साक्षात परमपुरूष परमात्मा भौतिक शरीर धारण करून श्रीकृष्णांच्या रूपात ज्या दिवशी पृथ्वीवर अवतीर्ण झाले, तो हा आजचा दिवस. श्रीकृष्णांसारखा आश्र्वस्त करणारा योगेश्र्वर दुसरा कोणी नाही.
श्रीमद् भगवद्गीतेतील हा श्र्लोक म्हणजे याचे जणू प्रतीकच,
सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज।
अहं त्वा सर्वपापेभ्यो
मोक्षयिष्यामि मा शुचः ॥१८-६६॥
भगवंतांचे हे सांगणे म्हणजे त्यांनी मनुष्याला दिलेले त्रिकालाबाधित आश्र्वासन होय. ऐन महाभारताच्या युद्धभूमीवर श्रीकृष्णांनी अर्जुनाला आणि पर्यायाने अर्जुनासारखी भक्ती आणि कर्मपारंगता असणाऱ्या प्रत्येकाला या श्र्लोकातून आश्र्वस्त केलेले आहे. या ठिकाणी त्यांनी आश्र्वासन दिलेले आहे की, सर्व धर्मांचा अर्थात सर्व कर्माच्या आश्रयांचा त्याग करून मला वासुदेव परमात्म्याला अनन्यभावाने शरण ये, मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन, तुला मोक्ष देईन, तू काळजी करू नकोस.
येथे एक मुद्दा महत्त्वाचा आहे, की भगवंतांनी सांगितलेला हा मोक्ष मरणोत्तर मिळणाऱ्या चक्रासारखा नाही. मोक्ष मिळालेली व्यक्ती परमात्म्यात विलीन होऊन गेली तर काय उपयोग? चमचाभर पाण्याला ‘तू गोड आहेस, छान आहेस’ असे त्याला चमच्यात असेपर्यंत सांगणे आवश्यक असते.
ते पाणी नदीत टाकल्यावर मग त्याची स्तुती केली तर काय उपयोग? तेव्हा मोक्षाचा आनंद याचि देही घेता येतो. ‘मोक्षयिष्यामि मा शुचः’ अशी ग्वाही देताना मोक्ष मिळालेल्याला त्याचा आनंद घेता येईल, आपल्याला मोक्ष मिळालेला आहे हे कळेल हे सुद्धा विश्र्वासाने सांगणारे श्रीकृष्णांसारखे दुसरे कोणी नाही.
भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद्भगवद्गीतेमार्फत जीवन जगण्याची सोपी पद्धत दाखवली म्हणून ते पूर्णावतार, पुरुषोत्तम, योगेश्र्वर म्हणवले जातात. स्त्री-पुरुष, लहान-थोर वगैरे कुठलाही भेद न ठेवता ते सगळ्यांमध्ये वाढले आणि ठरल्यानुसार त्यांनी आपले अवतारकार्य पूर्ण केले.
एखाद्याने एखादा धर्म स्थापन करावा, पुढच्याने त्या विचारांना छेद देऊन दुसरा धर्म स्थापन करावा, पुन्हा काही दिवसांनी तो धर्म जाऊन त्याजागी काही नवीन संकल्पना दृढ व्हावी हे जे काही कालचक्र चालत राहते त्याला श्रीकृष्ण हे एकमेव अपवाद आहेत, कारण त्यांनी सांगितलेल्या समानतेच्या तत्त्वज्ञानाला आजपर्यंत कोणी छेद दिलेला नाही.
प्रत्येक तत्त्वज्ञानातील, मग तो सांख्ययोग असो, भक्तियोग असो, कर्मयोग असो, त्यातल्या चांगल्या-वाईट गोष्टींची चर्चा करून मरेपर्यंत कर्तव्यकर्म करतच राहिले पाहिजे व त्यातच खरे सुख आहे हे जे जीवनाचे परमसत्य आहे ते सांगणारे केवळ श्रीकृष्ण होत.
हजारो वर्षांपासून श्रीकृष्णांची महती गायली जाते, हजारो वर्षांपूर्वी जन्म झाला तरी आजही सगळीकडे श्रीकृष्णांचा जन्मदिवस साजरा केला जातो तो याचमुळे! श्रीकृष्ण होते तेव्हा त्यांच्यावर जेवढे प्रेम केले जात होते, तेवढेच प्रेम त्यांच्यावर आजही करणारे अनेकजण आहेत.
वसुदेव आणि देवकी यांच्या या पुत्राचा जन्म झाला कारागृहात. त्याआधी त्यांची सात मुले कंसाने मारली. आठवा मुलगा श्रीकृष्ण, पण प्रत्यक्ष परमात्मा जन्माला आल्या आल्या, दुष्ट व विघ्न आणणाऱ्या सर्वांना झोप लागली. साखळदंड तुटले, कारागृहाची कुलुपे उघडली. परमात्म्याचा स्पर्श झाल्याक्षणी सर्व बंधने संपली.
कृष्णाला टोपलीत ठेवून, यमुना ओलांडून वसुदेव नंदग्रामी गेला, श्रीकृष्णाला यशोदेच्या कुशीत ठेवले व तिच्या कुशीत असलेल्या मुलीला घेऊन कारागृहात परत आला. ही मुलगी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून प्रत्यक्ष माया होती. त्यामुळे तिला घेऊन वसुदेव कारागृहात आल्या आल्या परत सर्व कुलपे लागली, साखळदंड बांधले गेले. बंधने नेहमीच मायेची असतात.
अपत्याचा जन्म झाल्याचे कळताच कंस आला व त्याने मुलीला ओढले. देवकीने खूप सांगून पाहिले, ही तर मुलगी आहे. पण त्याने ऐकले नाही. कंस तिला दगडावर आपटणार एवढ्यात ती त्याच्या हातातून निसटून गेली. आपण बाह्यसुखाच्या म्हणजे मायेच्या मागे लागतो पण ते हातात आल्यावर केव्हा सटकून जाते हे कळत नाही.
लक्षात येते की, आपल्या हातात काहीच लागलेले नाही. एखाद्याला एक कोटीचे बक्षीस लागले तर तो हरखून जातो. या पैशांचे काय करावे, काय नाही याचा निर्णय होण्यापूर्वीच त्याच्या मनात विचार येतो, एखादी चांगली जमीन विकत घ्यायची झाली तर एक कोटी थोडेच पुरणार आहेत?
ज्या क्षणी मनात हा विचार येतो, त्या क्षणी एक कोटी मिळाल्याचा आनंद संपलेला असतो व तो अजून एक कोटी मिळविण्याच्या पाठीमागे लागतो. तर मायारूपी मुलगी आकाशात अदृश्य होता होता आकाशवाणी झाली, “मी तर माया आहे, मला कधी मारता येईल का? (मायेला मारायचे नसते, मायेचे उल्लंघन करायचे असते) तुझा खरा शत्रू जिवंत आहे व तो वाढतो आहे'.
कंसाच्या चिंतेत भर पडली पण त्याचवेळी नंदग्रामात मात्र मोठा उत्सव झाला. असे म्हणतात की या रात्रीनंतर लोक शांतीने झोपायला लागले. श्रीकृष्णांचा जन्म सामान्य झाला पण जन्मापूर्वीच लोक त्याला असामान्यत्व देऊन मोकळे झालेले होते. अर्थात याला कारणेही अनेक होती. श्रीकृष्णांचे बालपण अनेक लीलांनी भरलेले होते.
बालवयातही त्यांनी समाजावर येणाऱ्या संकटांचा परिहार केला, दुष्टांचा संहार केला. पूतना नावाच्या एका ग्रहरोगामुळे लहान मुलांना आजार वा मृत्यूही येऊ शकतो, तो मुळातून घालविण्याचा प्रयत्न श्रीकृष्णांनी अगदी बालपणी केला. ठिकठिकाणी असलेले दोष दूर करण्यासाठी आणि पाण्यातील विषाचा नाश करण्यासाठी श्रीकृष्णांनी यमुनेत कालियामर्दन केले.
जंगलात माजलेल्या पशू-पक्ष्यांचा बंदोबस्त त्यांनी लहानपणीच केला. चुकीच्या सामाजिक वा राजकीय पद्धती लोकांनी बदलाव्यात यासाठी गोकुळातून मथुरेला दूध-दही न पाठविण्याचा सत्याग्रहही त्यांनी केला. लहान मुलांचे पालनपोषण नीट व्हावे, मुलांवर लहान वयात भलत्याच गोष्टींचे वा बुद्धीवर ताण येईल अशा अभ्यासाचे दडपण न टाकता त्यांचे शरीर घडविण्यासाठी वा त्यांना खेळण्याबागडण्यात वा त्यांच्या प्रवृत्तींचा विकास करण्यात लक्ष द्यावा असे प्रयत्न केले.
यातून हलके हलके मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे आपण म्हणतो तसेच हा मुलगा म्हणजे कोणी परमात्मा सर्वांच्या कल्याणासाठी अवतार घेऊन आलेला आहे असे सर्वांच्या लक्षात आले. त्यामुळे वयाच्या १८व्या वर्षी जेव्हा श्रीकृष्ण मथुरेला आले तेव्हा हा कुणीतरी तारणहार आहे, आपल्याला वाचविणारा आहे, राजकीय छळापासून आपल्याला मुक्त करणारा आहे, आपले जीवन सुखासमाधानाने जगता येईल अशी परिस्थिती निर्माण करणारा अवतारी पुरुष आहे अशीच सर्वांची कल्पना तयार झालेली होती.
इतक्या वर्षांनंतर आज आपल्यालाही हेच लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की दैनंदिन जीवनात मार्गदर्शन करून उद्धार करणारे ते श्रीकृष्णच होत. आसेतुहिमाचल व पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या श्रीकृष्णांची कधी विठ्ठलाच्या रूपात, कधी रणछोड रूपात, कधी द्वारकाधीशाच्या रूपात, कधी बालकृष्णाच्या रूपात, कधी बालाजीच्या रूपात श्रीकृष्णांची भक्ती व उपासना आजही चालते.
कलियुगात कृष्णभक्तीशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. या जगात आनंदाने जगायचे असेल तर कृष्णभक्ती हा एकमेव मार्ग आहे. त्यांनी सांगितलेला भक्तिमार्ग हा सर्व वेदांताचा समन्वय असून आजच्या काळातला अत्यंत सोपा मार्ग आहे.
हजारो वर्षांपासून आपण श्रीकृष्णाचा जन्म साजरा करतो आहोत, यापुढेही करत राहू पण, फक्त तेवढेच पुरेसे ठरणारे नाही. श्रीकृष्णाची कृपा व्हावी असे वाटत असले तर त्यांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानाचे आचरण करणे महत्त्वाचे होय. श्रीमद्भगवद्गीतेचा अभ्यास व चिंतन करून ब्रह्मविद्येचा शोध घेण्याने आपल्याला त्यांची मर्जी संपादन करून घेता येते.
कुणाचाही द्वेष न करता सर्वांभूती मैत्री व समभाव ठेवून फलाची अपेक्षा न ठेवता म्हणजेच कर्म करत असतानाच त्याचा आनंद घेऊन कर्तव्य करणे, कर्माचे फळ तर येणार असतेच पण त्या फळावर सर्वांचा अधिकार आहे हे मान्य करणे हा आचार श्रीकृष्णांनी सांगितला. या आचाराप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करणे हाच खरा श्रीकृष्णजयंतीचा उत्सव होय.
(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.