Dr Mangala Narlikar : उक्ती- कृतीतील वैज्ञानिक दृष्टिकोन

मंगलाताई नारळीकर यांच्या निधनाने उक्ती आणि कृतीतही वैज्ञानिक दृष्टिकोन जपणारी विदुषी आपल्यातून गेली आहे.
dr mangala narlikar
dr mangala narlikarsakal
Updated on
Summary

मंगलाताई नारळीकर यांच्या निधनाने उक्ती आणि कृतीतही वैज्ञानिक दृष्टिकोन जपणारी विदुषी आपल्यातून गेली आहे.

मंगलाताई नारळीकर यांच्या निधनाने उक्ती आणि कृतीतही वैज्ञानिक दृष्टिकोन जपणारी विदुषी आपल्यातून गेली आहे. त्या पैलूची आठवण करून देणारा लेख. त्याचबरोबर त्यांच्या विद्यार्थिनीने मंगलाताईंविषयी व्यक्त केलेल्या भावना.

- उदय कुलकर्णी

‘चांद्रयान ३’चं यशस्वी प्रक्षेपण झालं, त्याच्याआधी ‘इस्त्रो’च्या शास्त्रज्ञांनी तिरुपतीला भेट देऊन देवदर्शन घेतल्याची बातमी प्रसिद्ध झाली. वैज्ञानिक म्हणून ज्यांची ओळख निर्माण झालेली असते ते तरी खऱ्या अर्थाने वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाणलेले असतात का, असा प्रश्‍न निर्माण झाला.

एखादा संशोधन प्रकल्प राबवताना तो यशस्वी व्हावा यासाठी हजारो मेंदू व हात काम करत असतात. अशा प्रकल्पासाठी काम करणारी सर्व माणसं व्यक्तिगत पातळीवर श्रद्धाळू नसावीत, अशी अपेक्षा करणं हे आजतरी दिवास्वप्न ठरेल. मुद्दा आहे तो संशोधन प्रकल्प राबवत असताना व्यक्तिगत श्रद्धेला सार्वजनिक ‘इव्हेंट’चं रुप देणं ‘इस्त्रो’सारख्या संस्थेतील प्रमुखांना टाळता आलं नसतं का?

केवळ पूजाअर्चा किंवा प्रार्थनेवर कोणत्याही प्रकल्पाचं यश किंवा अपयश अवलंबून नसतं ! डॉ. जयंत नारळीकर व डॉ. मंगला नारळीकर यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा सातत्याने मांडलेला विचार आपल्या समाजासाठी किती आवश्‍यक आहे, हे अशा घटनांमधून लगेचच लक्षात येते.

मंगलाताईंची ओळख केवळ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पत्नी अशी नव्हती. त्या स्वतः गणितज्ञ होत्या. १९६४मध्ये गणितात पदव्युत्तर पदवी कुलपतींच्या सुवर्णपदकासह प्रथम क्रमांकाने संपादन केल्यानंतर मंगलाताई १९६६मध्ये राजवाडेच्या नारळीकर बनल्या.

‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’मधून कारकिर्दीचा प्रारंभ करणाऱ्या व शुद्ध गणितात संशोधनाबद्दल स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या मंगलाताईंनी केंब्रिज विद्यापीठात पदवीपूर्व विभागामध्ये अध्यापनाचे काम केले. टाटा इन्स्टिट्यूटच्या ‘स्कूल ऑफ मॅथॅमटिक्स’ मध्येही त्यांनी काम केले.

१९८१ मध्ये मंगलाताईंनी विश्‍लेषणात्मक संख्या सिद्धांतावर संशोधनप्रबंध सादर करून मुंबई विद्यापीठाची डॉक्टरेट संपादन केली. १९८२ ते ८५ या काळात टी.आय.एफ.आर. मध्ये त्यांनी काम केले. १९८९ ते २००२ या काळात पुणे विद्यापीठाच्या गणित विभागात तर २००६ ते २०१० दरम्यान ‘भास्कराचार्य प्रतिष्ठान’ च्या केंद्रात एम.एस्सीच्या वर्गांमध्ये अध्यापन हाही मंगलाताईंच्या लक्षणीय कारकिर्दीचा भाग ! मुलामुलींना गणित हा विषय सोपा करून सांगण्यासाठी मंगलाताईंनी पुस्तके व लेख आवर्जून लिहिले.

कर्तव्यनिष्ठा

कोणतेही गणित अचूक पायऱ्या ओलांडून सोडवलं तरच सुटतं, हे त्यांना पक्कं माहीत होतं. वैज्ञानिक दृष्टिकोन यालाच तर म्हणतात. मंगलाताईंना कर्करोग झाल्याचे निदान झाल्यानंतरही त्यांनी देवस्थानांचे उंबरे झिजवण्याचे निदर्शनास आले नाही.

आधुनिक विज्ञानाच्या आधारे उपलब्ध उपचारांना हसतमुखानं सामोऱ्या जात त्या आपलं कर्तव्य पार पाडत राहिल्या. नारळीकर दाम्पत्याने कोणाच्या श्रद्धेची कधी टर उडवली नाही किंवा कुचेष्टा केली नाही. पण वैज्ञानिक दृष्टिकोनाचं मानवी जीवनातील महत्त्व आपल्या उक्ती व कृतीतून समाजमानसात बिंबविण्याचा प्रयत्न सातत्यानं केला.

dr mangala narlikar
Dr. Mangala Narlikar Passed Away : ज्येष्ठ गणिततज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचं पुण्यात निधन

सध्या भारतात हवामान बदलामुळे कुठे भूस्खलन अतिवष्टी व महापूर तर कुठे पाण्याचं दुर्भिक्ष्य जाणवत आहे. याबद्दल १९८० च्या दशकापासून सावधगिरीचा इशारा दिला जात होता. पण विकासाच्या नावावर निसर्गात अनियंत्रित स्वरुपामध्ये हस्तक्षेप करणे जगभर होत राहिला.

हा कार्यकारणभाव लक्षात घेऊन युद्धपातळीवर प्रामाणिकपणानं उपाययोजना केली तरच नैसर्गिक आपत्तींची तीव्रता क्रमाक्रमानं कमी होऊ शकेल. केवळ प्रार्थना, उपासना व कर्मकांड करून ही नैसर्गिक संकटं टळतील का, याचा गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे. मंगलाताईंसारख्या व्यक्तींच्या आयुष्यातून त्यासाठीची प्रेरणा नक्कीच मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.