PM Modi Ayodhya Ram Mandir : अयोध्या आणि मोदींचा ‘राजधर्म’, वैदिक हिंदू धर्मातील एक नवा स्वागतार्ह अध्याय

प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा प्रातिनिधिक स्वरूपात का होईना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे, हा एका अर्थाने वैदिक हिंदू धर्मातील एक नवा स्वागतार्ह अध्याय आहे. धर्मसत्तेपेक्षा राजसत्ताच कणभर सरस आहे हा संदेश देणारी ही कृती आहे.
Ayodhya Ram Mandir Pooja
Ayodhya Ram Mandir PoojaSakal
Updated on

- विकास झाडे

प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा प्रातिनिधिक स्वरूपात का होईना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे, हा एका अर्थाने वैदिक हिंदू धर्मातील एक नवा स्वागतार्ह अध्याय आहे. धर्मसत्तेपेक्षा राजसत्ताच कणभर सरस आहे हा संदेश देणारी ही कृती आहे. याही दृष्टिकोनातून ही घटना अभूतपूर्व म्हटली पाहिजे.

केवळ हिंदूच नव्हे तर भारतीय लोकांचे ऐक्य घडवून आणू शकणारी धर्मातीत शक्ती असलेल्या प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची आज अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होत आहे. हा एक राष्ट्रीय उत्सव असल्याचे देशात वातावरण निर्माण झाले आहे.

राष्ट्रीय अर्थाने तर ही अभूतपूर्व घटना आहेच. धर्मशास्त्राचे पालन होत नसल्याचा आक्षेप घेत शंकराचार्यांनी या कार्यक्रमास उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. धर्माचार्यांनी मोदी आणि राममंदिर विश्वस्तांच्या विरोधात व्यक्त केलेली मते पाहता धर्मावर अधिकार कोणाचा, धर्मसत्तेचा की राजसत्तेचा?

या प्रश्नातून ही परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसत होते. अर्थात धर्मसंस्था आणि राजसंस्था यांच्यातील संघर्ष आपल्या देशाला नवीन नाही. रा. स्व.संघाचे तत्त्वज्ञ दीनदयाळ उपाध्याय यांनी ‘एकात्म मानववादा’ची मांडणी करताना धर्मसत्तेचा राज्यसत्तेवर अंकुश असायला हवा, असा सिद्धान्त मांडला होता.

मात्र, भारताला स्वातंत्र्य मिळताना धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करण्यात आला. प्राणप्रतिष्ठेचा सोहळा समस्त देशवासीयांना साजरा करता यावा, यासाठी सरकारी कार्यालयांना कुठे पूर्ण तर कुठे अर्धा दिवस सुट्टी दिली आहे.

यात वरकरणी धर्मसत्ता राजसत्तेवर स्वार झाली असे वाटत असले तरी धर्मसत्ता कोणाची, शंकराचार्यांची, नरेंद्र मोदी यांची की, रा. स्व. संघाची हा प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित केला जाऊ लागला आहे.

कर्मठ वैदिक धर्मधारेचे कठोर पालन करत असलेले शंकराचार्यच राम मंदिराबाबत त्यांनी घेतलेल्या वेगळ्या भूमिकेमुळे बाजूला सारले गेले आहेत. पण राम मंदिराच्या निमित्ताने एकूणच वैदिक धर्मधारेच्या मूलतत्त्वांना आव्हान दिले जात आहे काय, अशी चर्चा होताना दिसते.

खरे तर भारतीय धर्मशास्त्रे आणि धर्मकल्पनांचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे. वैदिक धर्मात यज्ञाद्वारे आहुत्या देवून अमूर्त इंद्र, वरूण, नासत्य अशासारख्या मुख्य देवतांचे अर्चन होत असल्याने या धर्मातही मूर्तिपूजेचा प्रश्न नव्हता.

समानतेची स्वप्ने पाहणारी, आचरणात आणणारी समान संस्कृती इसपू तीन हजार वर्षापूर्वीच निर्माण झाली. जैन धर्म यातूनच सर्वात आधी निर्माण झाला तर नंतर महावीरांच्या काळात बौद्ध, आजीवक यासारखे नवे धर्मही स्थापन झाले.

हे धर्म ईश्वर या संकल्पनेवर विश्वास ठेवणारे नाहीत. सिंधू काळापासून भारतीय लोकधर्म मात्र मूर्ती व प्रतिमापूजक होत गेला. आजही भारतातील मंदिररचना किंवा मूर्तीशास्त्र हे वैदिक पद्धतीचे नसून तंत्रशास्त्रावर आधारित असते.

कालौघात भारतातील जैन, बौद्ध व वैदिकांसकट अन्य धर्मांनी मूर्तिपूजा स्वीकारली असली तरी ती आपल्या पद्धतीने कर्मकांडात बदल करून. त्या अर्थाने हा भारतीय मानसिकतेचा एकत्रित उद्‌गार बनू लागला.

पण प्रत्येक धर्माने आपले वैशिष्ट्य मंदिर व पूजापद्धतीत जपले. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात नगरांतील सर्वधर्मीय मंदिरांचा उल्लेख येतो. पुढे प्रत्येक धर्माने आपापल्या पूजा व मूर्तीतील प्राणप्रतिष्ठेच्या स्वतंत्र पद्धती विकसित केल्या.

आठव्या शतकात आदि शंकराचार्यांनी जैन व बौद्ध मतांचे खंडन करत देशभरात चार धर्मपीठे स्थापन केली. वैदिक व हिंदू मूर्तिपूजकासाठी पंचायतन पूजा प्रस्थापित केली. पण त्यांनी पंचायतनात शिव, विष्णू, देवी, सूर्य आणि गणेश किंवा कार्तिकेय याच मुख्य देवता मानल्या व सर्व विधीविधान त्यांच्यासाठीच लिहिले.

यातील विष्णू ही देवता वगळता अन्य कोणतीही देवता कोणत्याही वेदात सापडत नाही. स्मार्त हा वैदिक संप्रदाय याच पूजापद्धतीतून निर्माण झाला. वैदिकांचा श्रौत संप्रदाय मात्र आजही मूर्तिपूजा करत नाही.

स्मार्त संप्रदायात या पाच देवता वगळता कोणत्याही देवतेची प्राणप्रतिष्ठा आदि शंकराचार्यांनी घालून दिलेल्या प्रथेनुसार होऊ शकत नाही. राम हे दैवत या पंचायतनात नसल्यामुळेच त्याच्या प्राणप्रतिष्ठेस ज्योतिर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी जाहीर विरोध केला.

आदी शंकराचार्यांनी घालून दिलेल्या वैदिक धर्मतत्वांना धरूनच त्यांचा विरोध आहे. मनुस्मृतीनुसार अर्चन, वेद वाचन व धर्मकार्याचे अधिकार फक्त ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य अशा तीन वर्णांनाच उपलब्ध आहेत.

शूद्रांना (म्हणजे जे वैदिक धर्मीय नाहीत, हिंदू आहेत असे बहुजन) कसलेही वैदिक व वेदाधारीत धार्मिक अधिकार मनुस्मृती व अन्य स्मृतीही देत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या राज्याभिषेकाला विरोध झाला होता.

छत्रपती शाहू महाराजांच्या वेदोक्त प्रकरणातही त्यांना वैदिक मंत्रांचा अधिकार आहे काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. वैदिक धर्मशास्त्राचा विचार करता श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मोदींच्या हस्ते करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्‍न उपस्थित केला जाणार हे निश्‍चित होते आणि तसे झालेही.

धर्मकार्य सपत्नीकच झाले पाहिजे हा दुसरा आक्षेप होता. मोदींना ही अट पाळणे शक्य नसल्याने त्यांच्या हस्ते प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा अधर्म आहे आणि शेवटचा आक्षेप होता की, राम मंदिर अपूर्ण असल्याने त्यात भगवान प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा होऊ शकत नाही हा.

हे सारे प्रश्न वेद, स्मृती आणि आदि शंकराचार्यनिर्मित प्रथेशी संबंधित असल्याने त्यांचे निराकरण करणे हे पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित सर्व घटकांसमोर आव्हान होते. मात्र, सर्व आक्षेपांना धुडकावून श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करून मोदींनी एका अर्थाने वैदिक व हिंदू धर्मगुरूंच्या धर्माधिकाऱ्यांना व धर्मतत्त्वालाच आव्हान देत धर्माला एक नवी दिशा दिली आहे.

प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा प्रातिनिधिक स्वरूपात का होईना मोदींच्या हस्ते होत आहे, हा एका अर्थाने वैदिक हिंदू धर्मातील नवा स्वागतार्ह अध्याय आहे. वेदांनी, स्मृतीनी घालून दिलेल्या मर्यादा उल्लंघणारी आणि या देशाच्या समतेच्या समान संस्कृतीशी निकट जाणारी ही कृती आहे, अशी त्याची इतिहासात दखल घेतली जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()