बदलती गावे : डायमेकिंगचा परदेशातही डंका

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात चिंचणी गाव हे डायमेकिंग उद्योग क्षेत्रात नावाजलेले आहे
बदलती गावे : डायमेकिंगचा परदेशातही डंका
बदलती गावे : डायमेकिंगचा परदेशातही डंकाsakal media
Updated on

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात चिंचणी गाव हे डायमेकिंग उद्योग क्षेत्रात नावाजलेले आहे. गावची लोकसंख्या आहे सुमारे २० हजार. वाडवळ, भंडारी, आदिवासी, बारी, कुणबी, मिटणा, मांगेला अशा विविध समाजातील नागरिक येथे वास्तव्यास आहेत. विविध प्रकारच्या सोन्याचांदीच्या जडणघडणीत या गावाचा हातभार लागत आहे, त्यामुळे येथील डायमेकिंग व्यवसायाचा कलाकुसरीचा डंका फक्त देशातच नव्हे, तर परदेशातदेखील वाजत आहे.

सुमारे ६० ते ७० वर्षांपूर्वी या ठिकाणी पुरुषोत्तम सहमते यांनी डायमेकिंगचा व्यवसाय आणला. येथील हजारो हातांना आता त्या व्यवसायामुळे काम मिळत असल्याने त्यांचे योगदान फार मोठे मानले जाते. पूर्वी गावात सुतार, लोहारकाम केले जात होते. भारतातील विविध राज्यांसह दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, बहारीन, दुबईसह विविध ठिकाणी या कलाकुसरीच्या वस्तू विक्रीकरता जातात. या ठिकाणी सुमारे तीन हजार डायमेकर्स आहेत. काणस, वायर फायली, बॉक्स व डायमेकिंगशी संबंधित अन्य अवजारांची दुकाने असल्याने व्यवसायाला चालना मिळत आहे. डायमेकिंगकरता एक्सो मशीन, ड्रिलिंग मशीन, ग्राईंडिंग मशीन व डिझाईन मशीन यांचा वापर केला जातो. डायवर काम करणाऱ्यांना बारीक नजर आणि सूक्ष्म कला अवगत असावी लागते. त्या कलाकारीतून बांगड्या, हार, पैंजण, कानातले अलंकार, अंगठी अशी विविध आभूषणे तयार केली जातात.

चिंचणी गावातील डॉ. सुचिता करवीर यांनी डायमेकिंग विषयावर पीएच.डी. संपादन केली आहे. त्या श्रॉफ महाविद्यालयात उपप्राचार्या आहेत. हा व्यवसाय उद्योग क्षेत्राला हातभार लावत असला, तरी कामगार व व्यावसायिकांना निश्चित असे उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे कोरोना काळात व्यवसाय डबघाईला गेला. शासनाने भविष्याच्या दृष्टीने अर्थसाहाय्य करण्याची गरज असल्याचे येथील डायमेकर व्यावसायिक मधुकर करवीर यांनी सांगितले. शिक्षण कमी असले, तरी या व्यवसायात काम केले जाऊ शकते. त्यामुळे अनेक जण न डगमगता डाय तयार करण्याची कला शिकले. त्यातून त्यांना अनेक संधी चालून आल्या. एकाच गावात अनेक डायमेकर्स असल्याने विविध राज्यातून त्यांना आभूषणाला नक्षीकाम करण्यासाठी मागणी अधिक येऊ लागली. डायमेकिंगचा हा व्यवसाय अत्याधुनिकतेकडे वाटचाल करू लागला आहे. पूर्वी ठरावीक डाय तयार केल्या जायच्या; मात्र अनेक बदल व ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. त्यातून व्यावसायिक व कामगारांना नवनवीन कलेचे ज्ञान मिळत आहे. वाडवडिलांनी सुरू केलेला व्यवसाय पुढची पिढी करत आहे. त्यातून मुलांचे शिक्षण, घरखर्च, विवाहासह विविध कामांसाठी आर्थिक मदत होत आहे. या व्यवसायातून येथील मुलांनी उच्च शिक्षण घेतले आहे. अनेक गावकरी चांगल्या हुद्द्यावर आहेत. शैक्षणिक भरारी घेताना सामाजिक बांधिलकीदेखील जपली जात आहे. विविध सामाजिक उपक्रमात गावाचा सहभाग असतो, हे विशेष. या व्यवसायाकडे शासनाने लक्ष दिले, तर निर्यातीला येणाऱ्या अडचणी दूर होऊन उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढेल आणि येथील डायमेकर्सचा रोजगार आणखी वाढू शकेल.

आपण दागदागिने आवडीने घालतो. त्यासाठी आभूषणाची कलाकुसर किती छान आहे, याचा विचार करूनच खरेदी करत असतो. चिंचणी गावातील हे कामगार ग्राहकांना आभूषणे पसंतीस कशी उतरतील, याची आवर्जून काळजी घेत असल्याने आज देशातच नव्हे, तर परदेशातदेखील या गावाने नावलौकिक मिळवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.