भाजपचे ज्येष्ठ नेते, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल रामभाऊ नाईक आज (ता. १६ एप्रिल) वयाची नव्वद वर्षे पूर्ण करत आहेत. त्यानिमित्त त्यांच्या राजकीय-सामाजिक क्षेत्रातील कार्यावर दृष्टिक्षेप.
उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल व भारत सरकारने अलीकडेच ‘पद्मभूषण’ पुरस्कार देऊन ज्यांना सन्मानित केले असे भाजपचे नेते रामभाऊ नाईक यांचा नव्वद वर्षांचा विलक्षण संघर्षमय जीवनप्रवास सर्व अर्थांनी प्रेरणादायी आणि आदर्श म्हणावा असा आहे.
१६ एप्रिल १९३४ रोजी सांगली जिल्ह्यात एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेली व त्याच परिसरातील आटपाडीसारख्या आडबाजूच्या एका लहान गावात बालपण घालवलेली एक व्यक्ती मुंबई सारख्या महानगरात येऊन स्वत:चे स्थान निर्माण करते, तीन वेळा महाराष्ट्राच्या विधानसभेत व पाचवेळा लोकसभेत निवडून जाते.
अटलजींच्या मंत्रिमंडळात स्वतंत्र कार्यभार सांभाळणारा राज्यमंत्री बनून अनेक महत्वाच्या खात्यांचा कारभार पाहते, स्वेच्छेने निवडणुकीच्या राजकारणातून बाजूला झाल्यानंतर उत्तर प्रदेशसारख्या देशातील सर्वात मोठ्या व अवघड राज्याचे राज्यपाल म्हणून संपूर्ण पाच वर्षांचा कार्यकाल यशस्वीरीत्या पूर्ण करते, ही सगळीच केवढीतरी मोठी ‘यशाची कहाणी’ आहे.
रामभाऊ नाईक यांची ही नव्वद वर्षांची वाटचाल अनेक प्रकारच्या व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनातील संघर्षांनी भरलेली आहे. वयाच्या पंचविशीत रामभाऊ मुंबईत आले. त्यावेळेला त्यांनी शिक्षण पूर्ण करून उपजीविकेचे मार्ग शोधायला सुरुवात केली होती; पण त्याचबरोबर भारतीय जनसंघाचे काम करायलादेखील त्यांनी सुरुवात केली होती.
त्या काळात, १९६०च्या सुमारास जनसंघाचे काम करणे म्हणजे पेटते निखारे हातात घेऊन चालण्याचा प्रकार होता. पण रामभाऊ विचलित न होता ध्येयपथावरून चालत राहिले. वैयक्तिक जीवनाची घडी बसवत असतानाच ते मुंबईत जनसंघाच्या कामाची पायाभरणी व उभारणी करण्याच्या कामात पूर्ण गुंतलेले होते.
१९६९मध्ये त्यांनी खासगी कंपनीतील उत्तम नोकरी सोडून पूर्ण वेळ जनसंघाचे काम करण्याचा निर्णय घेतला व मुंबई जनसंघाचे संघटनमंत्री ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली गेली. १९७५मध्ये आणीबाणीचे संकट भारताच्या लोकशाहीवर आले व इंदिरा गांधींच्या दमनचक्राचा वरवंटा सर्व विरोधी पक्षांवर फिरायला लागला. त्याही काळात रामभाऊ मुंबई जनसंघाचे संघटनमंत्री होते. आणीबाणीच्या विरोधात मुंबई महानगरात उभा राहिलेला लढा संघटित करण्यात त्यांचा फार मोठा वाटा होता.
आणीबाणी लागू झाल्याबरोबर जनसंघाचे मुंबईतील सर्व नेते आणि असंख्य कार्यकर्ते तुरुंगात डांबले गेले होते, जे बाहेर होते ते पोलिसांच्या व अटकेच्या भीतीच्या छायेत, जीव मुठीत धरून वावरत होते, काँग्रेसविरोधी अन्य राजकीय पक्षदेखील अशाच अवस्थेत होते.
अशा परिस्थितीत विस्कळीत झालेली संघटना सावरणे व मनोधैर्य खचलेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा संघर्षासाठी प्रेरित करणे हे अत्यंत कठीण आव्हान जनसंघाच्या ज्या धुरिणांनी परिश्रमपूर्वक स्वीकारले व यशस्वीरित्या झेलले त्यात रामभाऊ प्रमुख होते. रामभाऊंशी माझा परिचय याच काळात झाला. मी त्यावेळी शिक्षण संपवून पत्रकारितेत उमेदवारी करणारा एक शिकाऊ पत्रकार होतो.
आणीबाणीच्या विरोधात चाललेल्या भूमिगत लढाईत प्रचारसाहित्य तयार करणे व ते वितरीत करणे ह्या कामात मी सहभागी होतो. त्यामुळे रामभाऊंचा सहवास जवळजवळ रोजच लाभत असे. अगदी बारीकसारीक गोष्टींचा आधीच विचार करून नियोजन करणे, आखणी करणे व त्यानुसार प्रत्यक्ष कामाची अंमलबजावणी काटेकोरपणे करणे हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे आणि कार्यपद्धतीचे विशेष त्यावेळेला माझ्या लक्षात आले.
आणीबाणीविरोधातील लढा यशस्वी होऊन जनता पार्टी सत्तेवर आल्यानंतर देशात व महाराष्ट्रात राजकारणाची फेरमांडणी सुरु झाली. त्या फेरमांडणीत आत्तापर्यंत पडद्याच्या मागे राहून काम करणारे रामभाऊ नेतृत्वाच्या रांगेत आले. १९७८ मध्ये ते बोरिवली मतदारसंघातून विधानसभेत निवडून गेले. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही.
तीन वेळा विधानसभा व पाच वेळा लोकसभा अशी तब्बल सव्वीस वर्षे त्यांनी ‘लोकांनी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी’ ही जबाबदारी पार पाडली. त्यात त्यांनी स्वत:चा उत्तम ठसा उमटवला. याच काळात म्हणजे १९९४ मध्ये रामभाऊंना ‘लिम्फोमा’नामक कर्करोगाची लागण झाली. तीस वर्षांपूर्वी अशा रोगाची लागण होणे फारच आव्हानात्मक होते. कारण शास्त्र आजच्या इतके प्रगत झालेले नव्हते, उपचार अगदी मर्यादित होते.
त्यामुळे ‘कर्करोगाची लागण झाली’ म्हटल्यावर कोणाही व्यक्तीचे व त्याच्या कुटुंबियांचे हात पाय गळूनच जात असत. पण तिथेही रामभाऊंनी आपल्या वेगळ्या व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवले. ते आव्हान त्यांनी पूर्ण धीराने व ताकदीने झेलले.
आपल्या काटेकोर नियोजनबद्ध कामाच्या पद्धतीने अक्षरश: मृत्यूवर मात करून रामभाऊ आजारातून बाहेर आले व गेली तीन दशके पूर्ण कार्यक्षमतेने राजकीय, सार्वजनिक जीवनात वावरत आहेत. पक्षाने त्यांच्यावर दिलेल्या विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या ते पूर्ण न्याय देऊन पार पाडत आहेत. त्यांच्या कर्मठ कार्यपद्धतीचे व व्यक्तिमत्वाचे हे खरे यश आहे.
असे रामभाऊ नाईक आज वयाची नव्वद वर्षे पूर्ण करून शतकाकडे वाटचाल सुरू करत आहेत. त्यासाठी त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा !
विकासनिधीची कल्पना
संसद सदस्यांना आपल्या मतदारसंघातील विकासकामांसाठी उपलब्ध करून दिला जाणारा ‘संसद सदस्य स्थानिक विकास निधी’ (MPLAD) ही कल्पना रामभाऊंची ! त्यांच्या चिवट पाठपुराव्यामुळे ती प्रत्यक्षातही आली. असे अनेक यशस्वी मुद्दे रामभाऊंच्या सांसदीय कारकीर्दीशी जोडलेले आहेत.
(लेखक महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष आहेत.)
madhav.bhandari@yahoo.co.in
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.