पीळदार शरीर, भारदस्त व्यक्तिमत्त्व, लोकनेत्याला साजेशी नाटकी देहबोली, राकट-बिनधास्त वागणे, टेबलवर मूठ आपटत बोलणे आणि सोबत हजार-दीड हजारांची गर्दी सहज घेऊन निघणारा भाऊ जांबुवंतराव धोटे यांच्यासारखा नेता विरळाच.
वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी एकहाती सक्षमपणे रेटणाऱ्या या नेत्याचा करिष्मा असा होता की भाऊंनी हाक द्यावी आणि संपूर्ण विदर्भात "कर्फ्यू' लागावा. केंद्रात थेट इंदिरा गांधी यांच्या दरबारात; तसेच राज्याच्या राजकारणात शब्दाला वजन असण्याच्या काळात त्यांना विदर्भ राज्याची मागणी मान्य करून घेता आली नाही. ऐंशीच्या दशकानंतर भाऊंचा प्रभाव ओसरू लागला तसतशी वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी क्षीण होत गेली. बेधकड, वादळी भाऊ हे वेगळेच रसायन होते. जिवंतपणीच दंतकथा होण्याचे भाग्य फार थोड्यांना लाभते. भाऊ त्यातील एक.
राजकीय-सार्वजनिक जीवनात प्रवेश करण्याआधी शारीरिक शिक्षकाची नोकरी करणारे भाऊ हाडाचे राजकारणी कधीच नव्हते. अन्यथा केंद्रात वा राज्यात आपली क्षमता वारंवार सिद्ध केल्यानंतर मंत्री होणे त्यांच्यासाठी काही कठीण काम नव्हते. आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांच्या कॉंग्रेस पक्षासोबत धोटेप्रणित फॉरवर्ड ब्लॉकने युती केली होती. तेव्हा फॉरवर्ड ब्लॉकचे 22 आमदार विदर्भातून निवडून आले होते. या काळात भाऊंनी इंदिराजींना विदर्भ राज्य स्थापन करण्याच्या अटीवर मदत केल्याचे सांगितले जाते; परंतु तसे न झाल्याने भाऊंनी कॉंग्रेस सोडून विदर्भ जनता कॉंग्रेस स्थापन केली. यानंतर भाऊंचा राजकारण, समाजकारणातील प्रभाव ओसरत गेला आणि विदर्भाची मागणी कायमस्वरूपी मागे पडली. आपले अस्तित्व दाखवण्याच्या केवीलवाण्या प्रयत्नात भाऊ नंतर विदर्भाला उघड विरोध असलेल्या शिवसेनेच्या वळचणीला गेले. नागपुरात झालेल्या अधिवेशनात शिवसेनेत प्रवेश करताना आपण संयुक्त महाराष्ट्रवादी कसे आहोत, असे भाऊंना सांगावे लागले. ते हाडाचे राजकारणी नव्हते, असे म्हणायचे ते यामुळेच.
भाऊंचा प्रभाव ओसरल्यानंतर विदर्भ राज्याची मागणी थांबली आहे असे नाही; परंतु एकाही नेत्याला भाऊंनी या मागणीमागे जेवढी ताकद लोकांच्या रूपात रस्त्यावर उभी केली होती तेवढी करता आली नाही. अनेकांनी प्रयत्न करून बघितले; पण यातील कुणालाही याबाबतीत भाऊंची उंची गाठता आली नाही. म्हणूनच हा ढाण्या वाघ वेगळ्या विदर्भाचा पोस्टर बॉय होता, यापुढेही राहील.
|