी महेश्वर येथे स्थायिक झालेल्यांची असून यांच्या घराण्यातील काही लोकांना इतर ठिकाणी निर्माण केलेल्या मंदिरात पूजाअर्चा करण्यासाठी नियुक्त केलेले होते. त्यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करून देण्यात आलेली आहे.

अहिल्यादेवींनी सिकंदरपूर लखनौ येथून यात्रेसमयी मुद्दाम स्वतःचे पालखीवर पालखी वाहक देवणी बीन किसन नाईक भोई यांना चाकर ठेवून यात्रेनंतर महेश्वर शेजारी असलेले मौजे जलकोटी गाव जहागीर दिले. आजही सदरील गावाची जहागिरी त्यांच्या वंशाकडे चालू असून हल्ली ते श्रीराजराजेश्वर व श्रीकाशीविश्वेश्वर यांच्या पालख्या निघतात, त्यावर चाकरी करीत असल्याचे म्हटले आहे.

विविध ऐतिहासिक कागदपत्रांतून मिळणाऱ्या माहितीमुळे अहिल्यादेवींच्या कर्तृत्वाचे अनेक पैलू प्रकाशात आले व येत आहेत. अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीवर्षानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस मानाचा मुजरा.

(लेखक इतिहासाचे व इंदूर येथील होळकर राजघराण्याचे अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com