'बोलक्या' नोटा नि सुगावा

Currency notes
Currency notes
Updated on

काळा पैसा हा काही केवळ नोटांच्या स्वरूपात नसतो. बेनामी स्थावर-मालमत्ता किंवा सोने ही स्वरूपेही काळ्या पैशाला उपलब्ध असतात. त्यांचे काय करायचे, हा स्वतंत्र प्रश्न आहे. आत्ता नोटांबाबत काय करता येईल? या मर्यादित विषयावर लक्ष केंद्रित करीत आहे. आपल्या सर्वांना हे लक्षात आले असेलच, की प्रत्येक नोटेवर एक अनन्य क्रमांक (युनिक आयडेंटिटी नंबर) छापलेला असतो. परवाच मी प्री-पेडचे पैसे भरायला बीएसएनएलमध्ये गेलो होतो. ते स्वीकारणाऱ्या मॅडमनी त्यांच्या एका रजिस्टरमध्ये मी दिलेल्या पाचशेच्या नोटेचा नंबर माझ्या नावापुढे लिहिला आणि माझी त्या पुढे स्वाक्षरी घेतली. ही काळजी त्या का घेत होत्या, हे मी त्यांना विचारले नाही. कारण त्याच वेळी माझ्या मनात एक कल्पना चमकली. तीच वाचकांपुढे मांडत आहे. 

आपल्याला हे माहीत आहेच, की खरेदी केलेल्या वस्तूंवर त्यांची किंमत बारकोड रूपात छापलेली असते किंवा सिनेमाच्या तिकिटावर चौकोनी कूट-आकृती छापलेली असते. याचा उपयोग त्या किमतीच्या आकड्याचे इलेक्‍ट्रोनिक वाचन करण्याकरता केला जातो व यामुळे बिलिंग झटपट होते, हा अनुभव आपण नक्कीच घेतलेला असेल. 

दुसरे असे की एटीएममध्ये किंवा बँकेतदेखील नोटा मोजणारे यंत्र असतेच. अशी कल्पना करा, की यंत्रात एक सुधारणा करून ते यंत्र प्रत्येक नोटेवरच्या तिच्या नंबराच्या बारकोडचे इलेक्‍ट्रोनिक 'वाचन'सुद्धा करेल. आता हे लक्षात घेऊया, की प्रत्येक व्यक्तीलाही अनन्य क्रमांक (युनिक आयडेंटिटी नंबर) आधारकार्डामुळे असतोच. कोणालाही नोट इश्‍यू करताना किंवा कोणाहीकडून नोट डिपॉझिट करून घेताना बँकेला अशी संधी असते, की कोणत्या नंबराची नोट कोणत्या नंबराच्या नागरिकाने भरली किंवा काढली हे नोंदवून घेता येईल. हे काम बारकोडमुळे यंत्राद्वारेच व वेगाने करता येऊ शकते. जर ही सुधारणा नोटा मोजणाऱ्या यंत्रात केली, तर काय घडेल ते आता पाहू. 

भरली कोणी, काढली कोणी... 
नोट आणि भरणारा/काढणारा यांची जोडी नोंदली गेली, तर हे डेटा-युनिट माहिती व्यवस्थेत शिरेल. अशा सर्व डेटाचे एकत्रीकरण केल्यावर प्रत्येक नोटेचे चरित्र; ती भरली कोणी आणि काढली कोणी, अशा नोंदींतून तयार करता येईल. नोटांच्या अशा एकेकीच्या चरित्रांच्या उपलब्धतेमुळे, कोणती नोट प्रदीर्घ काळ बॅंकेकडे 'फिरकलीच' नाही? व बाहेरच्या बाहेरच हिंडत राहिली हे कळू शकेल. अशा न फिरकणाऱ्या नोटा 'कोणाला' इश्‍यू केल्या होत्या, याचेही उत्तर मिळेल. अशा 'न फिरकणाऱ्या नोटा' काळ्या व्यवहारात शिरलेल्या असू शकतील, याची संभाव्यता लक्षणीय असेल. अर्थात हा फक्त एक सुगावा आहे, पुरावा नव्हे. 

एकमेकांत काळे व्यवहार करणारे लोक जर ही काळजी घेऊ लागले, की शक्‍यतो आपल्या-आपल्यात फिरणाऱ्या नोटांना बँकेकडे फिरकू द्यायचेच नाही. पण ही काळजी घेणे हाच एक सुगावा असेल. समजा त्या लोकांनी उलट काळजी घेतली, की शक्‍यतो अधूनमधून नोटेला बँकेद्वारा पवित्र करून घ्यायचे तर? त्यांना जास्त वेळा लॉंड्रिंग करावे लागेल व ज्याचा फायदा काही अंशी तरी पांढऱ्या-व्यवहारवाल्यांना होत राहील. 

हा उपाय निर्णायकपणे काळ्या पैशांच्या समस्येचे निर्मूलन करणारा नाही खरेच आहे; पण एकीकडे नोटेला शक्‍यतो बँकेत नेऊन आणा अशी प्रेरणा देणारा आणि सरकारला आज जी माहिती अजिबातच मिळत नाही, ती निदान सुगाव्यांच्या स्वरूपात मिळवून देणारा हा उपाय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.