निमंत्रणवापसीची डबलगेम 

निमंत्रणवापसीची डबलगेम 
Updated on

साहित्य संमेलनातील निवडणूक प्रक्रिया यंदा बंद करण्यात आली. अत्यंत पात्र असे लेखक अर्ज करून निवडणुकीस उभे राहण्यास तयार नसत व बाजूला राहत. म्हणून योग्यता पाहून सन्मानाने अध्यक्ष निवडले गेले. अरुणा ढेरे याची निवड स्वागतार्हच आहे. त्यांची संवेदनशीलता, लालित्य, संस्कृतीची जाण, परंपरा आणि नवता याचा मिलाफ या सर्व गोष्टी तर आहेतच. आणीबाणीतही त्या नागरी स्वातंत्र्यासाठी झटल्या, हे विशेष उल्लेखनीय आहे. कारण अघोषित आणीबाणी या अफवेने दिशाभूल करण्याचे काम सध्या जोरात चालू आहे.

नयनतारा सहगल यांना उद्‌घाटक म्हणून निमंत्रण देणे, ते परत मागे घेणे आणि ही बातमी येण्याआधीच सहगलबाईंचे भाषण मराठी भाषांतर होऊन समाजमाध्यमांवर फिरू लागणे या घटनांचा वेग लक्षात घेता हा विघ्न आणण्यासाठी केलेला बनाव नसेल कशावरून? अशी शंका आली तर त्यात फारसे वावगे ठरू नये. सहगलबाईंचे भाषण हे पूर्णतः राजकीय आहे. हिंदुत्ववाद्यांवर जे नमुनेदार आरोप असतात ते आरोप आणि मोदी-शहा यांनी जणू देशावर अघोषित आणीबाणीच लादली आहे हे अनेकांकडून केले जाणारे बेजबाबदार विधान एवढेच या भाषणातून व्यक्त होते. साहित्यिकांची गळचेपी कशी होते याची उदाहरणे त्या सोल्झेनित्सिन व ब्रॉडस्की ही देतात हा एक विचित्र विरोधाभास आहे. कारण समाजसत्तावादाचे भयानक रूप त्यातून दिसत असतानाच डावे व पुरोगामी लोक सहगलबाईंना अचानकपणे आणि जोरदारपणे उचलून धरताना दिसत आहेत. असा आभास निर्माण होतो आहे की जणू साहित्य महामंडळात एक मोदीविरोधी गट होता व त्या गटाने सहगलबाईंची निवड केली आणि नंतर मोदीप्रेमी गटाने उठाव करून निमंत्रण मागे घ्यायला लावले की काय? निमंत्रण देणे व मागे घेणे ही गोष्ट चूकच आहे. पण मागे घ्यायला लावण्यात मोदीप्रेमींचा हात असावा, असे सूचित करून मोदींवर खापर फोडणे हे या चुकीच्या आड दडून फारच चुकीचे कृत्य केले जात आहे. याला पार्श्वभूमीही तशी आहे.

अमेरिकेने एकदा मोदींना निमंत्रित केले होते. त्यांना निर्निमंत्रित (डिसइनव्हाईट) करा असा दबाव भारतातील तथाकथित विचारवंतानी आणला व निमंत्रण मागे घेतले गेले. या मोहिमेत सहगलबाई सामील होत्या. त्यामुळे त्यांनाही निर्निमंत्रित करून मोदीप्रेमींनी सूड काढला असावा, अशी समजूत सहजच होऊ शकते. परंतु असे गट व त्यांच्यातला संघर्ष बगैरे काहीच नसून एकाच व्यक्तीने निमंत्रण देणे, भाषण प्रसारित करणे आणि निमंत्रण मागे घेणे ही तीनही कृत्ये परस्पर करून टाकली आणि साहित्य महामंडळाला मोठ्या अडचणीत आणले. लगोलग श्रीपाद जोशी यांना मंडळातून राजीनामा देऊन बाहेर पडावे लागले. हे असा संशय निर्माण करणारे आहे की प्रकरण निर्माण करून त्या निमिताने अवॉर्डवापसी ब्रिगेड पुन्हा कार्यरत करण्याचा हा बनाव असावा. निमंत्रण मागे घेण्याचा निषेध केलाच पाहिजे. (कदाचित मुळात ते देण्याचाही निषेध करावा लागेल!) पण या सर्व प्रकारांत अरुणाताई किंवा संमेलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या लेखक, वाचक, समीक्षक वा प्रकाशक, यांचा काहीच दोष नाही. म्हणूनच संमेलनावर बहिष्कार घालण्याचे आवाहन जी मंडळी करीत आहेत ती वरील चार चुकांच्या पेक्षा मोठी चूक करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.