जसजसं संगणक, इंटरनेट, मोबाइल या सुविधा लोक अधिकाधिक स्वरूपात वापरतील, तसतशा सायबर गुन्हेगारांना मिळणाऱ्या संधी व ‘अवकाश’ यांत वाढच होत राहील. सायबर गुन्हा घडल्यानंतर त्याच्या कारणांचा खल करण्यापेक्षा मुळात तो गुन्हा घडूच नये, यासाठीची सजगता बाळगणं हाच यावरचा उपाय आहे.
सायबर गुन्हेगारीचं प्रमाण सातत्यानं वाढत असल्याच्या बातम्यांची वारंवारित अलीकडे वाढली आहे. आपल्यापैकी अनेक जण अशा प्रकारच्या गुन्ह्याचे बळीसुद्धा ठरलेले असू शकतो. आर्थिक फसवणुकीपासून सामाजिक ताणतणावांपर्यंत अनेक गोष्टींचा या गुन्हेगारीशी संबंध आहे.
एकूणच सायबर गुन्हेगारी ही आधुनिक काळामधली जणू एखादी अटळ गोष्ट असल्यासारखंच आपण आता तिच्याकडे बघतो. पूर्वी ‘पारंपारिक प्रकारचा गुन्हा’ आणि ‘सायबर गुन्हा’ यामधल्या सीमारेषा सुस्पष्ट होत्या. तसंच पारंपरिक प्रकारचे गुन्हे हे सर्वसामान्य प्रकारचे मानले जात आणि सायबर गुन्ह्यांकडे लोक काहीशा कुतूहलानं बघत असत. आता मात्र चित्र याच्या जवळपास उलटं झालं आहे.
सायबर गुन्हे वाढत जाणार याविषयी कुणाच्याच मनात शंका नाही. जसजसं संगणक, इंटरनेट, मोबाइल या सुविधा लोक अधिकाधिक स्वरूपात वापरतील, तसतशा सायबर गुन्हेगारांना मिळणारया संधींमध्ये वाढच होत राहील. याकडे आपण कसं बघायचं?
सायबर गुन्ह्यांचे प्रकार आणि त्यामागची कारणं यांचे विविध प्रकार असतात. सर्वसामान्यपणे आपण ज्या सायबर गुन्ह्यांविषयी ऐकतो ते गुन्हे लोकांच्या तंत्रज्ञानामधल्या वापरासंबंधीचं अज्ञान किंवा त्यांना याविषयी वाटणारा मोह तसंच त्यांना जाणवणारी भीती यातून घडतात. उदाहरणार्थ ‘घसरबसल्या कमाई करा’ अशा प्रकारचं आमिष दाखवून लोकांना सुरुवातीची फी भरायला लावणारे सायबर गुन्हे अलीकडे वारंवार घडतात.
आपलं पार्सल कस्टम विभागानं संशयापोटी अडकवून ठेवलेलं असल्यामुळे ते सोडवण्यासाठीची फी भरायला लावणारे बनावट कॉल लोकांना भीती दाखवून फसवतात. याखेरीज एटीएम केंद्रात कार्ड बदलणं, ओएलएक्सवरून वस्तूंच्या खरेदी/विक्रीसंबंधीचे गुन्हे करणं, क्रिप्टोकरन्सीसंबंधीची फसवणूक, वीजबील भरलेलं नसल्यामुळे जोडणी तोडली जाणार असल्याची धमकी देणं, बनावट वेबसाइट उघडून लोकांना लुबाडणं, सिमकार्ड क्लोन करून ओटीपी मिळवणं असे असंख्य प्रकारही घडताना दिसतात.
हे तसंच अशा प्रकारचे गुन्हे करणं गुन्हेगारांसाठी तसं तुलनेनं सोपं असतं. याचं कारण म्हणजे या गुन्ह्यांसाठी फार तांत्रिक ज्ञानाची गरज नसते. त्याहून जास्त गरज असते ती समोरच्या माणसाला मोहात पाडण्याची किंवा त्याला भीती दाखवण्याची; तसंच त्याच्या सायबर अज्ञानाचा गैरफायदा घेण्याची. तसंच या गुन्ह्यांमध्ये मासे अगदी सहजपणे गळाला लागतात.
पारंपरिक पद्धतीची गुन्हेगारी करायची तर त्यासाठी खूप तयारी करावी लागते, खूप कष्ट घ्यावे लागतात, पकडलं जाण्याची भीती खूप जास्त असते आणि आपल्या हाती नेमकं काय लागेल याची शाश्वती नसते. सायबर गुन्हेगारी मात्र अक्षरश; घरी बसून करता येते. यात फारसे कष्ट नसतात. पकडलं जाण्याची भीती असते; पण त्याच्या तपासात खूप गुंतागुंत असते.
उदाहरणार्थ आपली फसगत झाल्याची जाणीव लोकांना होईपर्यंत गुन्हेगार एका बँक खात्यातून दुसऱ्यात, तिथून वेगळ्या ठिकाणी अशा प्रकारे पैसे वळवून तपासाचं काम खूप क्लिष्ट करून टाकतात. शिवाय सायबर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलिसांना प्रशिक्षित केलेलं नसेल तर तज्ज्ञांची मदत घ्यावी लागते. यात खूप वेळ जातो.
मुळात पुरावे निर्माणच होऊ नयेत यासाठी गुन्हेगारांच्या हाती अनेक क्लृप्त्याही असतात. त्यांना व्हीपीएन, टॉर ब्राऊझर अशा प्रकारचं तंत्रज्ञान वापरता येतं. यामुळे तपास करणारयांची विलक्षण फसगत होऊ शकते.
हल्ल्यांमागचे तांत्रिक ज्ञान
काही सायबर गुन्हे निव्वळ खळबळ माजवण्यासाठी किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी केले जातात. उदाहरणार्थ सरकारी वेबसाइट हॅक करणाऱ्याचा हेतू सरकारची बदनामी करण्याचा असतो. तसंच एका अर्थानं दोन देशांमधल्या पारंपारिक युद्धामध्ये विजय मिळवणं अशक्य असल्यामुळे अशा हल्ल्यांमधून आपण विजय मिळवत असल्याचं सूचित करणं असा हल्लेखोरांचा हेतू असतो.
अर्थात कधीकधी यातून महत्त्वाची माहिती चोरणं किंवा ती नष्ट करणं हे हेतूसुद्धा असू शकतात. अशा प्रकारच्या हल्ल्यांसाठी मात्र हल्लेखोरांना बऱ्यापैकी जास्त तांत्रिक ज्ञान लागतं. साहजिकच असा हल्ला यशस्वी ठरल्यावर संबंधित हल्लेखोराला अक्षरश: विजय मिळाल्यासारखा आनंद होतो.
सायबर गुन्ह्यांमधला एक कळीचा मुद्दा म्हणजे कित्येकदा गुन्हा करणाऱ्याला आपण गुन्हा करत असल्याची जाणीवच नसते. साधं कुणाविरुद्ध किरकोळ बदनामीकारक प्रकारचा मजकूर समाजाध्यमांवर लिहिणं हा गुन्हा ठरू शकतो. हे माहीत करून घेण्याची-देण्याची नितांत आवश्यकता आहे.
सगळ्यांच्या हातामध्ये मोबाइल असल्यामुळे आणि अनेक जणांना त्याचा वापर कसा करायचा याचं भान नसल्यामुळे आपण गुन्हेगार ठरल्याची जाणीव संबंधिताला खूप उशिरा होते. त्यातच व्हॉट्सॲपवर विचार न करता येईल ते पुढे पाठवत राहणं, ठराविक विचारसरणीनं भारून गेल्यामुळे अक्षरश: चिथावणी दिल्यासारखे संदेश अगदी सर्वसामान्य लोकांनीही लिहिणं अशा गोष्टी वारंवार घडताना दिसतात.
याचे परिणाम काय होऊ शकतात याची त्यांना कल्पनासुद्धा येत नाही. त्यातच राजकारण, समाजकारण यांत अलीकडे आलेला संवगपणा, उथळपणा याचं प्रतिबिंब लोकांच्या दैनंदिन संभाषणामध्येही दिसतं. मोबाइलवरून एकमेकांशी (कु)संवाद साधत असताना अनेक जणांना भलताच चेव तर चढतोच; पण शिवाय आपण समोरासमोर नसल्यामुळे एक अदृश्यपणाचं खोटं संरक्षक कवचही आपण घातलेलं आहे, असा आभास निर्माण होतो.
अशा वेळी माणसाच्या हातून नको ते घडू शकतं. याच्या जोडीला प्रेमप्रकरणं, व्यावसायिक वादविवाद, एकमेकांमधले मतभेद या मूळ कारणांमुळे समाजमाध्यमांवर बदनामी करणं, छायाचित्रं प्रसारित करणं, धमक्या देणं असे अत्यंत गंभीर प्रकारचे गुन्हेही खूप मोठ्या प्रमाणावर घडतात.
महापुरुषांची किंवा स्त्रियांची बदनामी करणं, राजकीय नेत्यांविषयी अपमानास्पद मजकूर लिहिणं या बाबतीमध्येही परस्परविरोधी विचारसरणीच्या लोकांमध्ये चढाओढ सुरू असल्याचं दिसून येतं.
सायबर गुन्ह्यांच्या सतत फुगत जाणाऱ्या संख्येमुळे तपासयंत्रणांवरही त्याचा विलक्षण ताण पडलेला आहे. आधीच शेकडोंच्या संख्येनं गुन्हे घडलेले असताना दररोज भर पडत असलेल्या गुन्ह्यांचा तपास करणं त्यांच्यासाठी खूप कठीण ठरतं. साहजिकच ‘हाय प्रोफाइल’ किंवा आर्थिकदृष्टया खूप मोठ्या रकमांच्या गुन्ह्यांना त्यांच्याकडून प्राधान्य दिलं जाणं स्वाभाविकच आहे.
असंख्य सायबर गुन्हे टाळण्याजोगे असूनही घडत असल्यामुळे जागोजागी ‘सायबर पोलिस ठाणी’ उभी करूनही ती कमीच पडणार आहेत. म्हणूनच सायबर गुन्हा म्हणजे काय, तो आपल्या हातून कसा घडू शकतो, आपण त्याचे बळी कसे ठरू शकतो अशी मूलभूत माहिती घेणं प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे. यामधले तांत्रिक मुद्दे, कायद्यामधली कलमं अशा गोष्टी सर्वसामान्यांच्या पचनी पडणं शक्य नाही आणि त्याची गरजही नाही.
दैनंदिन आयुष्यात यामुळे काय घडू शकतं याची अगदी सोप्या शब्दांमध्ये उदाहरणांसह माहिती देणं पुरेसं आहे. शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमांमध्ये हे अनिवार्य करण्याची गरज आहे. याचं कारण म्हणजे याच टप्प्यावर मुलामुलींच्या हाती फोन येतो.
तो वापरण्यासंबंधीच्या जबाबदारीची जाणीव मात्र त्यांना कुणी करून देत नाही. सगळे जणू काही आपोआपच या गोष्टी शिकून घेणार असं मानलं जातं. दुर्दैवानं अनेक पालकांनाच याची जाणीव नसल्यामुळे त्यांच्याकडून काही सांगितलं जाईल, अशी अपेक्षा करणंही फोलच ठरतं. सायबर गुन्हा घडल्यानंतर त्याची पोलखोल करणं यापेक्षा मुळात तो गुन्हा घडूच नये यासाठीची सजगता बाळगणं हाच यावरचा उपाय आहे.
(लेखक संगणक शास्त्राचे अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.