अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आळंदी येथे गेल्या सात दिवसांपासून गीताभक्ती महोत्सव सुरू आहे. देशभरातील साधू, महंत, मुनी, महाराजांनी या महोत्सवात उत्स्फूर्त सहभाग घेतला. रविवारी (ता. ११) या अमृत महोत्सवाचा समारोप होणार आहे.
श्रीस्वामी गोविंददेव गिरजी हे संन्यस्त असूनही कठोर नाहीत. विरक्त असूनही भावस्निग्ध, विश्वसंचारी असूनही श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे पदाश्रित आहेत. स्वतःला वारकरी म्हणवून घेण्यात धन्यता मानणाऱ्या श्रीस्वामीजींना भगवंतांनी व संतांनी दीर्घायुरारोग्य प्रदान करावे, ही प्रार्थना!
- चैतन्य महाराज देगलूरकर, पंढरपूर
संतांचा अवतार जगदोद्धारासाठी असतो. मानवी जीवन समाधानी व्हावे, शांत, तृप्त व्हावे म्हणजेच परमतत्त्वाशी समरस व्हावे, ही संतांची प्रामाणिक आंतरिक तळमळ असते. त्यासाठीच ते अवतरित होतात.
अज्ञानतमसामध्ये सत्यासत्य, उचिनानुचित, आत्मा-अनात्मातेच्या विवेकाची दृष्टी हरवून बसलेला जीव क्षणिक आणि वैषयिक सुखाला आपल्या जीवनाचे ध्येय मानून त्यासाठी कराव्या लागणाऱ्या धावपळीला पुरुषार्थ मानतो.
याचा परिणाम म्हणून प्राप्त होणाऱ्या जीवनाच्या अधःपतनाचे आणि दुःखमय संसरणाचे त्याला भान नसले, तरी त्यातून होणारी नैतिक घसरण, निर्माण होणारे धर्म आणि कर्मबुद्धीचे दौर्बल्य आणि परिणामतः पुनःपुन्हा बिघडणारे सामाजिक स्वास्थ्य मात्र संतांना पाहावत नाही, सहन होत नाही. म्हणून जिवाला तत्त्वज्ञानाचा बोध देण्यासाठी, समाजातील नष्टप्राय होत असलेल्या जीवनमूल्यांच्यी आचार व विचारातून पुनर्बांधणी करून सशक्त समाजनिर्मितीसाठी संतांचे अवतरण होत असते. श्रीज्ञानेश्वरमहाराज म्हणतात,
‘का जगाचे आंध्य फेडितु।
श्रियेची राऊळे उघडितु।
निघे जैसा भास्वतु । प्रदक्षिणे॥
तैसी बांधिली सोडित। बुडाली काढित ।
साकडी फेडित ।आर्ताचिया ॥’
हेच संतांच्या अवताराचे रहस्य होय. संतांचा विचार मनाला पटावा, बुद्धिने निश्चित व्हावा त्यातून अद्वैतत्वे तो परमात्मा भेटावा यातच मानवी जीवनाची धन्यता, इतिकर्तव्यता असते. यासाठीच संत आणि संतांचे वाङ्मय निर्माण होत असतात.
संतांनी आपल्या चरित्रातून दाखविलेला आचार आणि आपल्या वाङ्मयातून प्रतिष्ठित केलेला विचार यांच्या समन्वयातून जीवन ‘मानवी’ होते, समृद्ध होते. संतांच्या चरित्राचे आणि वाङमयाचे श्रद्धेने, विश्वासाने परिशीलन,
चिंतन आणि आचरण करून संतांच्या स्थानापर्यंत पोहोचता येते, हे दाखविणारे संतानुगामी विचारशील जीवनाच्या अभिव्यक्तीचे सातत्य हेही भारतीय परिपक्व जीवनशैलीचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. संतांच्या मागे जाऊन जीवनाच्या धन्यतेची परंपरा भारतीय संस्कृतीमध्ये आहे. महाभारतामध्ये,
‘तर्कोऽप्रतिष्ठा श्रुतयो विभिन्ना
नैको ऋषीर्यस्य मतं प्रमाणम्।
धर्मस्य तत्वं निहितं गुहायां
महाजनो येन गतः स पन्थाः ॥’
असे म्हटले आहे. याचा अर्थ संतांचे अंधानुकरण करावे, असा होत नाही. कारण तर्क, श्रुती, ऋषीवचने, धर्म यातील सूक्ष्मता सामान्य जिवास कळत नसली तरीही ज्यांना ती समजते आणि विचारपूर्वक जे आचरणातही आणतात, त्यांनाच ‘महाजन’ असे संबोधले जाते. त्यांनी प्रशस्त केलेल्या पथावरून जाऊन आपलेही तसेच कल्याण होते. श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
‘परी श्रुतीस्मृतीचे अर्थ । जे आपण होऊन मूर्त।
अनुष्ठाने जगा देत । वडिल जे जे।।
तयांची आचरती पाऊले।
पाऊनि सात्त्विक श्रद्धा चाले।
तो तेचि फळ ठेविले। ऐसे लाहे ॥’
पण हे अनुगमन करीत असताना विचाराचे स्थैर्य आणि देश, काल, व्यक्त्यनुरूप आचारातील सहजता आणि परिणाम दृष्टीने करावे लागणारे बदल हे संतवाङ्मयाच्या प्रगल्भ अभ्यासाचे लक्षण मानले जाते. जो अभ्यास, उपदेश पुढील पिढ्यांसाठी पथदर्शक ठरतो. श्रीज्ञानेश्वरमहाराज म्हणतात,
‘वेदमार्गे मुनी गेले त्याचि मार्गे चालिलो ।
न कळेचि विषय अंधा म्हणोनि उघड बोलिलो ।
चालता धनुर्धरा तरंगाकारी हारपलो।
ज्ञानदेव निवृत्तीचा द्वैत सर्व निरसलो ॥’
अशा प्रकाराने संत विचारांचा मागोवा घेत जे आपले जीवन व्यक्ती व समाज कल्याणासाठी व्यतीत करीत आहेत, त्यामध्ये सांप्रत काळामध्ये स्वामी श्रीगोविंददेव गिरी हे अग्रणी आहेत. श्रीज्ञानेश्वरी, भागवत, गाथा, दासबोध आदि संतवाङ्मय मस्तकी धरून ‘अवघा हलकल्लोळ’ करण्याचे व्रतच त्यांनी स्वीकारले आहे, आणि ते ही
‘की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने ।
लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने ।
जे दिव्य दाहक म्हणुनी असावयाचे ।
बुद्ध्याची वाण करी हे धरिले सतीचे ॥’
या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वचनाप्रमाणे. गेली अनेक वर्षे अत्यंत निष्ठेने, प्रामाणिकपणाने आणि समर्पित भावनेने हे व्रत अव्याहत चालूच आहे. अशा विचारी जीवनाचा अमृतमहोत्सव या वर्षी संपन्न होतो आहे. या प्रवासामध्ये ‘वीतरागतेसारिखा सखा ‘श्रीस्वामीजींच्या सवे सहकारी ठरला आहे.
अत्यंत कुशाग्र बुद्धी, महापुरुषांचे आशीर्वाद, आपल्या सभोवती सर्वच क्षेत्रामध्ये घडणाऱ्या सूक्ष्म व दूरगामी परिणाम करणाऱ्या बदलांचे बारकाईने केलेले अवलोकन, शांत व परिपक्व बुद्धीने केलेले त्यांचे विश्लेषण, त्यावरील उपायांचे प्रगल्भ चिंतन,
त्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांची पराकाष्ठा, त्यासाठी आवश्यक प्रचंड सकारात्मक दृष्टिकोन, या सर्वांच्या मुळाशी समष्टी कल्याणाची तीव्र तळमळ आणि त्यासाठी केलेले निःस्पृह, कठोर तपाचरण या सर्वांचे एकेंद्रिकरण श्रीस्वामीजींच्या जीवनात झालेले दिसून येते.
या सद्गुणांमुळेच श्रीक्षेत्र आळंदीमध्ये संपन्न होणाऱ्या त्यांच्या अमृत महोत्सवासाठी भारतभरातून विविध संप्रदायाचे महानुभाव श्रीस्वामीजींच्या प्रेमासाठी एकत्रित आलेले आहेत. यातूनच श्रीस्वामीजींच्या कार्याच्या व्यापकतेचा परिचय व्हावा!
श्रीगीता परिवाराच्या माध्यमातून श्रीस्वामीजी देश, वेष, भाषा, प्रांत यांच्या मर्यादा ओलांडून पलीकडे गेले आहेत. भारतभरामध्ये त्यांच्याकडून चालविल्या जाणाऱ्या वेदपाठशाळा केवळ वेदरक्षणाच्या कर्तव्य भूमिकेतून चालविल्या जात नाहीत,
तर हे शब्दब्रह्म मानवाच्या दुःखनिवृत्तीच्या आणि आनंदावाप्तीच्या विचाराचे अधिष्ठान आहे या श्रद्धापूर्ण विश्वासाने चालविल्या जातात. श्रीस्वामीजी संन्यस्त असूनही कठोर नाहीत. विरक्त असूनही भावस्निग्ध आहेत. विश्वसंचारी असूनही श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे पदाश्रित आहेत. स्वतःला वारकरी म्हणवून घेण्यात धन्यता मानणाऱ्या श्रीस्वामीजींना भगवंतांनी दीर्घायुरारोग्य प्रदान करावे ही प्रार्थना!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.