महागड्या विवाह समारंभांचे त्रांगडे

महागडे विवाह समारंभ ही आपल्या समाजात नवरीत रूढ होत आहे. अनुकरणप्रिय समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत ते रुजल्यामुळे विवाह समारंभांवरील वारेमाप खर्च सामान्यांवर कर्जाचा डोंगर उभा करतो, याच्या सामाजिक, आर्थिक परिणामांचा विचार करावा.
Consider social and economic implications expenses on wedding ceremonies that create debt for common man
Consider social and economic implications expenses on wedding ceremonies that create debt for common manSakal
Updated on

महागडे विवाह समारंभ ही आपल्या समाजात नवरीत रूढ होत आहे. अनुकरणप्रिय समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत ते रुजल्यामुळे विवाह समारंभांवरील वारेमाप खर्च सामान्यांवर कर्जाचा डोंगर उभा करतो, याच्या सामाजिक, आर्थिक परिणामांचा विचार करावा.

- हेरंब कुलकर्णी

महागडे विवाह समारंभ ही आपल्या समाजात नवरीत रूढ होत आहे. अनुकरणप्रिय समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत ते रुजल्यामुळे विवाह समारंभांवरील वारेमाप खर्च सामान्यांवर कर्जाचा डोंगर उभा करतो, याच्या सामाजिक, आर्थिक परिणामांचा विचार करावा.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याकडे नुकत्याच झालेल्या शेकडो कोटींच्या लग्नपूर्व कार्यक्रमाची देशासह जगभर चर्चा झाली. त्यापूर्वी त्यांच्याच कन्या ईशा यांच्यासह प्रसिद्ध उद्योगपती सुब्रतो रॉय, कर्नाटकातील खाणसम्राट जनार्दन रेड्डी, पोलाद उद्योगातील नामवंत लक्ष्मी मित्तल यांच्या अपत्यांच्या शेकडो कोटींच्या खर्चाच्या विवाह समारंभांचीही चर्चा त्या-त्यावेळी झाली.

खरेतर विवाह ही एक बाजारपेठ आहे. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) या उद्योजकांच्या संघटनेने नोव्हेंबर २०२३ मध्ये नमूद केल्याप्रमाणे, ‘भारतात २३ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०२३ या काळात ३८ लाख विवाह होणार असून, त्यावर किमान ४.७४ लाख कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे.

२०२२च्या याच काळात ३२ लाख विवाह झाले होते, त्याद्वारे ३.७५ लाख कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. २०२२ वर्षीपेक्षा २०२३मध्ये एक लाख कोटीने खर्चवाढ आहे.’ या एकूण विवाहांपैकी सुमारे ५० हजार विवाह असे असतील की, ज्यात एकावर किमान एक कोटींपेक्षा जास्त खर्च होईल.

याशिवाय सात लाख विवाह असे असतील, की ज्यात प्रत्येकी तीन लाख रुपयांपेक्षा कमी खर्च होतील. इतर ५० हजार विवाहांवर प्रत्येकी ५० लाख रुपये खर्च होतील. विवाहांमुळे अर्थव्यवस्थेला मदत होते आणि एक मोठी बाजारपेठ व आर्थिक उतरंड यातून उभी राहते, हा मुद्दा असला तरी त्याचे सामाजिक परिणाम लक्षात घ्यावेत.

गेल्या पंधरा वर्षांत नवश्रीमंत वर्ग, सेलिब्रिटी यांच्याकडील विवाह समारंभाची, त्याचा डामडौल, त्यानिमित्ताने होणारे कार्यक्रम, त्यांचे स्वरूप आणि त्यामुळे आलेले हायप्रोफाईल स्वरूप याची विविध प्रकारच्या प्रसार माध्यमांसह समाजमाध्यमांवरही तडाखेबंद चर्चा होते.

यानिमित्ताने त्यांच्या संपत्तीचे होणारे प्रदर्शन हिमनगाचे टोक म्हणावे लागेल. त्यामुळे, त्यावर टिका केली तर यात तुमचे काय बिघडते. ते त्यांचा पैसा खर्च करतात, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? असा प्रश्न नवतरुण विचारतील.

वरवर बघता हा प्रश्न तार्किक आहे. मूल्यव्यवस्था हा कदाचित त्यांचा काळजीचा विषय नसेलही. कारण ते ज्या काळात जगतात, ज्या अर्थव्यवस्थेचा भाग आहेत, त्या काळात व्यक्तिवादी विचारसरणीत तळातल्या समाजावर काय परिणाम होईल? याचा विचार मागे पडणे स्वाभाविक आहे.

महात्मा गांधींनी वाराणसीला जेव्हा भेट दिली तेव्हा तेथील दागिने घालून आलेल्या श्रीमंत व्यक्तींवर त्यांनी जाहीरपणे त्यांच्यासमोर टीका केली होती. गांधींच्या भुमिकेनुसार आज आपण या नव्या श्रीमंत प्रदर्शनाचे विश्लेषण करण्याची आवश्यकता आहे.

श्रीमंतांनी आपल्या संपत्तीकडे विश्वस्त म्हणून बघावे, या गांधींच्या विचाराने आज फार कोणी वागणार नाही, हेही समजण्यासारखे आहे. पण आपल्या या वागण्याचा समाजातील तळातील वर्गावर काय परिणाम होईल? याचा विचार करावा.

या विवाहाचा परिणाम हा होतो की, त्यांच्या खालच्या आर्थिक पायरीवर जे आहेत ते त्यांना ‘रोल मॉडेल’ म्हणून स्वीकारतात. तशा प्रकारे खर्च करतात. उद्योजक, सेलिब्रिटी, राजकारणी या विवाह समारंभात वापरलेल्या पद्धती, त्याचे व्यवस्थापन, खर्च यांचे अनुकरण करतात.

किमान १०० कोटींवर खर्चाचे विवाह होण्याचे प्रमाण वाढेल. मूळ चिंता ही उच्चभ्रू वर्गाच्या महागाड्या विवाह समारंभांची नाहीतर ज्या सामान्यांना असे खर्च पेलवत नसताना त्यांना समाजातल्या बडेजावाच्या पोकळ संकल्पानांमुळे खर्च करावे लागतात, त्यांच्याबाबत आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या ‘हम आपके है कौन’ या एका चित्रपटाने विवाह व्यवस्था प्रचंड महागडी केली. त्याने ड्रेस डिझाईनपासून अनेक बाजारपेठा फुलवल्या. आज शहरी भागात आणि अगदी तालुक्यातसुद्धा विवाह समारंभानंतर स्वागत समारंभाचा पॅटर्न रूढ आहे.

त्यासाठी काही लाख रुपयांचे पॅकेज असते. शिवाय, प्री-वेडिंग शूट प्रकार तर ग्रामीण भागातही रुजला आहे. पूर्वी ग्रामीण भागात अगदी शेतात, घरासमोर विवाह होत. छोटा मांडव टाकला जायचा. बैलगाडीने किंवा अन्य खासगी वाहनांनी वऱ्हाड यायचे.

कमी खर्चात लग्नं व्हायची. आज मात्र शहरी, नवश्रीमंत वर्गाच्या अनुकरणाने गरिबांची फरफट होते, हा चिंतेचा विषय आहे. ग्रामीण भागातील नवश्रीमंत वर्गानेही संपत्तीचे प्रदर्शन चालवले आहे. विशेषतः ग्रामीण राजकीय नेत्यांनी त्याची सुरुवात केली. लोकांच्या संपर्काचे माध्यम म्हणून नेते अशा समारंभाना आवर्जून हजेरी लावतात.

उद्योगपती, सेलिब्रिटींच्या लग्नाला जर पंतप्रधान, मुख्यमंत्री येतात; तर खेडुतांच्या समारंभात आमदार, खासदार, सभापती अपरिहार्य ठरतात. ते यावेत म्हणून लोक जीव काढतात. मग नेतेही समारंभातील मोठ्या गर्दीत जाऊन शुभेच्छापर भाषणे देतात. विवाहात जमणारी गर्दी आणि तेथे होणारा प्रचंड खर्च हा प्रतिष्ठेचा मानदंड झाल्याने, परवडत नसले तरी कर्जबाजारी होऊन लोक अनुकरण करतात.

विवाह समारंभासाठी गार्डन मंगल कार्यालय, फार्महाऊस घेणे, स्वागत समारंभ ठेवणे हा पॅटर्न रुजला आहे. आपण तसे केले नाहीतर ‘गरीब’ ठरू, अशा समजुतीने कनिष्ठ मध्यमवर्गही भरडला जातो आहे. कनिष्ठ व निम्न मध्यमवर्ग कुटुंबाचा आज विवाहावरील खर्च दहा लाखांपुढे गेला आहे. तो करणे जीवावर येते, पण अनुकरण संस्कृतीपोटी करावाच लागतो, हेच खरे.

यात सर्वात वाईट स्थिती ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी यांची होते. घरासमोर मांडव टाकून आता कोणीही लग्न करीत नाही. अगदी तालुक्यापेक्षाही छोट्या गावांच्या वेशीवर दिमाखदार लॉन मंगल कार्यालये दिसतात.

बहुतांश लोकांची त्यांनाच पसंती असते. महागड्या शहरी विवाह समारंभाचे ते मिनी मॉडेल. वाजंत्री, मिरवणूक, घोडे नाचवणे, ड्रोन कॅमेऱ्यापासून सारे असते. अशी कार्यालये सगळ्या बाबींचा ठेका घेतात. लाखोंचे पॅकेजच असते.

परवडत नसले गरिबांना ते स्वीकारावे लागते. पतसंस्था, बँकांचे कर्ज ज्या कारणासाठी वाटले जाते त्यात विवाह समारंभासाठी कर्ज हे महत्त्वाचे कारण असते. याचा सर्वात विदारक पैलू शेतकरी आत्महत्त्येच्या प्रश्नात दिसून आला. शेतकरी आत्महत्त्येचे आजपर्यंत जे अभ्यास झाले त्यात विवाहासाठी घेतलेले कर्ज हे एक कारण आढळले आहे.

‘दारिद्र्याची शोधयात्रा’ या अभ्यासासाठी मी ग्रामीण महाराष्ट्रात फिरलो. त्यात लोक स्थलांतरित मजूर का होतात? याचा अभ्यास केला. तेव्हा विवाहासाठी ठेकेदाराकडून उचल घेतली जाते, ती फेडण्यासाठी मजूरकामाला जातात असे आढळले. सालगडी प्रथेत लग्नासाठी कर्ज काढून नंतर कामाला जे जातात त्यांना ‘लग्नगडी’ म्हटले जाते.

श्रीमंतांच्या अनुकरणाचा हा रोग इतका संसर्गजन्य आहे की, त्याच्या नवजनरितीने समाजातील मोठा घटक बळीही पडतो आणि कर्जाच्या डोंगराखाली दबूनही जातो. हे विचारात घेवून समाजावर प्रभाव टाकणाऱ्या समाजघटकांनी आपल्या संपत्तीचे प्रदर्शन टाळले पाहिजे.

अर्थात अशा समारंभांमुळे बाजारपेठ गती घेते, असाही मुद्दा मांडला जातो. पण या बाजारपेठेचे बळी हा खर्च न परवडत असलेला मोठा गरीब वर्ग आहे, हे लक्षात घ्यावे. त्यासाठी सामुदायिक विवाहाची चळवळ गतिमान करणे आणि त्याला प्रतिष्ठा देण्यासाठी प्रभावशील व्यक्तींनी त्यात आपल्या मुला-मुलींचे लग्नं लावून देणे यावर भर द्यावा. त्यामुळे विवाह सोहळ्यातील संपत्तीचे प्रदर्शन आणि गरिबांची फरफट थांबेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.