बिहारमधील मराठमोळा ‘सिंघम्’

सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारा आणि गुंड, राजकारणातील ‘गुन्हेगार’ यांना सळो की पळो करून सोडणारा रुपेरी पडद्यावरील ‘बाजीराव सिंघम’ प्रेक्षकांना भावला होता.
shivdeep lande
shivdeep landesakal
Updated on

सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारा आणि गुंड, राजकारणातील ‘गुन्हेगार’ यांना सळो की पळो करून सोडणारा रुपेरी पडद्यावरील ‘बाजीराव सिंघम’ प्रेक्षकांना भावला होता. लोकप्रिय झाला होता. वास्तवात जनतेचे असे प्रेम लाभलेला ‘सिंघम’ म्हणजे बिहारचे माजी पोलिस अधिकारी शिवदीप लांडे.

मूळ महाराष्ट्रातील असणारे लांडे हे २००६ च्या तुकडीतील बिहार केडरचे भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) तडफदार व पोलिस दलात दबदबा असलेले अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी नुकताच पूर्णियाच्या पोलिस महासंचालकपदाचा राजीनामा दिला. शिवदीप वामनराव लांडे हे मूळचे अकोला जिल्ह्यातील पारस गावचे आहेत.

२९ऑगस्ट १९७६ रोजी त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला होता. शेगावमधील ‘श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालया’तून लांडे यांनी इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीची पदवी मिळविली. हैदराबाद येथे सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमीतून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ते भारतीय पोलिस दलातील सेवेत रुजू झाले.

महाराष्ट्राच्या या भूमिपुत्राने पोलिस सेवेतील गेल्या १८ वर्षांच्या काळात बिहारमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली होती. पाटण्याचे पोलिस अधीक्षक असताना त्यांनी मुलींची छेड काढणाऱ्या रोडरोमिओंना धडा शिकविला होता. मुलींना ते हिंमत देत असत. काहीही अनुचित घडले तर थेट संपर्क साधण्यासाठी लांडे यांनी त्यांचा दूरध्वनी क्रमांकही जाहीर केला होता. यामुळे ते नागरिकांमध्‍ये खूप लोकप्रिय झाले होते. कडक शिस्तीचे पोलिस अधिकारी अशी लांडे यांचा प्रतिमा तयार झाली होती.

अनेक जिल्ह्यांमध्ये पोलिस अधीक्षक म्हणून काम करताना त्यांनी गुन्हेगारांवर जरब बसविली होती. यामुळे कायदा व सुव्यस्थेत सुधारणा झाली होती. मुझफ्फरपूरमधील कोसी उपविभागाचे उपमहानिरीक्षक, अररिया, पूर्णिया आणि मुंगेर जिल्ह्यात पोलिस अधीक्षक म्हणूनही त्यांनी काम केले. अनेक गुन्हेगारांना पकडले. लांडे यांच्या पराक्रमाचे अनेक किस्से बिहारमध्ये सांगितले जातात. खाण माफियाला धडा शिकविण्यासाठी ते त्याच्या घरी बुलडोझर घेऊन गेले होते.

खाण माफियांवर त्यांनी कठोर कारवाई केली होती. काही राजकीय नेत्यांच्या मालकीच्या क्रशरला टाळे ठोकण्याचे धाडस दाखवले. लांडे यांना प्रतिनियुक्तीवर महाराष्ट्रातही पाठविण्यात आले होते. त्यावेळी ते मुंबईतील दहशतवादविरोधी पथकात कार्यरत होते. २०२१ मध्ये त्यांना पुन्हा बिहारमध्ये पाठविण्यात आले होते. मदतीला सदैव तत्पर असलेल्या या पोलिस अधिकाऱ्याला नागरिकांनी ‘सिंघम’, ‘दबंग’ आणि ‘सुपरकॉप’ अशी अनेक विशेषणे बहाल केली होती.

बिहारी जनतेशी विश्‍वासाचे नाते निर्माण करणाऱ्या या मराठी ‘सिंघम’ने पोलिस सेवेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तरी पुढे ते काय करणार, असा प्रश्‍न सर्वांच्या मनात आहे. सरकारी नोकरी सोडून राजकारणात भवितव्य अजमावण्याच्या शक्यता त्यांनी तूर्त फेटाळल्या आहेत. जन्मभूमी महाराष्ट्र असली तरी बिहारला कर्मभूमी मानणारा हा धडाडीचा माजी पोलिस अधिकारी समाजकारण करणार असल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.