भाष्य : भारतीय व्यूहरचनेचा ‘महासेतू’

आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण कॉरिडॉर भारतासाठी अधिक उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे व्यापाराला चालना मिळणार हा फायदा आहेच.
International North South Transport and Trade Corridor
International North South Transport and Trade Corridorsakal
Updated on
Summary

आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण कॉरिडॉर भारतासाठी अधिक उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे व्यापाराला चालना मिळणार हा फायदा आहेच.

आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण कॉरिडॉर भारतासाठी अधिक उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे व्यापाराला चालना मिळणार हा फायदा आहेच. परंतु रेशीममार्गाच्या जाळ्याद्वारे चीन वाढवत असलेल्या वर्चस्वाला शह देण्यासही याचा उपयोग भारताला होऊ शकेल.

नजीकच्या भूतकाळात आंतरराष्ट्रीय राजकारणात दोन ऐतिहासिक घटना घडल्या. या दोन्हीही घटनांमुळे मुंबईच्या न्हावाशेवा म्हणजे जवाहरलाल नेहरू पोर्ट या बंदराचे भाग्य उजळले. या बंदरातून सागरी तसेच खुश्कीच्या (म्हणजे जमिनीवरच्या) मार्गाने थेट युरोपीय देशांचे किनारे गाठतां येतील. भारताच्या धनाची, वेळेची आणि ताकदीची बचत होईल. व्यापाराला सुगीचे दिवस येतील, असे जाणकारांचे म्हणणे आहे. या उपक्रमाला ‘इंटरनॅशनल नॉर्थ साउथ ट्रान्सपोर्ट अँड ट्रेड कॉरिडॉर’ हे नामानिधान आहे. या महामार्गाचे महत्त्व समजून घेतले पाहिजे.

रशिया-युक्रेन संघर्षाला २४ फेब्रुवारीस एक वर्ष झाले तेव्हां व्लादिमीर पुतीन यांनी त्यांच्या भाषणात या महामार्गाचा मुद्दाम उल्लेख केला. युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्याला वर्ष उलटले तरी अपेक्षित यश न मिळाल्याने पुतीन नाराज झाले. युक्रेनच्या राजधानीवर म्हणजे कीव्ह शहरावर फारतर आठवड्यात कब्जा मिळण्याची रशियन राजकर्त्यांची अपेक्षा होता. प्रत्यक्षात रशियाला कीव्ह घेण्याचा हट्ट सोडून द्यावा लागला, नुकसान सोसावे लागले. काळ्या समुद्रातली ‘मस्क्वा’ नामक अण्वस्त्रसज्ज युद्धनौका युक्रेनने बुडवली. रशियाचा पंचनामा झाला.

याच युक्रेनच्या सैनिकांनी काळा समुद्र आणि अझोव समुद्र तसेच रशिया यांना जोडणारा १९ किलोमीटरचा पूल उद्धवस्त करून रशियाच्या आरमाराला आव्हान दिले. पुतीन यांनी साडेतीन अब्ज डॉलर खर्चून हा पूल बांधला होता. त्यावर स्वतः वाहन चालवून त्याचे उद्घाटन केले होते. पण आठ ऑक्टोबर २०२२ रोजी तो बेचिराख करून युक्रेनच्या शासकांनी पुतीन यांना त्यांच्या वाढदिवसाला (सात ऑक्टोबर) उपहासपूर्ण शुभेच्छा दिल्या.

युरोप, अमेरिकनांनी रशियाशी व्यापारउदीमावर बहिष्कार टाकल्याने रशियाच्या तिजोरीवर आघात झाला आहेच. या पार्श्‍वभूमीवर पुतीन गेल्या २४ फेब्रुवारी रोजी म्हणाले, ‘‘आम्ही रशियन्स् यापुढे उपरोल्लेखित महामार्गाने मुंबईचा किनारा गाठू आणि अवघ्या दक्षिण आशियाला तेल आणि नैसर्गिक वायू पुरवून तूट भरून काढू.’’ वस्तुतः हा महामार्ग बांधण्यासाठी रशियाने इराण आणि भारत यांच्याशी सन २०००मध्येच हातमिळवणी केली आहे. पण तेवीस वर्षांनंतर त्याचे नशीब उजळून निघाले आहे.

भारताचा चतुष्कोनी आकृतिबंध

आता दुसरी आंतरराष्ट्रीय घटना समजून घेऊ. याच वर्षी १० मार्च रोजी इराण आणि सौदी अरेबिया या देशांनी चीनच्या मध्यस्थीने परस्परात मैत्री करार केला. खरे म्हणजे यापैकी इराण शियापंथीय, तर सौदी अरेबिया सुन्नी संप्रदायाचा, त्यांच्यात विळ्या-भोपळ्याचे नाते आहे. गेली सात वर्षे उभयतांनी सीरिया आणि येमेनच्या धुमश्चक्रीत एकमेकांवर प्रहार केले. २०१९मध्ये सौदीच्या तेलखाणींवर इराणने हल्ले चढविले, अशा आरोपाची सौदी शासकांनी तोफ डागली आहे.

या पार्श्‍वभूमीवर दोन्ही देशांनी आपापले राजदूत माघारी बोलावले; पण चीनच्या सरकारने धूर्तपणाने पावले टाकून या उभय देशांमध्ये दिलजमाई घडवली. चीनला जगावर वर्चस्व हवे आहे, म्हणून रेशीम मार्गाच्या नावाखाली निरनिराळ्या देशांना विळखा घालण्याच्या हट्टाने चीनला झपाटले आहे. युक्रेन संघर्षात चीन रशियाची पाठराखण करीत आहे. परिणामतः चीनही बदनाम झाला आहे. शिवाय, रेशीम मार्गातही अडथळे येत आहेत. एक मार्ग आहे मध्य आशियातील किरगिस्तानपासून इराणपर्यंत जाणारा. पण युरोपातून आगेकूच करणाऱ्या मार्गात युक्रेन युद्धामुळे अडथळे आहेत. तसेच तेल आणि नैसर्गिक वायू यांच्यासाठी दामदुप्पट रक्कम मोजावी लागत आहे. तेव्हां परस्परांशी हाणामारी करणाऱ्या शिया आणि सुन्नी पंथीय राष्ट्रांमध्ये समेट घडवल्यास इंधनप्राप्तीचा मार्ग खुला होईल. आपली प्रतिमाही उजळ होईल.

या महत्त्वाकांक्षेने चीनच्या शासकांनी वर्ष-दीडवर्ष कैक कसरती केल्या. भारताच्या दृष्टीने चीनचे या संदर्भातले यश क्लेशदायक आहे. पश्चिम आशियात अर्थात भारताने इस्त्राईल तसेच अमेरिका आणि संयुक्त अरब अमिरात (आय२, यू२) असा चतुष्कोनी आकृतिबंध उभा केला आहे. पण चीनने इराण-सौदी दिलजमाई घडवून एकाच वेळी भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांवर मात केली. तेव्हा भारतानेही ‘इंटरनॅशनल नॉर्थ साउथ ट्रान्सपोर्ट अँड ट्रेड कॉरिडॉर’ मजबूत करण्यात पुढाकार घेतला, तर त्यात आश्चर्य कसले? माजी परराष्ट्र सचिव श्यामसरन यांच्यासह तज्ज्ञ मंडळींनीही मुंबईपासून प्रारंभ करण्याच्या या महामार्गाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. एकच महामार्ग सद्यस्थितीतल्या आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी विश्वसनीयता मिळवण्यात शंभर टक्के सफल झाला आहे.

आंतरराष्ट्रीय क्षेत्रात उत्तर आणि दक्षिण या दिशांना सांधणारा हा महासेतू मुंबईपासून सुरू होतो आणि पर्शियन आखातात पाय सोडून बसलेल्या इराणी चबाहर बंदरात पोचतो. आपण या बंदरापर्यंत जहाजाने आलो आहोत, पण नंतर अफगाण भूमीवर इराणमधून जाऊ शकतो. पण समजा जहाजातून खाली न उतरता त्याच जहाजाने होर्मूझच्या सामुद्रधुनीत प्रवेश केला आणि तिथल्या दुसऱ्या इराणी बंदरात (बंदरे अब्बास) हा प्रवास स्थगित केला तर इराणमधल्या खुश्कीच्या मार्गाने कॅस्पियन समुद्रातल्या बंदरे अन्ज्लीपर्यंत प्रवास करणे शक्य होते. या बंदरात डावीकडे वळण घेतले तर अझरबैजान, आर्मेनिया, जॉर्जिया आणि तुर्कस्तान या देशांपर्यत मजल मारता येते. उजवीकडच्या वळणाने मध्य आशियातल्या देशांकडे कूच करता येते. पण कॅस्पियन समुद्रातच जहाजाने उत्तरेकडे जाण्याचे ठरविले तर थेट रशियाचा किनारा गाठता येतो. मग रशियातून युरोपीय शहरांकडे मोर्चा वळवणे सहजसुलभ बनते. तात्पर्य, सुएझ कालवा आणि त्या चिंचोळ्या कालव्यात होणारी वाहतूक कोंडी टाळता येते. वेळ, पैशाची बचत होते.

नव्या जगाची, नवी समीकरणे

या महासेतूला म्हणजे कॉरिडॉरला अभूतपूर्व महत्त्व आले आहे. इराण आणि सौदी अरेबिया या दोन देशांशी दोस्ती करण्यात चीन यशस्वी झाला आहे. आपले या दोन्ही देशांशी संबंध मैत्रीचे आहेतच, पण या महासेतूमुळे ‘अर्थपूर्णही’ होणार आहेत. मुळात प. आशियातील इतर मुस्लिम देशांशीही भारताने सातत्याने गोत्र जुळविले आहे. इजिप्त, जॉर्डन, इराक, संयुक्त अरब अमिराती अशा सुन्नी संप्रदायांनी जहाल दहशतवादावर बहिष्कार टाकून भारताशी सलगी केली आहे. या देशांनी इस्त्रायलशीही हातमिळवणी केली असेल तर भारताशी सख्य म्हणजे स्वागतार्ह वाटचाल आहे.

विसाव्या शतकात ज्या देशांचा तिसऱ्या जगाचे घटक म्हणून उल्लेख होत असे ते सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर वेगवेगळ्या गटांमध्ये सहभागी झाले. अमेरिका, जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स या देशांचे मित्र झाले. भारताने पॅसिफिक समुद्रातल्या ऑस्ट्रेलिया, अमेरिका या देशांशी मैत्री जुळवतांना या जुन्या मित्रांशीही नाते कायम ठेवले आहे. आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक आणि व्यापार सुकर व्हावा म्हणून भारताने इराण आणि रशिया यांच्याशी करार करून २०००मध्ये महासेतू मजबूत करण्याचे ठरविले आहेच. २०१७ मध्ये आपण चीनच्या रेशीम मार्गावर हिंमतीने सडेतोड टीका केली. उत्तर दक्षिण वाहतूक/व्यापार महासेतूचा वेगवान अवलंब झाला तर आपण चीनच्या रेशीम मार्गाच्या तुलनेत अधिक लाभदायक मार्ग जगास दिला, अशी सकारात्मक सार्थकता आपल्याला कनवटीस बांधता येईल.

(लेखक आंतरराष्ट्रीय घडामोडीचे तज्ज्ञ अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.