देवतांना आवाहन करण्यासाठी आपल्या मेंदूत देवतांचे स्थान उत्पन्न केलेले असते. या स्थानांपैकी श्रीदत्तात्रेयांचे स्थान परमोच्च आहे.
देवतांना आवाहन करण्यासाठी आपल्या मेंदूत देवतांचे स्थान उत्पन्न केलेले असते. या स्थानांपैकी श्रीदत्तात्रेयांचे स्थान परमोच्च आहे. या ठिकाणी समाधीचा अनुभव घेता येतो, समत्व साधता येते आणि जीवन आरोग्यमय, आनंदमय करता येते. अशा या श्रीदत्तात्रेयांचे ज्या दिवशी विश्र्वाला भान झाले तो त्यांचा जन्मदिवस म्हणजे श्रीदत्तात्रेयजयंती.
जीवनामध्ये त्रिसूत्री महत्त्वाची असते. आयुर्वेदामध्ये त्रिदोष असतात; मेंदूचे डावा-उजवा आणि मागचा असे तीन भाग मानले जातात; पृथ्वी, स्वर्ग व पाताळ अशा अस्तित्वाच्या तीन पातळ्या समजल्या जातात; ब्रह्मा, विष्णू व महेश हे तिघे सृष्टीव्यापार चालवतात आणि अशा प्रकारे तीनाचे हे गणित सातत्याने सुरू असते. सद्गुरू श्रीदत्तात्रेय यांना सुद्धा ‘त्रिगुणात्मक त्रिमूर्ती’ या नावाने संबोधले जाते. कारण जीवनाच्या तीनही बाजूंवर त्यांचा प्रभाव असतो. एक बाजू शरीराचे भौतिक व्यापार चालवते. दुसरी बाजू भावनिक व्यवहार चालवते आणि तिसरी बाजू सर्वांना अंतर्भूत करून सर्वांच्या कल्याणाचा म्हणजेच अध्यात्माचा विचार करते. या तीनही बाजू जेव्हा संतुलनात असतात तेव्हा त्या एका बिंदूत येऊन मिळतात आणि तो बिंदू या तिन्ही बाजूंवर लक्ष ठेवू शकतो, इतकेच नाही तर तिन्ही बाजूंचा एकसमयावच्छेदे करून निर्णय घेऊ शकतो.
परंतु इंद्रिये असे होऊ देत नाहीत, ती एका कुठल्यातरी बाजूला ओढत ठेवतात आणि माणसाचे जीवन भरकटत जाते. असे होऊ नये म्हणून सर्वसमावेशक मार्गदर्शनाची गरज असते. हे मार्गदर्शन करणारा आपला मेंदू असतो आणि तो सद्गुरुंच्या नियंत्रणाखाली असतो. मनुष्याचा मेंदू म्हणजेच मनुष्याचे व्यक्तिमत्त्व. मनुष्याची ओळख ही त्याच्या मेंदूची ओळख असते. स्वतःच्या वस्तू ओळखणे, स्वतःचे घर लक्षात ठेवणे अशी अनेक कामे मेंदू करतो व त्यानुसार शरीराकडून कृती घडवतो. या सर्व कृतींसाठी आवश्यक असणाऱ्या चेतासंस्थेच्या जाळ्यावर मेंदूच नियंत्रण ठेवतो. कोणतीही शारीरिक कृती असो, हृदयाचे ठोके चालू ठेवण्याची असो, अन्नपचनाची असो, धावण्याची असो वा दुसऱ्यावर हात उगारण्याची असो अशा वेगवेगळ्या कृती व्हाव्यात यासाठी मेंदूत वेगवेगळी विभागव्यवस्था असते.
जो शिकवतो तो शिक्षक किंवा गुरू. मेंदू एक प्रकारे गुरूचे किंवा शिक्षकाचे कामही करत असतो. मेंदूचा डावा भाग भावनाप्रधान आणि उजवा भाग तर्कप्रधान असतो, तर मागचा भाग समतोल साधण्यास कारणीभूत असतो. परंतु या तिन्ही विभागांना मिळून विश्र्वाचे ज्ञान घेण्याची तसेच ते ज्ञान अनुभवण्याची क्षमता असते. परमशांतीचा अनुभव घेण्याची क्षमता या तीन भागांमध्ये असल्यामुळे पूर्ण मेंदू हा जणू श्रीसद्गुरुंचे काम करतो. मेंदू हा गुरूच आहे म्हणजे तो मोठा आहे. शरीरात सर्वांत वरच्या बाजूला त्याचे स्थान आहे. मेंदूमुळेच सर्व जीवनव्यापार चालू शकतो. अशा या मेंदूवर सद्गुरुंचा वरदहस्त असतो.
श्रीमद्भगवद्गीतेत म्हटले आहे, ‘समत्वं योग उच्यते’. मेंदूचे तीन भाग असोत, जीवनाच्या तीन बाजू असोत, त्यांचे संतुलन झाल्यास परमयोग-स्वतंत्रतायोग-शांतियोग-मोक्षयोग साधला जातो. हे जेव्हा घडते तेव्हा योगीश्र्वर असलेल्या श्रीदत्तात्रेय यांचा अवतार होतो आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी मानवाला त्याच्या मेंदूत असणाऱ्या जाणिवेच्या अत्युच्च बिंदूवरून तिन्ही भागांना नियंत्रित ठेवावे लागते.
सद्गुरूंचा महिमा
श्रीदत्तात्रेय हे स्मर्तृगामी आहेत असे म्हटले जाते, म्हणजे स्मरण केल्याक्षणी ते प्रकट होतात. आपली जाणीव, संपूर्ण विश्र्वाशी जोडलेले अस्तित्व असे जे काही आपण म्हणतो ते सद्गुरुंच्या उपस्थितीमुळे किंवा त्यांचे स्मरण केल्याबरोबर लक्षात येते. वस्तुतः त्यांच्या प्रभावानेच सर्व चालत असते, परंतु त्याकडे आपले लक्ष नसते. दिव्याचा उजेड किती पडला, बल्ब किती मोठा आहे, किती दाबाने वीज येते आहे वगैरे गोष्टी आपल्याला समजतात, परंतु यामागे असलेल्या विजेकडे आपले लक्ष जात नाही. परंतु एखादा पंखा चालत नसला तर वायरमन सॉकेटमध्ये टेस्टर टाकून तेथे वीज आहे की नाही, हे प्रथम पाहतो.
ज्याप्रमाणे वीज आहे की नाही हे पाहणे आवश्यक असते तसे प्रत्येकाने जाणीवेवर लक्ष ठेवून, सद्गुरुंच्या चरणी लक्ष ठेवून कार्य करावे, ते कार्य शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक या कुठल्याही प्रकारचे असो. केलेले कार्य जोपर्यंत परमोच्च जाणिवेला, सद्गुरुंच्या चरणी अर्पण होत नाही तोपर्यंत आयुष्य भटकते, आयुष्यात दोष उत्पन्न होतो. अशा वेळी कुठल्याही प्रकारचे समाधान न मिळाल्यामुळे तीच ती गोष्ट पुन्हा पुन्हा करावीशी वाटते. पुन्हा पुन्हा कराव्या लागणाऱ्या गोष्टींतून किंवा पुन्हा पुन्हा जगाव्या लागणाऱ्या आयुष्यातून सुटका सद्गुरुंमुळे होऊ शकते. पुनर्जन्म घ्यावा लागला तरी हरकत नाही परंतु पुन्हा पुन्हा तेच अनुभव घेण्याची, त्याच अडचणींत जगण्याची आवश्यकता नाही. यातून सुटका सद्गुरुंच्या मार्गदर्शनामुळे होऊ शकते.
परमेश्वराचे स्मरण
‘ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे’ म्हणजे प्रत्येक गोष्ट करत असताना परमेश्र्वराचे स्मरण असावे. उदा. फूल तोडत असताना फूल तयार होण्यासाठी असलेला परमेश्र्वरी हात दिसावा, अन्न खात असताना ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’ हे लक्षात यावे. अशा तऱ्हेने प्रत्येक वेळी परमेश्र्वरावर लक्ष ठेवले तर आयुष्य आनंदमय होऊ शकते. देवतांना आवाहन करण्यासाठी आपल्या मेंदूत देवतांचे स्थान उत्पन्न केलेले असते. या स्थानांपैकी श्रीदत्तात्रेयांचे स्थान परमोच्च आहे. या ठिकाणी समाधीचा अनुभव घेता येतो, समत्व साधता येते आणि जीवन आरोग्यमय, आनंदमय करता येते. अशा या श्रीदत्तात्रेयांचे ज्या दिवशी विश्र्वाला भान झाले तो त्यांचा जन्मदिवस म्हणजे श्रीदत्तात्रेयजयंती. ज्या दिवशी द्वैत संपले, असूया संपली तेव्हा अत्री ऋषी आणि अनसूयेच्या घरात श्रीदत्तात्रेयांचा जन्म झाल्याचा हा दिवस. आयुष्य आनंदमय, आरोग्यमय व्हावे यासाठी सद्गुरुंचा आशीर्वाद कसा उपयोगी पडेल यादृष्टीने उपासना करायचा हा दिवस व त्यानिमित्ताने श्रीदत्तात्रेयांचे विशेष स्मरण.
(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.