अमेरिका-भारत यांच्या सशक्त भागीदारीचा अध्याय

अमेरिका-भारत यांच्या सशक्त भागीदारीचा अध्याय
Updated on

भारताबरोबरचे अमेरिकेचे सहकार्य गेल्या दोन दशकांत झपाट्याने वाढले. जीवनाच्या विविध क्षेत्रांसह संरक्षण, दहशतवादविरोध, विज्ञान-तंत्रज्ञान, व्यापार याबाबतीत गेल्या चार वर्षांत खूपच मोठी वाढ झाली. त्याने उभयतांसह हिंद-प्रशांत क्षेत्रातील सौहार्दालाही चालना मिळाली.

अमेरिका व भारतादरम्यान जितके व्यापक, दृढ आणि विविधांगी द्विपक्षीय संबंध आहेत, तसे इतर कोणत्याही देशांदरम्यान नाहीत. हे देश एकमेकांना संरक्षण, दहशतवादविरोध, सायबर सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृषी, अवकाश आणि इतर अनेक क्षेत्रांत सहकार्य करतात.  गेल्या दोन दशकांत धोरणात्मक भागीदारीचा आलेख उंचावलेला असतानाच गेली चार वर्षे ही महत्त्वाकांक्षा व उद्दिष्टपूर्तीची ठरली आहेत. 

भारताच्या विकासाला हातभार लावण्याची आणि हिंद-प्रशांत क्षेत्रातील मुक्त वातावरणाची अमेरिकेची कटिबद्धता ही आमच्यातील राजकीय सहकार्याची आधारशिला आहे. हिंद-प्रशांत क्षेत्र ही संकल्पना अनेक वर्षांपासून आकार घेत आहे. गेल्या चार वर्षांत दोन्ही देशांनी इच्छाशक्ती दाखवत या संकल्पनेला वास्तव रुप दिले आहे. हिंद-प्रशांत क्षेत्राकडे पाहण्याचा अमेरिकेचा दृष्टिकोन ठाम व वैशिष्ट्यपूर्ण आहे. बदल नि आव्हानांच्या काळात या प्रदेशात शांतता व समृद्धी राखून तिचा विस्तार करण्यासाठी आम्ही भारताकडे एक मोलाचा साथीदार म्हणून पाहतो. आशियाला मध्यवर्ती स्थान देत हिंद-प्रशांत क्षेत्राचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी आम्ही समविचारी देशांशी समन्वय साधण्यास सुरुवात केली आहे. आमच्या त्रिस्तरीय परिषदा (जपानसह २०१८आणि २०१९मध्ये झालेल्या) आणि बहुस्तरीय मंत्रीपरिषदा (जपान आणि ऑस्ट्रेलियासह २०१९आणि २०२०मध्ये झालेल्या) यामुळे सहकार्य अधिकच दृढ झाले आहे. सागरी सुरक्षा, जागतिक साथीचे व्यवस्थापन, प्रादेशिक पातळीवरील दळणवळण, मानवतावादी सहकार्य, आपत्ती निवारण आणि सायबर सुरक्षेसह अनेक क्षेत्रांत हे सहकार्य आहे. या प्रदेशातील स्वायत्तता आणि कायद्याचा आदर राखणाऱ्या सर्व देशांच्या विकासासाठी हेच सहकार्य पुढील पाच वर्षांत अधिक दृढ करण्याचे उद्दिष्ट आहे.

लोकशाहीवादी देश म्हणून अमेरिका आणि भारत हे शांततामय आणि राजनैतिक मार्ग अनुसरण्यास कटिबद्ध आहेत. आपापल्या देशांना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि सीमांच्याही पलिकडे जाऊन सुरक्षा पुरविण्यासाठी गेल्या चार वर्षांत सहकार्यात ठरवून वाढ केली. अमेरिका आणि भारताच्या संरक्षण आणि परराष्ट्र खात्यांमध्ये सप्टेंबर २०१८मध्ये मंत्री पातळीवरील ‘टू प्लस टू’ बैठक सुरू झाल्यानंतर संरक्षण, सुरक्षा क्षेत्रातील द्विपक्षीय भागीदारी नव्या उंचीवर पोहोचली. आमच्यात आतापर्यंत अशा तीन बैठकी झाल्या. प्रत्येक वेळी संबंध अधिक मजबूत करणारे मोलाचे संरक्षण करार झाले आहेत. यामुळे आमची सैन्य दले आणि संरक्षण उद्योगांमधील सहकार्याने काम करण्याची क्षमता वाढली आहे. नियमित स्वरूपात होणाऱ्या लष्करी सरावांमधील सखोलताही आम्ही वाढवला आहे. २०१९मध्ये घेतलेला त्रिस्तरीय सराव आणि जपानबरोबरच्या मलबार नौदल सरावात ऑस्ट्रेलियाचाही समावेश करणे ही त्याचीच उदाहरणे. या आणि इतर सकारात्मक घडामोडींकडे पाहता, भारत-अमेरिकेदरम्यान असलेल्या संरक्षण संबंधांची तुलना इतर कोणत्याही देशांमधील संबंधांशी होऊ शकत नाही. भारत सीमेवर चीनच्या आक्रमकतेशी झुंजत असताना आमचा समन्वय महत्वाचा ठरला. 

संरक्षण क्षेत्रात दाखविली तशी इच्छाशक्ती आम्हाला आर्थिक क्षेत्रातही दाखवावी लागेल. आमच्यातील व्यापार आणि गुंतवणुकीचे प्रमाण सातत्याने वाढत असले तरीही ते अद्याप अपेक्षित उंचीवर पोहोचलेले नाही. २०१९मध्ये वस्तू आणि सेवांचा द्विपक्षीय व्यापार १४६.१अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला होता. २००१मधील २०.७अब्ज डॉलरच्या तुलनेत ही वाढ प्रचंड आहे. भारताच्या एकूण निर्यातीपैकी जवळपास १६टक्के निर्यात अमेरिकेला होते. अमेरिका हा भारताचा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार देश आहे आणि भारत देखील अमेरिकेचा बारावा सर्वांत मोठा भागीदार देश आहे. थोडक्‍यात सांगायचे तर, भारतातील रोजगारनिर्मिती, ग्राहकांना पर्याय उपलब्ध करून देणे, तंत्रज्ञान देवाणघेवाण आणि आर्थिक स्तर उंचावणे याबाबतीत अमेरिकेचे योगदान सर्वांपेक्षा अधिक आहे. 

ऊर्जा क्षेत्रही भागीदारीचा एक मोठा आधारस्तंभ ठरत आहे. ऊर्जा क्षेत्रातील धोरणात्मक भागीदारीला २०१८मध्ये सुरुवात केली. दोन्ही देशांच्या सरकारांनी दिलेल्या पाठबळामुळे अमेरिका हा भारताचा महत्त्वाचा ऊर्जास्रोत बनला आहे. २०१९च्या अखेरीपर्यंत, अमेरिकेतून कोळशाची सर्वाधिक निर्यात भारताला होत होती. याशिवाय, अमेरिकेकडून कच्च्या तेलाची खरेदी करणारा भारत हा चौथ्या क्रमांकाचा, तर द्रवरुप नैसर्गिक वायू खरेदी करणारा सातव्या क्रमांकाचा देश बनला आहे. या व्यवहारांमुळे भारताला ऊर्जा स्रोतांमध्ये अनेक नवे पर्याय उपलब्ध झाले आहेत. सध्याच्या घडीला अमेरिकेतील ऊर्जा क्षेत्रातील जवळपास शंभर कंपन्या भारताबरोबर व्यवहार करत आहेत. 

आरोग्य क्षेत्रात मोलाची साथ 
आरोग्य आणि जैववैद्यकीय क्षेत्रातील संशोधनालाही दोन्ही देशांनी प्राधान्य दिले आहे. कोरोना काळातही त्याचा फायदा झाला. अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रातील (सीडीएस) तज्ज्ञांनी भारताच्या प्रयत्नांना तांत्रिक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले. रुग्णांशी संपर्क आलेल्यांचा शोध घेणे, चाचण्या घेणे आणि आरोग्य केंद्रांमधील संसर्ग रोखण्याला आळा घालणे याबाबत अमेरिकेने भारताला सहकार्य केले. ‘सीडीएस’ केंद्रांमधून मार्गदर्शन घेतलेले हजारो भारतीय युवक कोरोनाविरोधातील लढाईत आघाडीवर आहेत. याशिवाय, लस विकसीत करण्यासाठी आणि कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठीही अमेरिकी आणि भारतीय शास्त्रज्ञ एकत्र आले. सुरक्षित वैद्यकीय पुरवठा साखळी निर्माण करण्यासह आरोग्य क्षेत्रात आणखी बराच वाव आहे. या सहकार्यामुळे अमेरिका आणि भारतातीलच नव्हे, तर जगातील लोकांच्या आरोग्यात सुधारणा झाली आहे. भारत व अमेरिकेसारख्या लोकशाहीवादी देशांत जनतेचा आवाज गांभीर्याने ऐकला जातो. दोन्ही देशांच्या जनतेदरम्यान असलेला संवाद हा आमच्यातील संबंधांचा भक्कम पाया आणि प्रेरणादायी स्रोतही आहे. हे संबंध असेच कायम ठेवणे दोघांसाठीही आवश्‍यक असून हिंद-प्रशांत प्रदेशातील मुक्त आणि खुल्या वातावरणासाठीही गरजेचे असल्याचे दोन्ही देशांच्या नेत्यांनी ओळखले आहे. त्यानुसार त्यांनी पावले उचलल्याने दोन्ही देशातील सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी सशक्त,सकारात्मक ठरत आहे. 

गेल्या चार वर्षांत आम्ही एकत्रितपणे जे साध्य केले आहे, त्याबाबत मी समाधानी आहे. मला खात्री आहे की अमेरिकेतील पुढील सरकार भारताबरोबरील मैत्रीची हीच परंपरा कायम ठेवेल. आधीच्या सरकारने विकसित केलेल्या भारताबरोबरील संबंधांच्या आधारावरच नंतरच्या सरकारने हे संबंध अधिक दृढ केले आहेत. 

अनुवाद : सारंग खानापूरकर
(लेखक अमेरिकेचे भारतातील राजदूत आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.