जनजातींच्या सन्मानासाठी ऐतिहासिक पाऊल

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी राष्ट्रपतिपदासाठी द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवार म्हणून घोषणा केली तो क्षण ऐतिहासिक होता.
draupadi murmu and narendra Modi
draupadi murmu and narendra Modisakal
Updated on
Summary

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी राष्ट्रपतिपदासाठी द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवार म्हणून घोषणा केली तो क्षण ऐतिहासिक होता.

राष्ट्रपतिपदासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने द्रौपदी मुर्मू यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामागची भूमिका विशद करणारा भाजप प्रदेशाध्यक्षांचा लेख.

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी राष्ट्रपतिपदासाठी द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवार म्हणून घोषणा केली तो क्षण ऐतिहासिक होता. भाजप हा ‘एनडीए’मधील सर्वात मोठा घटकपक्ष आहे. राष्ट्रपतिपदाची निवडणूक जिंकण्यासाठी `एनडीए’कडे संख्याबळ आहे. अशा स्थितीत भाजपने या पदाचा उमेदवार निश्चित करण्यासाठी प्रदीर्घ विचारविनिमय केला आणि हे नाव निश्चित केले. त्यांच्या रुपाने देशाला प्रथमच आदिवासी समाजातील राष्ट्रपती मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’, या घोषणेला अनुसरून ही निवड झाली.

पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर २०१४पासून या घोषणेला अनुसरून कारभार केला गेला. मोदी यांनी आर्थिक विकासावर भर देऊन विकसित देश होण्यासाठी भक्कम पावले टाकतानाच या विकासाला मानवी चेहरा असेल आणि तो सर्वसमावेशक असेल, याची काळजी घेतली. त्यांनी सत्तेवर आल्यानंतर लगेचच सांगितले होते की, त्यांचे सरकार हे समाजातील गरीबांसाठी आणि वंचितांसाठी समर्पित असेल. त्यांनी त्यांचे वचन पाळले आहे. या संदर्भात द्रौपदी मुर्मू यांच्या उमेदवारीच्या ऐतिहासिक निर्णयाकडे पहायला हवे.

‘एनडीए’ला ही निवडणूक जिंकण्याची पूर्ण खात्री आहे. द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देणे म्हणजे देशातील सर्वोच्च पदावर एक आदिवासी महिला बसेल, याची संपूर्ण समाजाला खात्री देणे आहे. अशा प्रकारचे पाऊल समाजाच्या हिताचे आहे. केवळ न्याय होऊन चालत नाही तर न्याय झाल्याचे दिसावेही लागते, असे म्हटले जाते. केवळ जनजाती समाजासाठी अर्थात आदिवासी समाजासाठी कल्याणकारी योजना राबवून त्यांना सबल करणे आणि विकासाच्या संधी उपलब्ध करणे पुरेसे नाही. त्या समाजाचाही या देशावर इतरांइतकाच हक्क आहे, याचा स्पष्ट जाहीर संदेश देणे तितकेच महत्त्वाचे. कोणत्याही समाजाचा माणूस आपल्या देशात उच्च पदावर जाऊ शकतो, हा संदेशही लोकशाहीच्या हितासाठी देणे आवश्यक आहे. ते काम द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार जाहीर करण्याने झाले आहे. म्हणून मी त्यांच्या नावाची घोषणा हा ऐतिहासिक प्रसंग म्हटले.

राष्ट्रपती होण्यासाठी द्रौपदी मुर्मू या योग्य उमेदवार आहेत. त्यांचा जन्म ओडिशातील आदिवासी विभागात एका गरीब कुटुंबात झाला. ग्रामीण आदिवासी भागात सर्व प्रकारची प्रतिकूल स्थिती असूनही द्रौपदी मुर्मू यांनी जिद्दीने शिक्षण पूर्ण केले आणि त्यांनी रमादेवी महिला विद्यापीठातून पदवी मिळविली. सुरुवातीला त्यांनी ओडिशा सरकारमध्ये जलसिंचन विभागात कनिष्ठ लीपिक म्हणून काम केले. त्यानंतर शिक्षिकेचे कामही केले. १९९७ मध्ये त्या भाजपच्या सदस्य झाल्या व रायरंगपूर नगरपंचायतीमध्ये नगरसेविका म्हणून निवडून आल्या. त्यांनी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष म्हणूनही काम केले. ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यात रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातून त्या २००० व २००४ अशा दोनदा निवडून आल्या. ‘सर्वोत्कृष्ट आमदार’ म्हणून २००७मध्ये त्यांना पुरस्कारही मिळाला. त्या राज्यात भाजपचा आघाडी सरकारमध्ये समावेश असताना द्रौपदी मुर्मू यांनी चार वर्षे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. भाजपच्या मयूरभंज जिल्हाध्यक्ष आणि ओडिशाच्या भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. २०१५ ते २०२० या कालावधीत त्यांनी झारखंडच्या राज्यपाल म्हणून काम केले. थोडक्यात त्यांना ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे राजकारण, आमदारकी, मंत्रीपद आणि राज्यपालासारखे संवैधानिक पद या सर्वाचा अनुभव आहे. त्यांनी पक्ष संघटनेतही कनिष्ठ पातळीपासून वरपर्यंत काम केलेले आहे. त्यांनी स्वतःला सिद्ध केलेले आहे.

मानसिक धैर्य

त्यांच्या असामान्य मानसिक धैर्याबद्दल आणि सदैव जमिनीवर पाय राहण्याच्या स्वभावाबद्दलही आदर वाटतो. त्यांनी आयुष्यात खूप यश अनुभवले. पण त्यांना वैयक्तिक जीवनात काही कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले. २०१० ते २०१४ या केवळ चार वर्षांच्या काळात एका पाठोपाठ एक घटनांमध्ये दोन मुलांच्या आणि पतीच्या मृत्यूचा आघात त्यांना सहन करावा लागला. त्यांना मोठा मानसिक धक्का बसला. परंतु त्यांनी स्वतःला सावरत त्यांनी समाजसेवेला वाहून घेतले. त्यानंतर २०१५ पासून पाच वर्षे झारखंडच्या राज्यपाल म्हणून प्रभावी काम केले. खरोखर त्या राजकीय नेत्यांसाठी एक आदर्श आहेत.

नियमित ध्यानधारणा करणाऱ्या द्रौपदी मुर्मू अत्यंत भाविक आहेत. त्यांना राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी त्यांनी आपले गाव सोडले. पण त्यापूर्वी त्या नेहेमीप्रमाणे गावातील शंकराच्या मंदिरात गेल्या, स्वतः मंदिर झाडून स्वच्छ केले आणि देवाची पूजा करून त्या दिल्लीकडे रवाना झाल्या. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू विजयी होतील हे निश्चित आहे. पण माझे सर्व राजकीय पक्षांना आवाहन आहे की, देशातील सर्वोच्च पदावर आदिवासी समाजातील महिला बसण्याचा हा प्रसंग म्हणजे जनजाती समाजाचा सन्मान आहे. आपण सर्वांनी आपले राजकीय मतभेद बाजूला ठेऊन द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा.

(लेखक भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.