स्वतःच निर्माण केलेल्या दहशतवाद्यांच्या जाळ्यात अडकलेला पाकिस्तान. १९४७मध्ये भारताशी भांडून जिनांनी वेगळा केलेला हा देश. पण आज तो त्यांच्या स्वप्नातील पाकिस्तान राहिला आहे का?
जगातील इतर देशांना दहशतवादी पुरवणारा कारखाना म्हणजे पाकिस्तान. विविध जागतिक दहशतवादी संघटनांसोबत पाकिस्तानचे घनिष्ट संबंध. पण कधी कधी अशाच संघटना पाकिस्तानला अडचणीत आणतात. दोन वर्षांपूर्वी ३९ देशांच्या ‘फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स’(एफ.ए.टी.एफ)ने जगातील दहशतवादी संघटनांना छुप्या मार्गाने आर्थिक मदत पुरविणाऱ्या पाकसारख्या देशांना इशारा दिला. ‘काळ्या यादी’त जाण्याच्या भीतीने एकूण अटींपैकी २७ अटी पूर्ण करणे पाकिस्तानला भाग पडले.
एकीकडे ‘तुर्कस्तान इस्लामिक मूव्हमेंट’वर संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातली, तर दुसरीकडे ‘इस्लामिक मूवमेंट ऑफ़ उज्बेकिस्तान’ मध्य व पूर्व आशिया खंडात पसरु लागली. यातील काही संघटनांनी तर खुद्द चीनमध्येच छुपे हल्ले सुरु केले. हो-तान येथील हल्ल्यानंतर तर चीनचे मुखपत्र ‘चायना डेली’ने तर हो-तान हल्लेखोरांना पाकिस्ताननेच प्रशिक्षण दिल्याचा गंभीर आरोप केला. साऱ्या घटनानी चीन भड़कला. परिणामी, तत्कालीन आय.एस.आय. प्रमुख जनरल पाशा यांनी बीजिंगला धाव घेत चिनी राज़्यकर्त्यांची अक्षरशः मनधरणी केली. वर पकिस्तानमधील अशा संघटना खतम करु, असे आश्वासनही दिले.
चीनमधे सक्रिय असणाऱ्या अशा दहशतवादी संघटनांच्या कारवायांची गुप्त माहिती अखेर आय.एस.आय.ने चीनला पुरवायला सुरवात केली. एका संघटनेचा म्होरक्या हसनम हसूम याचा पाकिस्तानी लष्कराने अखेर खात्मा केला. अवघ्या काही महिन्यात सीरिया–तुर्कस्तान सीमेजवळील इदलिब प्रांतामधे लपलेल्या ‘इसिस’चा एक निर्माता अबूबकर-अल-बगदादी यालाही संपवण्यात आले. पण तोपर्यंत त्याने अनेक राष्ट्रांमधून ‘इसिस’चे प्रचंड जाळे पसरवले होते. ओसामाच्या हत्येनंतर लगेचच अमेरिकेतील एका प्रसिद्ध वृतसंस्थेच्या प्रतिनिधीला तीन दहशतवाद्यांनी पाकिस्तानातील मनसेहरा तालुक्यात दहशतवादी प्रशिक्षण केंद्र असल्याची उघड़ कबुली दिली.
खायचे आणि दाखवायचे...
धक्कादायक म्हणजे ही केंद्रे भारतविरोधी हल्ल्यांसाठी उघडली होती. पण यातील काही दहशतवादी परदेशात जाउन अल-कायदा, ‘इसिस’मधे सामील झाले. एवढेच काय पण दहशतवाद्यांना ज्यांनी प्रशिक्षण दिले ते पाकिस्तानी लष्करी अधिकारीसुद्धा निवृत्तीनंतर ‘हिज्बुत-ताहरीर’सारख्या दहशतवादी संघटनांमधे सामील झाले. ‘पाकचे दोन विद्यमान जनरल ‘अल-कायदा’ला छुपी मदत करीत असल्याची गोपनीय माहिती तत्कालीन लष्करप्रमुख कयानी यांना मी पुरविल्यामुळें लवकरच माझी हत्त्या होईल,’ असे में.जन.आमिर फैसल अलावी या लष्करी अधिकाऱ्याने नमूद केल्याचा गौप्यस्फोट लंडनच्या ''संडे टाइम्स’ ने केला. अवघ्या काही दिवसातच अलावींचा मृतदेह सापडला.
पाकिस्तानचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे. चार वर्षापूर्वी संयुक्त राष्ट्रांनी मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हफ़ीज़ सईद याला ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ घोषित करीत त्याच्यावर कारवाई करण्यासाठी पाकिस्तानवर दबाव आणला. परिणामी तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी आय.एस.आय.प्रमुख रिज़वान अख्तर यांना पाचारण करून हफ़ीज़ सईदमुळे जागतिक पातळीवर पाकिस्तानविरोधी वातावरण होत आहे, वेळीच आवर घाला म्हणून सुनावले. लाहोर येथील लेकरोडवरील क्वादी सिया मस्जिद येथे त्याला स्थानबद्ध करण्याचा देखावा पाकिस्तानने केला. पाकिस्तानचे परराष्ट्र धोरण हे केंद्र सरकार ठरवत नसून आय.एस.आय. व दहशतवादी संघटना ठरवतात हे अप्रत्यक्षपणे सिद्ध झाले. एव्हाना हफीझ सईदने बलोचिस्तान, थारपार्कर ई. ठिणी मिळून २ लाख अतिरेक्यांची फौज उभारल्याचे म्हणतात. दहशतवाद्यांशी संबंध नाही, असा पवित्रा पाकिस्तान घेतो. वास्तव वेगळेच आहे. शासन आणि प्रशासनात दहशतवाद्यांनी शिरकाव केला आहे. पाकिस्तानचे एक निवृत वरिष्ठ लष्करी अधिकारी कॅप्टन फरुक हरन एकदा चीनला गेले व म्हणे ‘ पाक लष्करासाठी’ ‘नाईट व्हिजन’ चष्म्यांची खरेदी करून आले.
विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी खुद्द राष्ट्राध्यक्षांचे सुरक्षा अधिकारी जातीने हजर होते. चष्म्यांची भरलेली बॅग कस्टम्स विभागाला स्पर्शही न करता थेट हरून यांच्या गाडीत टाकण्यात आली. कालांतराने कॅप्टन फरूक हरन हेच ‘हिज़्बुत तहरीर’ या अतिरेकी संघटनेचे सदस्य असल्याचा पुरावा पाकिस्तानी लष्कराच्या गुप्तचर खात्याला मिळाला. फरुक यांना त्वरित अटक करण्यात आली.
पाकिस्तानच्या धोरणाचा आणखी एक भाग म्हणजे अण्वस्त्रनिर्मिती. अमेरिकी पत्रकार डॉ.पॉल विलियम्स यांनी आपल्या ‘नेक्स्ट ९/११’ पुस्तकात अनेक गुप्त बाबींचा ऊहापोह केला आहे. पाकच्या अणुबॉम्बचे जनक डॉ.अब्दुल कादिर खान यांनी सुरवातीला काहुटा अणु केंद्रासाठी धार्मिक रंग देत सौदी अरेबियाकडून प्रचंड निधी मिळवला होता. तत्कालीन पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांनी क्षेपणास्त्र खरेदीसाठी डॉ.खान यांना गुप्तपणे उत्तर कोरियात पाठवले होते. स्वतःच निर्माण केलेल्या दहशतवाद्यांच्या जाळ्यात अडकलेला, १९४७मध्ये भारताशी भांडून जिनांनी वेगळा केलेला त्यांच्या स्वप्नातील पाकिस्तान आज राहिला आहे का?
(लेखक माजी आमदार व जागतिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.