पश्‍चिमेस गुरू-शनीच्या शेजारी बुध

Solar System
Solar System
Updated on

गेल्या महिन्याच्या अखेरीस गुरू व शनीची महायुती झाली. युतीनंतर हे ग्रह एकमेकांपासून दूर होताना दिसतील. तसेच ते सूर्याकडे सरकत असल्याने लवकर लवकर मावळतील. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर बुध पश्‍चिम क्षितिजावर दिसू लागेल. तो सूर्यापासून दूर होत असल्याने क्षितिजावर उंच चढताना दिसेल. 

जानेवारी १० च्या सुमारास गुरू शनी या ग्रहाजवळच बुध पोहचेल व या तिघांचा छानसा त्रिकोण दिसू लागेल. यावेळी सर्वांत वरचा व तेजस्वी गुरू असेल. गुरूच्या खाली त्याच्या अकरापट मंद तेजाचा पिवळसर शनी असेल. तर शनीच्या डाव्या हातास बुध दिसेल. पुढील दोन दिवसात बुध या ग्रहांना मागे टाकत क्षितिजावर उंच चढताना दिसेल. शनी झपाट्याने सूर्याकडे सरकत २४ जानेवारी रोजी सूर्यामागे जाईल तर त्यापाठोपाठ गुरूची सूर्या बरोबर युती २९ तारखेला होईल. बुध मात्र क्षितिजावर उंच चढत २४ तारखेला सूर्यापासून दूरात दूर अशा स्थानावर पोचे.

ग्रह
बुध :
गेल्या महिन्याच्या अखेरीस बुधाची सूर्याबरोबर युती झाली होती. युतीनंतर बुध पश्‍चिम क्षितिजावर दाखल झाला आहे. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून दक्षिण पश्‍चिम क्षितिजावर गुरू शनीच्या खालच्या बाजूस बुध दिसू लागेल. बुध क्षितिजावर उंच चढत गुरू शनीच्या परिसरात पोहचत आहे. या तिन्ही ग्रहांचा छानसा त्रिकोण १० जानेवारी रोजी पाहता येईल. तिन्ही ग्रहांमध्ये गुरू सर्वात तेजस्वी दिसत असून त्यापेक्षा अडीचपट मंद तेजाचा बुध असेल. यानंतर बुध गुरू शनीला मागे टाकून क्षितिजावर उंच चढताना दिसेल. तो सूर्यापासून दूरात दूर अशा १९ अंशांना २४ जानेवारी रोजी पोहचेल. यावेळी तो सूर्यास्तानंतर सुमारे दीड तासाने मावळताना दिसेल. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शुक्र : पहाटे दक्षिण पूर्व क्षितिजावर तेजस्वी शुक्र दिसत आहे. या महिन्याच्या सुरूवातीस तो साडेपाचच्या सुमारास उगवत असून सूर्याकडे सरकत असल्याने उशिरा उगवत जाऊन महिना अखेरीस सूर्योदयापूर्वी पाऊण तास उगवताना दिसेल. महिन्याच्या प्रारंभी शुक्र वृश्‍चिकेच्या तांबूस अशा ज्येष्ठा ताऱ्याजवळ असेल. शुक्राचे ९६ टक्के प्रकाशित बिंब उणे ३.९ तेजस्वितेने चमकताना दिसेल. 

मंगळ : अंधार पडताच डोक्‍यावर व किंचित दक्षिणेकडे नारिंगी रंगाच्या मंगळाचा ठिपका दिसू लागेल. महिन्याच्या प्रारंभी रात्री पावणेदोन वाजता मावळणारा मंगळ महिना अखेरीस बाराच्या सुमारास मावळताना दिसेल. मंगळ मीन राशीत असून पूर्वेकडे सरकत मेषेत प्रवेश करताना दिसेल. मंगळाचे ८९ टक्के प्रकाशित बिंब ९ विकलांचे व ०.१ तेजस्वितेचे असेल. मंगळाजवळ युरेनसचा निळसर ठिपका १८ ते २२ तारखेला पाहण्याचा प्रयत्न करावा. चंद्रकोरी जवळ मंगळ २०-२१ जानेवारी रोजी दिसेल. 

गुरू-शनी : गेल्या महिन्यात संध्याकाळी पश्‍चिम क्षितिजावर चमकणारे गुरू व शनी या महिन्यात सूर्याकडे सरकत असल्याने फारच थोडा वेळ दिसतील. महिन्याच्या प्रारंभी पावणेआठ वाजता मावळणारा गुरू महिना अखेरीस संधी प्रकाशात दिसेनासा होईल. त्याची सूर्याबरोबर युती २९ तारखेला होईल. गुरू शेजारचा शनी वेगाने सूर्याकडे सरकत असल्याने तो गुरू अगोदरच दिसेनासा होईल. तो सूर्यामागे २४ तारखेला जात आहे. दोन्ही ग्रहांना पहावयाचे असल्यास जेथून दक्षिण पश्‍चिम क्षितिज पूर्ण खालपर्यंत दिसेल तेथून सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पहावे. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून दुर्बिणीचा वापर करून या दोन ग्रहांजवळच्या बुधाला देखील पाहता येईल. 

युरेनस - नेपच्यून : संध्याकाळी मेष राशीत युरेनस दिसेल. या महिन्यात तो मंगळ ग्रहाजवळ असल्याने सहज दिसू शकेल. जानेवारी १८ ते २२ दरम्यान युरेनस मंगळाच्या जवळ अवघ्या २ अंशावर दिसेल. मंगळ नारिंगी रंगाचा तर युरेनस निळसर रंगाचा असल्याने सहज ओळखता येईल. नेपच्यून कुंभ राशीतील फाय ताऱ्याजवळ दिसेल. त्याची तेजस्विता ७.८ आहे. 
 
उल्कावर्षाव : क्वाड्रान्टिडसचा उल्कावर्षाव ३ जानेवारी रोजी दिसतो. भूतप तारका समूहातील बीटा ताऱ्याकडून उल्का फेकल्या गेल्याचे दिसते. या वर्षी आकाशात चंद्र असल्याने फारशा उल्का दिसणार नाहीत. 

चंद्र - सूर्य : मार्गशीर्ष अमावस्या १३ जानेवारी रोजी तर पौष पौर्णिमा २८ जानेवारी रोजी होईल. चंद्र पृथ्वीजवळ (३,६७,३९० कि.मी.) जानेवारी ९ रोजी तर पृथ्वीपासून दूर (४,०४,३६०) जानेवारी २१ रोजी पोचेल. 

पृथ्वी सूर्याभोवतालच्या कक्षेतील सूर्याजवळच्या स्थानावर २ जानेवारी रोजी पोहचेल. या स्थानास ‘उपसूर्य’ किंवा ‘पेरिहेलियन’ म्हणतात. या दिवशी पृथ्वी नेहमीपेक्षा ३ टक्‍क्‍याने जवळ येते. म्हणजेच आपल्यापासून सूर्य १,४७,०९३,६०२ कि.मी. अंतरावर असतो. 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.