शेजारी राष्ट्रांचा आदर राखा

गेल्या काही दिवसांपासून बांगलादेश धुमसत आहे आणि आपल्या या शेजारी देशातील अस्वस्थतेचे पडसाद आपल्या देशात उमटणे स्वाभाविक आहे.
शेजारी राष्ट्रांचा आदर राखा
शेजारी राष्ट्रांचा आदर राखाsakal
Updated on

राष्ट्रहिताच्या नजरेतून

- शेखर गुप्ता

गेल्या काही दिवसांपासून बांगलादेश धुमसत आहे आणि आपल्या या शेजारी देशातील अस्वस्थतेचे पडसाद आपल्या देशात उमटणे स्वाभाविक आहे. सद्यस्थितीत भारताने शेजाऱ्यांबद्दल अधिक आत्मीयता दाखवण्याची, त्यांचे महत्त्व अधोरेखित करण्याची, त्यांच्याविषयीचा आदर दाखवून देण्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी देशांतर्गत राजकारण काही काळ बाजूला ठेवण्याची आणि धार्मिक विषयांबाबत सर्वानुमते काही निर्णय घ्यायला हवेत.

बांगलादेशातील परिस्थिती सध्या स्फोटक बनली आहे. तेथे सुरू असलेल्या घडामोडींमुळे भारत शेजाऱ्यांशी कशा पद्धतीने व्यवहार करतो आणि अशा परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने पावले टाकतो याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. तसेच तातडीने काय पावले टाकायला हवीत हेही बारकाईने पाहायला हवे; मात्र त्यासाठी २५ वर्षे मागे जाण्याची आवश्यकता आहे. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी लाहोरला बसने प्रवास करून पाकिस्तानसोबत मैत्रीसाठी मोठे पाऊल टाकले होते. त्यावेळी ते म्हणाले होते, ‘‘तुम्ही तुमचे मित्र निवडू शकता, पण तुम्ही तुमचे शेजारी निवडू शकत नाही...’’मात्र तरीही त्यांच्यासोबत संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न आवश्यकच होते.

वाजपेयी यांच्या पावलावर पाऊल ठेवत डॉ. मनमोहन सिंग यांनी २००८ मध्ये नेबरहूड फर्स्ट’ असे आवाहन केले आणि आणखी एक पाऊल पुढे टाकले. हेच पाऊल आणखी भक्कम करताना २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीने त्यावर शिक्कामोर्तब केले. पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी उपखंडातील सर्व नेत्यांना आमंत्रित केले आणि पुढे त्याचा पाठपुरावा त्यांनी शेजाऱ्यांसोबत भेटीगाठींतून कायम ठेवला. विशेषतः शेजारी राष्ट्रांसोबत नातेसंबंध आणखी दृढ करण्याबाबत सातत्याने पावले टाकली. त्यासाठी त्यांनी काही वैशिष्ट्यपूर्ण बाबीही केल्या...हेही येथे दुर्लक्षून चालणार नाही. अगदी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या नातवाच्या लग्नावेळी अचानक वाट वाकडी करून लाहोरला जाऊन नवदांपत्यास शुभाशीर्वाद दिले आणि संपूर्ण जगाला धक्का दिला होता...त्यातील मुख्य हेतू शेजारी राष्ट्रांसोबत संबंध सुधारणे आणि दृढ करणे हाच होता.

गेल्या २५ वर्षांत प्रथमच बहुमत असलेला नेता सत्तेवर असताना शेजारच्या सात सार्वभौम राष्ट्रांसोबत संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत. ही सातही राष्ट्रे अत्यंत टोकाच्या भूमिका घेऊन पुढे जात आहेत. असे असूनही त्यांच्या विचारधारेचा कोणताही विचार न करता त्यांच्यासोबत उत्तम संबंध जोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी शीतयुद्धाच्या काळामध्ये घडलेल्या घडामोडींमुळे भलेही काही गैरसमज निर्माण झालेले असले, संबंध ताणले गेले असले तरी त्यामध्ये दुवा साधून, संबंध दुरुस्त करून, गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. खरेतर हे मोठे आव्हान आहे.

मोदी यांचा पंतप्रधानपदाचा तिसरा कार्यकाळ सुरू असताना त्यांच्या एकूण कामगिरीकडे पाहिले असता काय दिसते? बांगलादेशामध्ये सध्या असलेली परिस्थिती हे आत्तापर्यंतचे सर्वात मोठे संकट आहे. मोदींनी सूत्रे हाती घेतल्यापासून गेल्या १५ वर्षांत बांगलादेश हा भारताचा सर्वांत जवळचा मित्र राहिलेला आहे. भारतासाठी सुरक्षित ईशान्येचे मुख्य केंद्र म्हणजे ढाका अशी स्थिती आहे. विशेषत: म्यानमारमध्ये गेल्या काही वर्षांत ज्या पद्धतीने वातावरण आहे त्या पार्श्‍वभूमीवर तर बांगलादेशाबरोबरील संबंध चांगले असणे हे अत्यंत आवश्‍यक आहेत.

दुसरीकडे पाकिस्तानातही अस्वस्थता आहे. पाच ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या बदलांनंतर पाकिस्तानातील नव्या सरकारबरोबरील भारताचे संबंध पूर्णपणे तुटले गेले आहेत. नेपाळमध्येही सातत्याने भारताविरोधात अविश्‍वासाचे वातावरण निर्माण केले जात आहे. भारताविरोधात बळ दिले जात आहे. त्याचा परिणाम म्हणून नेपाळने आपले राष्ट्रीय नकाशे बदलून व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या भारतीय प्रदेशांचा त्यामध्ये समावेश करण्याचे धाडस दाखविले आहे. कैलास-मानसरोवर यात्रेसाठीचा मार्गाचा त्यामध्ये समावेश केला आहे आणि भारताबद्दल नकारात्मक मानसिकता वाढीस लागलेल्या नेपाळच्या संसदेने त्या नकाशाला मान्यता देताना भारतासोबतच्या एकूण संबंधांबाबत भूमिकाच स्‍पष्ट केली आहे.

भारताचा आणखी एक शेजारी श्रीलंका सध्या आर्थिक मंदीशी झुंजत आहे. तसेच त्यांचे हंबनटोटा बंदर चीनने ताब्यात घेतल्यामुळे तेही एक प्रकारच्या दबावाखाली आहेत. याशिवाय अलीकडेच ‘इंडिया

आउट’ मोहीम राबवून मालदीवमध्ये मोहम्मद मोईझ्झूंचा उदय झाला आहे. तर ‘भारताच्या हिताची काळजी करू नका’ अशा तत्त्वावर भूतान सीमेवर चीन आपला दबाव निर्माण करून भारताच्या विरोधात त्यांना उभे करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

भारताच्या सर्व शेजाऱ्यांमध्ये जे काही सुरू आहे त्यामध्ये भारताचा काय दोष आहे की भारतामध्ये अस्वस्थता निर्माण करण्यासाठी हे जाणूनबुजून सुरू आहे.... मात्र असा विचार करण्यापूर्वी या सर्वांच्या तुलनेत भारत प्रबळ शक्ती आहे हे विसरून चालणार नाही. भारताचा ‘जीडीपी’ या सर्व देशांच्या एकत्रित ‘जीडीपी’च्या चौपट आहे. लोकसंख्या तिप्पट आहे आणि एकूण जागतिक पटलावरील शक्ती अनेकपट आहे.

विशेष म्हणजे वरील बहुतेक राष्ट्रांमधील लोकांनी प्रजासत्ताकाचा अनुभव घेतला आहे. लोकशाही स्वीकारलेली आहे. लोकशाहीमधील मुक्त श्‍वासही घेतलेला आहे आणि तेथे लोकशाही मानणाऱ्या तरुणाईची संख्या मोठी आहे. हे दुर्लक्षित करता येणार नाही.

अगदी तात्कालिक संदर्भातही विचार करताना. बांगलादेशात हसीना यांच्यासोबतची मैत्री असल्यामुळेच भारताने त्यांच्या अंतर्गत भागामध्ये सुरू असलेल्या घडामोडींविषयीची दखल घेतली नाही किंवा दुर्लक्ष केले. या देशांमध्ये प्रबळ सत्ताधीश आहेत. पण ते लोकमताचा अव्हेर करू शकत नाहीत. तेथे संपूर्ण हुकूमशाही नाही, पण आपल्या एवढी परिपूर्ण लोकशाहीही नाही. या देशांमधील सरकार आणि जनमत या दोघांचाही विचार करणे क्रमप्राप्त ठरते. सार्वभौमत्व हे जनमताला समजते. तेथील जनमतालाही सार्वभौमत्व समजले जाते. शेजारी देश भारताकडे द्वेषाने पाहत असतील तर ती काळजी करण्यासारखी बाब आहे. नेपाळ, मालदीव, श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये हे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ते भयानक आहे. नेपाळबरोबरील २०१५मधील तिढा विसरण्याजोगा नाही.

वस्तूतः ‘साऊथ ब्लॉक’ला या सर्व बाबींची कल्पना आहे. त्यासाठी त्यांच्या परीने ते पावले टाकत आहेत....मात्र माध्यमांमध्ये ‘सरकारशी मैत्रीपूर्ण’ अशा आशयाचे जे बोलले जाते, त्याबाबतचा बारकाईने मागोवा घेतला जात आहे आणि सोशल मीडियामुळे मात्र सारेच बिघडून जात आहे... कारण त्यावर कोणताही अंकुश नाही. त्यातून इतिहासात काय घडले याबाबत कोणताही अभ्यास न करता बांगलादेशात सैन्य पाठवा, बांगलादेशातील हिंदूंसाठी सीमा खुल्या करा तसेच रंगपूरमध्ये त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करा अशा मागण्याही जोर धरत आहेत.

ज्या दिवशी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी मालदीवचा दौरा संपवला त्या दिवशी त्यांनी २८ बेटे भारताला ‘सुपूर्द’ केली होती. काही हिंदी दूरचित्रवाहिन्यांनी त्यांच्या कार्यक्रमात ‘मोईझ्झू ने घुटने टेक दिए’, अशा आशयाची शीर्षके देऊन बातम्या चालविल्या होत्या. खरे तर हे सारे हास्यास्पद होते...मात्र मालदीव नक्कीच त्याचा विचार करणार. मालदीव आणि भारत यांचे परस्परावलंबन हे नक्कीच दुर्लक्ष करण्यासारखे नाही. याबाबत परराष्ट्रमंत्रालयाने हस्तक्षेप केला, संबंधित ‘ट्विट’ त्यांनी हटविली, मात्र तोपर्यंत खूपच उशीर झाला होता.

अल्पसंख्याकांना न्याय

हिंदुत्वाच्या मुद्द्याच्या अतिवापर करणे ही नाण्याची दुसरी बाजू आहे. पंतप्रधानांच्या नेपाळ आणि बांगलादेश दौऱ्यांमध्ये मंदिरांना भेटी हे ठळक वैशिष्ट्य होते. तथापि, मोठे वास्तव हे आहे की, आपल्या सर्वांत लांब सीमेवर आपल्याला मोठ्या मुस्लिम बहुसंख्य लोकांचा सामना करावा लागत आहे. जेव्हा आम्ही त्यांना त्यांच्या अल्पसंख्याकांशी न्याय्य वागणूक देण्यास सांगतो तेव्हा ते आपल्याकडूनही तशीच अपेक्षा ठेवतात. जेव्हा बांगलादेशमधील परिस्थिती विस्फोटक बनलेली आहे त्यावेळी आपले राजनीतिज्ञ ‘डॅमेज कंट्रोल’मध्ये गुंतलेले आहेत. या सर्व घडामोडी सुरू असतानाच आसामने गेल्या गुरुवारी बांगलादेशातील एका हिंदूला ‘सीएए’नुसार भारतीय नागरिकत्व दिले.

भारताच्या शेजाऱ्यांबाबतच्या धोरणाची वाजपेयींनी मांडलेली, डॉ. मनमोहन सिंग यांनी पुढे नेलेली आणि पंतप्रधान मोदींना चालना दिलेली मूलभूत रचना आजही गरजेची आहे. देशांतर्गत राजकारण, अतिधार्मिकता सोडून देऊन सर्वांशी मानवतेच्या आणि आदराच्या भावनेने आपल्या शेजारी देशांची बघणे सद्यस्थितीत आवश्यक आहे.

(अनुवाद : प्रसाद इनामदार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.