श्रीमद्‌भगवद्‌गीता - मानवतेचे गीत

Balaji Tambe
Balaji Tambe
Updated on

सातशे श्‍लोकांच्या श्रीमद्‌भगवद्‌गीतेचे सार गीतेतीलच सात श्‍लोकांत सापडते. संपूर्ण गीतेचे वाचन रोज करणे शक्‍य नाही. पण हे सात श्‍लोक वाचले, तरी त्यातून मार्गदर्शन मिळू शकते. आज (ता. 10) श्रीमद्‌भगवद्‌गीता जयंती आहे. एका ग्रंथाच्या जयंतीच्या निमित्ताने हे विशेष निरूपण...

भगवंतांनी रणांगणावर अर्जुनाला मार्गदर्शन करण्यासाठी श्रीमद्‌भगवद्‌गीता कथन केली. ती इतक्‍या काळानंतरही आपल्यालाही मार्गदर्शन करणारी आहे. त्यातील सात श्‍लोक आपल्या आयुष्यात पदोपदी मार्गदर्शक आहेत. त्यापैकी दोन श्‍लोकांचा आकळलेला अर्थ आपण याआधी पाहिला. येथे उर्वरित पाच श्‍लोक समजून घेऊ.
3) सर्वतः पाणिपादं तत्‌ सर्वतोऽक्षिशिरोमुखम्‌ ।
सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति ।।13-13।।

("तो' परमपुरुष परमात्मा सर्व बाजूंनी हात-पाय असलेला, सर्व बाजूंनी डोळे, डोकी व तोंडे असलेला, सर्वत्र कान असणारा आहे. कारण तो विश्वात सर्वांना व्यापून राहिलेला आहे.)
परमात्मा सर्वांचे कारणरूप असल्याने सर्व चराचराला व्यापून राहिला आहे. त्यांना हजारो कान आहेत, हजारो डोळे आहेत, त्यांची हजारो मुखे आहेत. तो सर्व जगाला व्यापून राहिलेला आहे. आपण कोणीही त्यांच्या या व्याप्तीतून बाहेर पडू शकत नाही. समुद्रात उतरले असता चारही बाजूंना समुद्र असतो, जगातील सर्व जण समुद्रात आले तरी समुद्र त्या सगळ्यांना सामावून घेतो. तसे वातावरणात असलेली भगवंतांची शक्‍ती एवढी प्रचंड आहे की आपण सर्व त्यात सामावले जातो, भगवंततत्त्व सगळ्यांना व्यापून राहिलेले आहे.

4) कविं पुराणम्‌ अनुशासितारम्‌ अणोरणियांसमनुस्मरेद्यः ।
सर्वस्य धातारमच्नित्यरूपम्‌ आदित्यवर्णं तमसः परस्तात्‌ ।।8-9।।

या श्‍लोकात आपल्याला काय करायचे आहे हे सांगितलेले आहे. येथे पुरुष शब्द हा लिंगवाचक नसून व्यक्‍ती असा आहे (संस्कृतमध्ये व्यक्‍ती असा अर्थ घेतला जातो).
परमात्मा हा सर्वज्ञ आहे, परमात्मा सर्व काही जाणतो; त्यांना आदि नाही, तसेच अंतही नाही, त्यामुळे त्यांचे ऐकावे लागतेच; तोच सगळ्या गोष्टींचा नियंता आहे, म्हणजे आपल्या सर्व दोऱ्या त्याच्याच हाती आहेत; तो छोट्याहून छोटा व मोठ्याहून मोठा आहे; तोच सर्वांचे धारण-पोषण करणारा आहे, त्यांचे स्पंदन आपल्यात प्राणरूपाने असतो, प्राण गेला तर सर्व संपून जाते; तो अचिंत्यस्वरूप आहे, म्हणजे आपण परमात्म्याच्या रूपाची कल्पना करू शकत नाही; तो सूर्याप्रमाणे नित्य चेतन आहे, म्हणजे या विश्वाच्या सुरवातीपासून सूर्य ज्याप्रमाणे बारा महिने, चोवीस तास प्रकाशत असतो, तसा परमात्मा सदैव प्राणस्पंदने देत असतो. तो अविद्येच्या पलीकडे आहे. अशा शुद्ध सच्चिदानंद परमघन परमात्म्याचे सदैव स्मरण करायला हवे. अशा परमात्म्याची लीला ध्यानात आली तर आपोआप हात जोडले जातात.

5) श्रीभगवानुवाच
ऊर्ध्वमूलमधःशाखम्‌ अश्वत्थं प्राहुरव्ययम्‌‌‌ ।
छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्‌ ।।15-1।।

(आदिपुरुष परमेश्वराचे रूप हे मूळ असणाऱ्या ब्रह्मदेवरूपी मुख्य शाखा असणाऱ्या अशा अविनाशी वृक्षाला, ज्याची पाने वेद आहेत असे म्हणतात, त्या संसाररूपी वृक्षाला म्हणजेच त्या परमपुरुषाला जे तत्त्वतः जाणतात, तेच वेदांचे तात्पर्य जाणणारे आहेत असे समजतात.)
या श्‍लोकावरून आपल्याला बोध होतो, की आपल्याला वेदांचे तत्त्वतः अर्थ जाणायचे आहे. म्हणजे वेदांमधील श्‍लोकांचे वरवर दिसणारे अर्थ न घेता त्यांचे सांकेतिक अर्थ समजून घ्यायला हवे. हे समजून घेण्यासाठी आपल्या स्वतःच्या शरीरात डोकावून पाहणे आवश्‍यक होय. मेंदू हा ब्रह्म आहे व त्यापासून खाली जाणाऱ्या मेरुदंडातून असंख्य नाड्या जातात. अशा प्रकारे हा संसारवृक्ष आहे. झाडाची मुळे जमिनीतून अन्न-पाणी उचलतात, झाडाची मुळे जमिनीत असतात व झाड वर वाढते. या संसाररूपी वृक्षाला समजून घेण्यासाठी मेंदू हा संपूर्ण कार्यभाग चालवत असल्यामुळे त्या मेंदूपासून मेरुदंड खाली जात असल्यामुळे व त्याला येणारी सर्व इंद्रिये व अवयव आणि चालणारा व्यवहार ही त्या वृक्षाची वृद्धी समजल्यामुळे, जसे झाडाची मुळे जमिनीत असतात, तसे संसारवृक्षाची मुळे वर मेंदूत असतात, हे सांगण्याचा येथे प्रयत्न केलेला आहे. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, वेदांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी शरीरातच अनुभवता येतात. या गोष्टी परमेश्वराला उद्देशून असल्या, तरी तो परमेश्वर प्रत्येक व्यक्‍तीच्या शरीरात राहून व्यक्‍तीचे कार्य चालवत असतो.

6) सर्वस्य चाहं हृद संनिविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च ।
वेदैश्‍च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्‌ ।।15-15।।

पूर्वीच्या श्‍लोकात सामान्यतः दिसणाऱ्या अश्वत्थ वृक्षाचे वर्णन नसून शरीरात असलेल्या वृक्षाबद्दल भगवंत सांगत आहेत. या शरीरात असलेल्या वृक्षाची मुळे वर आहेत व वृक्ष खाली फोफावतो असे सांगितले आहे. या श्‍लोकाला पुष्टी देण्यासाठी भगवंत म्हणत आहेत, मीच सर्व प्राण्यांच्या हृदयात अंतर्यामी रूपाने स्थित आहे. हृदयाच्या आत स्पंदन होते व आकुंचन- प्रसरणामुळे सर्व शरीरभर रक्‍त पोचवले जाते व शरीराकडून रक्‍त हृदयाकडे खेचले जाते. प्रत्येक पेशीत असलेला न्यूक्‍लिअस, जो प्राणशक्‍ती स्पंदित करतो, ते हृदय म्हणायला हरकत नाही. हृदय ही एक संकल्पना आहे असे समजून घेतले तर परमेश्वर हृदयात आहे व तेथून स्पंदने निघतात हे लक्षात येते. पुढे भगवंत म्हणत आहेत, की माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान व अपोहनही होतात. मेंदू वरून सर्व शरीराचे पोषण करतो, तसेच स्मृती, ज्ञान व वेगवेगळ्या विचारांनी संशय घालविणे या क्रियाही मेंदूच करतो. सर्व वेदांच्या द्वारे जाणून घेण्यायोग्य काही असेल तर तो परमेश्वर व त्याचे रूपच आहे. वेदांताचा कर्ता परमेश्वर आहे व वेदांना जाणणाराही परमेश्वरच आहे. म्हणजे सरतेशेवटी सर्व विचार मेंदूतूनच निघतात, मेंदूनेच त्यांचे वर्गीकरण व चिंतन करायचे असते आणि निर्णयही मेंदूनेच घ्यायचा असतो. विशिष्ट अवयवांना चालविण्याचे कामही मेंदूच करत असतो. अशा तऱ्हेने परमेश्वराचे व्यक्‍तिगत अनुभवाचे रूप भगवंतांनी या ठिकाणी समजावलेले आहे व उफराट्या शरीरवृक्षाची कल्पना समजावली आहे.

7) मन्मना भव मद्भक्‍तो मद्याजी मां नमस्कुरू ।
मामेवैष्यसि युक्‍त्वैवम्‌ आत्मानं मत्परायणः ।।9-34।।

(केवळ मज वासुदेव परमात्म्याच्या ठिकाणी अनन्यप्रेमाने नित्य मन ठेवणारा हो; श्रद्धेने, निष्कामभावाने माझे नाम, गुण व प्रभाव यांचे श्रवण, कीर्तन, मनन, पठण करत मज परमेश्वराला निरंतर भजणारा हो; मन, वाणी व शरीराद्वारा सर्वस्व अर्पण करून श्रद्धा, भक्‍ती व प्रेम यांनी विव्हल होऊन पूजन करणारा हो; मज वासुदेवाला विनयभावपूर्वक व भक्‍तीसहित साष्टांग प्रणाम कर; मला प्रणाम कर. याप्रमाणे मला शरण होऊन राहणारा तू आत्म्याला माझ्यामध्ये योजून मलाच येऊन मिळशील.)
परमात्मा म्हणजे सकारात्मकता, परमात्मा म्हणजे सत्य, परमात्मा म्हणजे दया. यातच कायम श्रद्धा असावी. इतर कशाचाही विचार करू नये. परमेश्वराला निरंतर भजणारे व्हावे. मानवतेला बट्टा लावणारे, मुलांना बिघडवणारे, इतरांना चुकीच्या मार्गावर घेऊन जाणारे काही करू नये. केवळ भगवंतांवर श्रद्धा असावी. इतरांना मदत करणे हीच त्यांची खरी पूजा. समजा एखाद्या मुलाकडे फी भरायला पैसे नाहीत, तर त्याला चंदन लावून त्याची पूजा करण्याचा काय उपयोग? त्याला वह्या, पुस्तकांसाठी पैसे देणे, त्याच्या परीक्षेची फी भरणे हीच त्याची पूजा, हीच परमेश्वराची पूजा. परमेश्वराला लीनतापूर्वक प्रणाम करावा, अर्थात यासाठी खाली झुकावे लागेलच. असे सर्व करणारा स्वतः भगवंतस्वरूप होईल. भगवंत म्हणजे आनंद, परमानंद. हे सर्व करणारा परमानंदाला प्राप्त होईल, म्हणजेच परमेश्वरप्राप्ती होईल अशी ग्वाही स्वतः भगवंत देत आहेत.

(श्रीगुरू बालाजी तांबे यांनी केलेले हे निरूपण "नमो भारतम' या कार्यक्रमात "साम टीव्ही' वाहिनीवर सोमवारी (ता. 12 डिसेंबर) सकाळी 7.30, दुपारी 1.30 आणि रात्री 11 वाजता पाहायला मिळेल. डॉ. तांबे यांनी ट्विटरवरून केलेल्या मार्गदर्शनासाठी @shribalajitambe हा टॅग वापरा, तर फेसबुकवर Shreeguru Balaji Tambe हा अकाउंट पाहा. )
(उत्तरार्ध)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.