गडकरी करामत करतील?

विधानसभा निवडणुकीच्या आव्हानात्मक परीक्षेला सामोरे जाण्यासाठी भाजपची तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेऱ्या राज्यात वाढणार आहेत. लोकसभेतही ४८ मतदारसंघांपैकी जवळपास निम्म्या मतदारसंघात त्यांनी हजेरी लावली होतीच.
assembly election 2024 pm modi visit nitin gadkari politics
assembly election 2024 pm modi visit nitin gadkari politicssakal
Updated on

नितीन गडकरी स्वत:ला पक्षाच्या विचारधारेचे पाईक मानतात. सर्व पक्षातले त्यांचे मित्रही त्यांच्या निष्ठा जाणून आहेत. मग त्या कटिबद्धतेचा भाजप पुरेपूर वापर करून का घेत नाही, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे.

- मृणालिनी नानिवडेकर

विधानसभा निवडणुकीच्या आव्हानात्मक परीक्षेला सामोरे जाण्यासाठी भाजपची तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेऱ्या राज्यात वाढणार आहेत. लोकसभेतही ४८ मतदारसंघांपैकी जवळपास निम्म्या मतदारसंघात त्यांनी हजेरी लावली होतीच.

चार महिन्यांनंतर पुन्हा प्रचारफेऱ्या सुरु करताना वातावरण बदलले आहे, अन् बदललेल्या या वातावरणाची मोदींना चांगलीच जाणीव असावी. दोन दिवसांपूर्वी ‘विश्वकर्मा योजने’च्या प्रारंभासाठी ते वर्ध्याला जायला नागपुरात उतरले अन् उतरताच स्वागतासाठी आलेल्या नितीन गडकरी यांना त्यांनी ‘राज्यात कसे काय सुरु आहे’, असा प्रश्न केला.

लोकसभेत चारशे जागांच्या अपेक्षेने निवडणूक लढविणाऱ्या मोदींना २४० वर थांबावे लागले. आता या बदललेल्या परिस्थितीत ते गडकरींचे मत जाणून घेत असावेत. गडकरींनी परिस्थितीविषयी जे मत व्यक्त केले ते चिंता वाढवणारे होते म्हणतात.

गडकरींना परिस्थिती विचारली गेली; पण प्रश्न म्हणून समोर ठाकलेल्या महाराष्ट्राच्या निवडणुकीचे उत्तर शोधण्यासाठी त्यांचा सल्ला विचारला जाईल का? भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनात घोंघावणारा हा प्रश्न राजकीय निरीक्षकांना लाखमोलाचा वाटतो आहे.

नॅरेटिव्हच्या लढाईचे भवितव्य महाराष्ट्र ठरवणार आहे. महाराष्ट्रातील कित्येक वर्षांची युतीची सोयीस्कर व्यवस्था २०२४ मध्ये मोडीत काढली होती ती उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातल्या एकसंघ शिवसेनेने. त्यावेळी लक्षणीय यश मिळवल्यानंतर विरोधी पक्षनेते झालेले एकनाथ शिंदे भाजपकडे परतू नये, या मताचे होते म्हणतात.

पण पुन्हा दोघे काही महिन्यांनंतर एकत्र आले. भांड्याला भांडे लागले; पण संसार सुरु राहिला. २०१९ मध्ये तो मोडला तो भाजपचा आत्मविश्वास आक्रमक झाल्याने! काही नेत्यांच्या म्हणण्यानुसार दिलेला शब्द राष्ट्रवादी कॉंग्रेसने पाळला नाही अन् डाव उलटला.

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले.नंतर भाजपने शिवसेना फोडली. एकेकाळी वेगळे वाढू म्हणणारे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले.(आज ते भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला बिहारचे पलटूराम नितीशकुमार यांच्यापेक्षा जास्त आवडू लागल्याची चर्चा आहे.)

कसोटी लागणार

राष्ट्रवादी कॉंग्रेसही भाजपने हिशेब चुकवण्यासाठी फोडली. हे घडवण्यासाठी यंत्रणांचा भाजपने केलेला वापर महाराष्ट्राच्या जनतेला आवडला नसल्याचे महाराष्ट्राच्या निकालांनी दाखवून दिले आहे. या पार्श्वभूमीवरच विधानसभा निवडणूक होते आहे .

महाराष्ट्र हा कॉंग्रेसला अनुकूल प्रदेश आहे, हे दाखवण्यासाठी तो पक्ष तयारीने मैदानात उतरला आहे. महाराष्ट्राची राजकीय नाडी ओळखणारे शरद पवार विरोधी बाजूला आहेत आणि त्यामुळेच महाराष्ट्राचा सामना मावळत्या विधानसभेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपसाठी कमालीचा कसोटी पाहाणारा झाला आहे.

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवणारे देवेंद्र फडणवीस यांना आंदोलक मनोज जरांगे यांनी टीकेचे लक्ष्य केले आहे. चार- दोन अपवाद वगळता भाजपला एकही मराठा आमदार फडणवीस यांच्या पाठिंब्याचा शब्द उच्चारत नाही, इतका असंतोष आहे.

बडा कॉंग्रेस नेता भाजपमध्ये आला तरी ज्यांच्यामागे फडणवीस भक्कमपणे उभे राहिले, ते मराठवाडयातले एक पराभूत खासदारही विधानसभेत ठाकरे गटामार्फत नशीब अजमावण्यासाठी धडपडताहेत, असे बोलले जाते.

अशा आव्हानात्मक परिस्थितीतून मार्ग काढायला भाजप धडपडतो आहे. भूपेंद्र यादव हे केंद्रीय मंत्री डेरा देवून बसले आहेत. दिवसरात्र मेहेनत करताहेत. छोट्याछोट्या समाजगटाला भेटत आहेत. भाजपसाठी जी लढाई प्रतिष्ठेची आहे त्यात देशभर लोकप्रिय असलेले नितीन गडकरी का नाहीत ? प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विनंतीआर्जवे केली.

संघटनमंत्री शिवप्रकाशसिंह तासभर घरी जाऊन बसले. फडणवीसांनीही गळ घातली, अशा चर्चा दररोज भाजपवर्तुळात सुरु असतात. तरीही गडकरी द्रवत नाहीत की काय? विदर्भात भाजपचे नेते दोन. फडणवीस आणि गडकरी.

हा प्रदेश भाजपसाठी राजकीयदृष्टया बांधला तो गडकरींनी. तेथील पूर्वीच्या ४८ आणि मतदारसंघांच्या फेररचनेनंतर ४४ झालेल्या विधानसभा जागा महाराष्ट्रातील सत्तेसाठी महत्वाच्या. गेल्या वेळेस या जागांवरील प्राबल्य भाजपने गमावले.

यावेळी कॉंग्रेस या भागावर सत्तेच्या मनोरथाचे इमले रचते आहे .तेथे गडकरी खरेच सक्रिय झाले तर चित्र बदलेल? खरे तर शेतीचे प्रश्न ,धार्मिक- सामाजिक समीकरणे यामुळे लोकसभेत या भागाने फटका दिला. तेथे आता गडकरी दाखवतात ती स्वप्ने गेमचेंजर ठरतील का, असा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे.

राजकारणात शक्यतांचा मागोवा घ्यायचा असतो आणि लोकप्रिय नेत्याला कामाला जुंपत जबाबदारी सोपवायची असते. मोदी- शहा हे करतील का? २०१४ मध्ये सत्ता आली तेव्हा २० ते २५ आमदार नितीन गडकरींना ‘मुख्यमंत्री व्हा’ अशी गळ घालायला गेले होते.दिल्लीत रमलोय म्हणत त्यांनी समर्थकांची बोळवण केली.

हो म्हणाले असते तर मोदी-शहांना ते मान्य झाले असते? आता या प्रश्नाचे उत्तर मागे जाऊन शोधण्यात अर्थ नाही.मला विरोधी नेत्यांनी पंतप्रधान व्हा असे सांगितले होते म्हणणारे गडकरी स्वत:ला देशाचे नेते मानत असतीलही; आपण मोदींचा पर्याय असू शकतो असे त्यांनाही वाटते का, असा प्रश्न स्वाभाविक; पण ते स्वत:ला पक्षाच्या विचारधारेचे पाईक मानतात. सर्व पक्षातले त्यांचे मित्रही त्यांच्या निष्ठा जाणून आहेत.

मग त्या कटिबद्धतेचा भाजप वापर का करत नाही ? मोदींची विचारणा ‘सक्रिय व्हा’ असे संकेत देणारी असेल का? पुण्यात गडकरींनी ‘मी बांधलेल्या रस्त्यांवर महाराष्ट्रात खड्डे होतात अन् लोक दोष मला देतात’ असे उद्गार काढले .ते खरे तर प्रातिनिधिक आहेत. महाराष्ट्र सरकारचे कान टोचणारे गडकरी येथील अपयशाचे खड्डे बुजवायची जबाबदारीही घेतील? तसे घडले तर परिस्थिती बदलेल, असे कार्यकर्त्यांना वाटते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()