कल्पनांचं साधर्म्य आणि प्रतिभा

वास्तविक त्या पेंटिंगचा आणि त्यावरून बनवलेल्या चित्रपटाचा दुरान्वयानंही संबंध नव्हता.
analogy of ideas and genius painting books novel critical thinking artist
analogy of ideas and genius painting books novel critical thinking artistsakal
Updated on

- राजेन्द्र खेर

कलेला जेव्हा ‘उपासने’चं अथवा ‘इबादत’चं स्वरूप प्राप्त होतं, तेव्हा असे कलावंत त्यांच्या कलेतून परम अनुभूती घेत असतात.

इंग्रजीत एक म्हण आहे, There is nothing new under the Sun! आपल्या मनात उद्भवणारे विषय किंवा कलावंतांच्या मनात उद्भवणाऱ्या कल्पना या पूर्णत: नव्या नसतात. ब्रह्मांडात त्यांचा कुठे ना कुठे आविष्कार झालेलाच असतो; होत असतो, असा या म्हणीचा अर्थ आहे.

जसा शब्द नष्ट होत नाही त्याप्रमाणे कल्पनाही नष्ट होत नाहीत. त्या विश्वभांडारात जमा असतातच, असं अभ्यासांती म्हणावं लागतं. एखादी कलाकृती निर्माण होण्यासाठी कारण ठरणारी प्रेरणा आणि कल्पना कुठून मिळेल हेही सांगता येत नाही. कोणत्याही कलाकृतीमागे कल्पनांचं साधर्म्य हे असतंच.

विनोदाची झालर लावलेले अनेक वास्तववादी चित्रपट बनवलेल्या चार्ली चॅप्लिननं Woman of Paris हा एक गंभीर चित्रपट तयार केला होता. त्याची कल्पना त्याला एका पेंटिंगवरून सुचली होती. वास्तविक त्या पेंटिंगचा आणि त्यावरून बनवलेल्या चित्रपटाचा दुरान्वयानंही संबंध नव्हता. पण ते पेंटिंग हे त्या चित्रपटासाठी कारण ठरलं. अशा तऱ्हेनं एखाद्या गोष्टीवरून दुसरी एखादी नवी कल्पना सुचणं यालाच इंग्रजीत Association of Ideas म्हणतात.

‘बिंदुसरोवर’ कादंबरी संदर्भात माझाही तसाच अनुभव होता. मित्रांसह मी पौर्णिमेच्या रात्री सिंहगड परिसरातल्या छोट्या शेतात बसलो होतो. सारा आसमंत माथ्यावर आलेल्या हेमंत ऋतूतल्या चंद्रप्रकाशात न्हाऊन निघाला होता.

समोरच्या निळसर करड्या डोंगररांगांवर चंद्रप्रकाशाची झिलई चढली होती. परस्परांमधे परावर्तन होऊन त्या डोंगररांगांमधे एक प्रकाशखंड तयार झाला होता. वेळेनुरूप मी पं. शिवकुमार शर्मा आणि पं. हरिप्रसाद चौरासिया यांनी संतूर- बासरीवर वाजवलेला राग ‘झिंझोटी’ अर्थात ‘व्हॅली-रीकॉल्स्’ सेलफोनवर लावला होता.

पखावजच्या साथीला पं. भवानीशंकर होते. समोरचं ते सुंदर चंदेरी दृश्य आणि ‘झिंझोटी’ रागाचे प्रशांत-अद्‌भुत स्वर यांच्या अनोख्या मिलाफात आम्ही सारेच एकप्रकारची दिव्य अनुभूती घेत होतो. ते अद्भुत वातावरण हीच ‘बिंदुसरोवर’ कादंबरी लिहिण्याची प्रेरणा ठरली! इतकंच नाही तर आधी न ठरवता या कादंबरीचं अद्भुत कथानक कागदावर उतरत गेलं! हा अनुभूतीचा विषय असतो.

प्रतिभेची स्पंदनं आखीवरेखीव कधीच नसतात! ती वैश्विक शक्तीकडून येतात. खरा कलावंत त्या प्रतिभासागरात हरवून जातो. या गोष्टी बुद्धिगम्य नाहीत; तर भावगम्य किंवा पुढे जाऊन आत्मगम्य असतात. भावमयतेतूनच आनंदावस्था प्राप्त होते.

कलासाधनेचा आनंद त्या प्रतिभावानाचा एकट्याचा असला तरी त्याची अनुभूती ऐकणाऱ्यालाही मिळत असते. शब्दांनी तो व्यक्त करता येत नाही. अर्थात, एखाद्या कलावंताच्या अंगी जी कला असते तिला निदिध्यासानं फुलवण्याचं काम मात्र कलावंताला करावंच लागतं. त्यालाच तपश्चर्या म्हणतात.

तप आणि प्रतिभा यांच्या संगमातून साधनेचा - विशेषत: संगीतसाधनेचा विशुद्ध गोफ विणला जातो. प्राणी आणि वनश्री यांच्या जाणीवांमधूनही तो गुंफला जाऊ शकतो. अनेक शास्त्रज्ञांचे शोध हे याचे उदाहरण. पांडवांच्या वंशात जन्मलेला उदयन हा संगीतकार राजा पिसाळलेल्या हत्तींना वीणा वाजवून शांत करीत असे, असं वर्णन ‘बृहत्कथा’ आणि ‘कथासरित्सागर’मध्ये आहे.

भौतिक विश्वाचा गुणधर्म

थोडक्यात, मनात एखाद्या कल्पनेचा उद्भव होण्यासाठी दुसऱ्या कशाचा तरी आधार हा सहाय्यभूत ठरत असतो; आणि हाच भौतिक विश्वाचा मोठा गुणधर्म अथवा नियम म्हटला पाहिजे ! संगीत, साहित्य, काव्य, नाट्य, चित्रपट, चित्रकला, वास्तुकला अशा अनेक निर्मितीच्या क्षेत्रांमधे कोणता ना कोणतातरी आधार असतो.

मग त्यात आकाश, ग्रह-तारे, वृक्षराई, निसर्ग, इतिहास, संस्कृती, प्रथा, रूढी, परंपरा, जीवनातले कडुगोड अनुभव, पुस्तक, शास्त्रं अशा अनेक गोष्टी कलाविष्कारासाठी कारण ठरतात. हे असे इंद्रियांना जाणवणारे दृश्य-अदृश्य आधार जीवन समृद्ध करतात. आधारच काढून टाकले तर मानवी जीवनाला काही अर्थ उरणार नाही. उलट मनुष्य जितका कलागुण जोपासेल तितकं त्याचं जीवन सुंदर आणि समृद्ध होत जाईल.

सर्जनशीलतेचेही दोन भाग असतात. पहिला भाग म्हणजे ‘कला’ (art) आणि दुसरा म्हणजे ‘प्रतिभा.’ कला ही सरावानं येणारी गोष्ट असते; आणि कलेतूनच पुढे प्रतिभा फुलत जाते. मग तिथे कलावंताचा संकुचित अहंकार कमी होत जाऊन विशाल अहंकाराचा स्पर्श होऊ लागलेला असतो.

अर्थात, प्रतिभा म्हणजे परमतत्त्वाशी संपर्क होऊन जी कलाकृती कलावंताच्या माध्यमातून साकार होते तिचं अव्यक्त स्वरूप! अशावेळी कलावंताचा कलेमागचा अहंकार कमी होऊन विश्वव्यापी परम- प्रतिभा कलावंताच्या माध्यमातून खेळू लागलेली असते.

म्हणूनच एखादा प्रतिभावान लेखक-कवी, संगीतकार, चित्रकार किंवा शिल्पकार आपल्या हातून एखादी सुंदर कलाकृती घडल्यावर म्हणतो, ''मी'' तिथे नव्हतो; मी केवळ माध्यम होतो. ही कलाकृती माझ्या हातून घडून गेली!

अशी अनुभूती जेव्हा साहित्यिक / कवी / कलाकार / कलावंतांना मिळते तेव्हा प्रगट होणाऱ्या कलेत अथवा साहित्यकृतीत अचिंतनीय ईश्वरी प्रतिभेचं आविष्करण झालेलं असतं. या प्रकाराला मी गमतीनं ‘ईश्वरी प्रतिभेचं downloading’ म्हणतो!

पं. शिवकुमार शर्मा म्हणत, ‘मै संतूर बजाता नहिं; मै उपासना करता हूँ।’ उस्ताद सलामत अलीही म्हणत, ‘हम गाते नहिं, इबादत करते है।’ गानकोकिळा किशोरी आमोणकर म्हणतात, ‘संगीत हे साध्य नाही; साधन आहे- परमतत्त्वाकडे जाण्याचं!’ कलासाधना करताना अनेक कलावंतांची हीच धारणा असते.

त्यामुळे कलेला जेव्हा ‘उपासने’चं अथवा ‘इबादत’चं स्वरूप प्राप्त होतं, तेव्हा असे कलावंत त्यांच्या कलेतून परम अनुभूती घेत असतात. लहानवयातही अनेक मुलांमधे कलागुण दिसून येतात. या बाल-प्रातिभज्ञानाला इंग्रजीत child prodigy म्हणतात.

मग एखादा तीन/चार वर्षांचा मोझार्ट लहान वयातच गहन इंग्रजी क्लासिकल म्युझिक कंपोझ करू लागतो; तर बालगंधर्वांसारखा गायक प्रातिभज्ञान घेऊन जन्माला आलेला असतो. संत ज्ञानेश्वर महाराजांसारखे योगी सोळाव्या वर्षीच 'ज्ञानेश्वरी'तून गहन तत्त्वज्ञान असंख्य उपमा-अलंकारातून सांगून जातात; तर एखादा दा विन्सींसारखा महान चित्रकार आपल्या कलेतून गूढ 'कोडस्' रंगवून जातो.

कलासाधना करताना इंद्रियांच्या अनुभवांच्या पलीकडे जाणं साध्य झालं तर असीम आनंदाची अनुभूती मिळू लागते. त्याच्या वर्णनास शब्द पुरे नसतात. मात्र तोपर्यंतचं सारं कलाजीवन हे कल्पना -साधर्म्यावर अवलंबून राहणार असतं. मग एखादा होतकरू गायक कुणीतरी गायलेलं गाणं जसंच्या तसं सादर करतो किंवा एखादा चित्रकार कशाच्या तरी आधारानं चित्र काढतो.

अशा कलासाधनेतूनच प्रतिभेच्या विशाल प्रांताची दालनं उघडली जातात- तशी ती गेली पाहिजेत! म्हणून एखाद्या होतकरू कलावंतानं कलोपासना करताना सुरुवातीला कल्पना-साधर्म्याचा अवश्य आधार घ्यावा, तसा तो घ्यावाच लागतो.

पण तेवढ्यातच कला अडकून पडली, तर मात्र पुढे कलेचा विकास होत नाही. मग ती कला म्हणजे केवळ चार लोकांत कौतुकाचा विषय होतो एवढंच! याउलट आपल्या अंगभूत कलेला निदिध्यासात्मक तपाची जोड दिली आणि उपासना म्हणून जर कलेचा अभ्यास केला तर मग अनंत अशा परम-प्रतिभेची अनुभूती मिळू लागते. साधक कलावंतांच्या अनुभवातून आपल्याला हेच शिकायला मिळतं.

(लेखक साहित्यिक/कादंबरीकार आहेत.) rkher1961@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.