- चंद्रशेखर बावनकुळे
भाजपच्या बालेवाडी येथील महाअधिवेशनाने ऐतिहासिक यश मिळविण्याचा संकल्प सोडला. अधिवेशनास उपस्थित प्रत्येक कार्यकर्त्याने समोर आलेले आव्हान पेलण्याचा निश्चय केला. विरोधकांच्या खोट्याच्या माथी सोटा हाणण्याचा निर्धार करणाऱ्या या अधिवेशनाविषयी.
‘भगवा ध्वज हा गुरू, पक्षनेतृत्व हे मार्गदर्शक आणि कार्यकर्ता ही ऊर्जा’ असा त्रिवेणी संगम २१ जुलै रोजी पुणेच्या बालेवाडी क्रीडा संकुलातील भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश अधिवेशनात घडून आला आणि कोणत्याही आव्हानाला छाताडावर पेलून ते समर्थपणे परतवून लावण्याचा नवा निर्धार करून पक्षाचे राज्यभरातील बिनीचे कार्यकर्ते कार्यक्षेत्रात परतले. आता लढाई दुहेरी आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या जनहिताच्या कामांची आणि योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून लोकसभा निवडणुकीतील जेमतेम एक शतांशाहूनही कमी पडलेल्या मतांची भरपाई करण्यासाठी नवी शस्त्रे परजण्याची मुभा पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यास प्राप्त झाली आहेच, पण याच जनहिताच्या अनेक योजनांविषयी जनतेच्या मनात खोटे कालवून संभ्रम निर्माण करण्याच्या विरोधकांच्या कुटिल नीतीची खेळी हाणून पाडण्याचे आव्हानही या लढाईत पेलावे लागेल. उपस्थित असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याने त्या आव्हानाचे अत्तर लावून राजकारणाच्या आणि विरोधकांच्या खोट्याच्या माथी सोटा हाणण्याच्या निर्धाराने जगण्याचे ठरविले आहे.
‘या तो हम जीतते है, या सीखते है!’ ... हे अटलबिहारी वाजपेयी यांनी पूर्वी उच्चारलेले वाक्य पुन्हा कार्यकर्त्यांना प्रेरित करीत आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निववडणुकांनी पक्षाला आणि कार्यकर्त्यास बरेच काही शिकविले आहे, आणि नव्या महाविजयाचा नवा विश्वासही रुजविला आहे. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये त्वेषाने लढण्याचे स्फुल्लिंग चेतविणारे हे अधिवेशन अविस्मरणीयच नव्हे, तर ऐतिहासिक ठरले आहे.
तेथील प्रेरणेमुळे आगामी विधानसभा निवडणुकीतील महाविजयाच्या संकल्पाची बीजे रुजली आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कार्यकर्त्यांना संबोधित करत होते, त्या वेळी त्यांच्या प्रत्येक शब्दागणिक चैतन्याचे स्फुल्लिंग चेतविले जात होते. अपयशाच्या खिन्न भावना पुसल्या गेल्या होत्या, संभ्रम दूर झाला होता.
लोकसभेच्या निवडणुकीत देशाने काँग्रेसला नाकारले, सातत्याने पराजय पहावा लागलेल्या या पक्षाचे संख्याबळ किंचित वाढताच या पक्षाच्या नेत्यांचा अहंकार उफाळून आला. खरे तर लोकसभा निवडणुकीच्या परीक्षेत काँग्रेस सपशेल नापास झाली आहे, त्यामुळे नापासांच्या अहंकाराचा बाऊ करून संभ्रमित न होता, भाजपप्रणित आघाडीला मिळालेला देशाचा सकारात्मक कौल पाहून प्रोत्साहित होण्याचा संदेश अमितभाईंच्या मार्गदर्शनातून कार्यकर्त्यांना मिळाला.
उद्धव ठाकरे सरकारने मोदी सरकारच्या १८ योजना बंद पाडल्या. ओबीसी समाजाचे परत गेलेले आरक्षण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणले. महाविकास आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक थांबवण्याचे पाप केले, हे सगळे जनतेला ठाऊक आहे, पण खोटे सांगण्याचा विरोधकांचा मारा इतका आहे की, जनतेला परत सांगावे लागणार आहे.
हे माझे सूत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोदाहरण समजावून दिले. ते म्हणाले, ‘१९८२ ते २०१४ पर्यंत जास्तीत जास्त सरकारे काँग्रेसची होती. शरद पवार स्वतः मुख्यमंत्री होते. १९८२पासून मराठ्यांना का आरक्षण दिले नाही, असा सवालही त्यांनी शरद पवार व काँग्रेसला केला. आता मतांकरीता दुफळी निर्माण करण्याचे काम सुरू आहे.
आमचे सरकार होते, तेव्हा आम्ही आरक्षण दिले, सुप्रीम कोर्टातही आरक्षण टिकवून दाखवले. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचे सरकार आले, आणि आरक्षण कोर्टात टिकले नाही. टिकवण्याचे प्रयत्न झाले नाहीत. आज मात्र त्यावरून राजकारण सुरू आहे.’
मोठे षडयंत्र
‘फेक नॅरेटिव्ह’ हे एक मोठे षडयंत्र आहे. लोकांपर्यंत खोटे पोहोचविणे हा या मूठभरांचा कट नाही. भारत कमकुवत राहावा, मोदी पंतप्रधान राहिल्यास भारत शक्तिशाली होईल आणि आपला टिकाव लागणार नाही, असे वाटणाऱ्यांचा हा कट आहे. ताकदीने आपण मैदानात उतरून फेक नॅरेटिव्हला चोख नॅरेटिव्हने उत्तर देण्याची तयारी आपण केली आहे.
आपल्यापैकी प्रत्येकाने रोज एक नोंद केली तरी फेक नॅरेटिव्ह संपून जाईल. पण दुर्दैवाने, कार्यकर्ते किंवा लोकप्रतिनिधीदेखील उदासीन आहेत. ही लढाई आज सोशल मीडियाच्या मैदानावर आहे. ‘फेक नॅरेटिव्ह’ हा आजचा रावण आहे, त्याच्या बेंबीत बाण मारला, की पुन्हा आपलीच सत्ता येईल. विरोधकांचा खोटारडेपणा सिद्ध करताना गृहमंत्री अमित शहा यांनी थेट भूमिका घेतली.
ते म्हणाले, कॉंग्रेसकडून अपप्रचार सुरू आहे. गरीब, पददलित, आदीवासींचा कल्याण करण्याच्या खोटारडा दावा काँग्रेसवाले करत आहेत, पण पन्नास वर्षे सत्ता असताना काँग्रेसने गरीब कल्याणासाठी काय केले? आरक्षण संपविण्याच्या खोट्या प्रचारामुळे संभ्रम पसरला, आणि उत्तर देण्यात आपण कमी पडलो, याची कबुली देऊन ते म्हणाले, ‘गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने आरक्षणाला बळ दिले.
काँग्रेसने घटना बदलण्याचा अपप्रचारही केला. पण मोदी सरकारने घटनेस सर्वश्रेष्ठ मानले आहे. जेव्हाजेव्हा महाराष्ट्रात भाजपचे सरकार येते, तेव्हातेव्हा मराठा आरक्षण मिळते, आणि जेव्हा शरद पवारांच्या आशीर्वादाने सरकार येते, तेव्हा आरक्षणाचा मुद्दा समाप्त कसा काय होतो? आता बघा, शरद पवारांचे सरकार आले, तर मराठा आरक्षण गायब होईल!
घरोघरी जाऊन पवारांच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश केला जाईल, संभ्रम पसरविण्याचे सारे प्रयत्न हाणून पाडले जातील. कॉंग्रेस नेते राहुल गांधींचा खटाखट खोटारडेपणा म्हणा की, कसाबला बिर्याणी खाऊ घालणाऱ्यांच्या मांडीवर बसून स्वतःस बाळासाहेबांचा वारस म्हणविणारे उद्धव ठाकरे हे ‘औरंगजेब फॅन क्लब’चे नेता आहेत, असा घणाघात शहा यांनी केला.
जे खोटे असते, त्याचे वय कमी असते. त्यामुळेच विधान परिषदेच्या निवडणुकीतच याच आघाडीच्या काही आमदारांनी खऱ्याच्या बाजूने मतदान करून अहंकाराचा फुगा फोडला. विधानसभेच्या आगामी निवडणुकीत विरोधकांच्या अहंकाराचा फुगा पुरता फुटून जाणार आहे, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांनी भ्रष्टाचाराला संस्थात्मक प्रतिष्ठा दिल्याचा थेट आरोप याच मंचावरून बोलताना अमित शाह यांनी केला होता. आरक्षणासारखा सामाजिक संवेदनशील मुद्दा शरद पवारांच्या राजकारणामुळेच क्लिष्ट होत गेल्याचा आरोपही त्यांनी केला.
मुखवटा फाडणार
केंद्रात मंत्री असताना महाराष्ट्राची सतत उपेक्षा करणाऱ्या, भ्रष्टाचारास प्रतिष्ठा देणाऱ्या आणि संवेदनशील प्रश्नांवरून समाजात तेढ माजविणाऱ्या राजकारणाचा भेसूर मुखवटा फाडण्यासाठी आम्ही आता मैदानात उतरलो आहोत. राज्यातील महायुती सरकारने आपल्या सत्ताकाळात जनहिताच्या अनेक योजना राबविल्या. त्या अपयशी व्हाव्यात यासाठी विरोधकांनी देव पाण्यात घातले आहेत.
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेवर विरोधकांनी टीका केली; पण या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या लाभार्थींकडून नोंदणीपत्रे भरून घेण्यासाठीही ते कामाला लागले. ही योजना फसविण्याच्या हेतूनेच हे सुरू असावे, या शंकेस वाव आहे. विरोधकांमार्फत दाखल केलेल्या अर्जात त्रुटी ठेवून लाभार्थींना अपात्र ठरविण्याचा आणि त्याचे खापर सरकारवर फोडण्याचा कट आखला जात असल्याची शंका फडणवीस यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादाला नवचैतन्य येत आहे, आणि नकारात्मकतेची बुरसट मरगळ दूर झाली आहे. भारत अधिक बलशाली होत राहिला तर आपला टिकाव लागणार नाही, या काही परकी शक्तींना वाटणाऱ्या भीतीमुळे भारतातील विरोधकांना हाताशी धरून त्यांनी चालविलेला खोटे पसरविण्याचा खेळ यापुढे चालू दिला जाणार नाही.
(लेखक भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत.)
(शब्दांकन : रघुनाथ पांडे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.