कोरोनाची आपत्ती राष्ट्रीय आणि सामाजिक स्वरूपाची आहे. त्यावर मात करण्यासाठी कर्मचाऱ्यांना मदत आणि मनोधैर्य उंचावण्यासाठी सहकार्याचे उपक्रम अनेक कंपन्यांनी बांधिलकीच्या भावनेने राबवले. त्याविषयी...
कोरोना महामारीच्या दुसऱ्या टप्प्यात कर्मचाऱ्यांमधील अस्थिरता, अस्वस्थता लक्षात घेऊन कंपनी व्यवस्थापनांना त्यावर तोडगा काढावा लागला. अशा कठीण स्थितीत कर्मचाऱ्यांना सहानुभूतिपूर्वक मदतीचा हात देण्याबरोबरच कर्मचाऱ्यांसंदर्भात धोरणात्मक निर्णय आणि त्यांच्या अंमलबजावणीसाठी प्रसंगी चाकोरीबाहेर जाऊन केलेल्या प्रयत्नांचा कानोसा भविष्यातील वाटचालीसाठी मार्गदर्शक ठरतो.
लसीकरणासह कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या कंपन्यांनी व्यवस्थापन स्तरावर आता विविध प्रकारच्या व्यापक उपाययोजना सुरूच ठेवल्या आहेत. यामध्ये लसीकरणाशिवाय त्यानंतरची रजा, आवश्यक सल्ला, समुपदेशन आणि त्याद्वारे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मानसिक, भावनिक गरजांपोटी आवश्यक सहकार्य या साऱ्यांचा समावेश आहे. कोरोना दरम्यान कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय, मित्र, नातेवाईक यांच्यावर परिणाम झाले. अनेकांना तातडीने उपचारांची गरज भासली, काहींना जीवघेणी जोखीम स्वीकारावी लागली. प्रसंगी काहींच्या जिवावरही बेतले. आर्थिक खर्चाच्या जोडीला मानसिकदृष्ट्याही हे पैलू विविध समाजघटकांप्रमाणे कंपनी कर्मचाऱ्यांसाठीही आव्हानात्मक ठरले. त्यावर तेवढीच परिणामकारक उपाययोजना तातडीने आणि दीर्घकालीन स्वरूपात होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अशी उचलली पावले
गोल्डमॅन सॅच कंपनीमध्ये कोरोनाकाळात प्रत्येक कर्मचाऱ्याने आपली आणि आपल्या कुटुंबाची कटाक्षाने काळजी घ्यावी यासाठी प्रत्येक शुक्रवारी विशेष प्रयत्नांचे आवाहन करण्यात आले. त्यानुरूप प्रयत्न केले गेले. कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात आपली व आपल्याशी संबंधित इतरांची काळजी घेऊन कोरोनावर मात करण्यासाठी शुक्रवारी विशेष रजा गोल्डमन व्यवस्थापनाने दिली.
गोदरेज प्रॉपर्टीजने कर्मचाऱ्यांना प्रदीर्घ काळापर्यंत घरून काम करतांना जो ताण-तणाव आला त्याचा वैयक्तिक व कौटुंबिक स्वरुपात अपरिहार्य परिणाम झाला. कर्मचाऱ्यांनी अशा आव्हानात्मक स्थितीत आपले काम परिणामकारक पद्धतीने जारी ठेवावे, यासाठी गोदरेज प्रॉपर्टीज व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांसाठी कामादरम्यान मानसिक आराम हा अभिनव उपक्रम राबवला. यामध्ये कंपनीचे सुमारे २००० कर्मचारी सहभागी झाले. त्याचे सकारात्मक परिणाम कर्मचारी, कंपनी या उभय स्तरांवर दिसले.
नव्या नात्याची निर्मिती
काही कंपन्यांनी ज्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली अथवा त्यांच्यावर प्रदीर्घ काळासाठी उपचार सुरू होते अशा कर्मचाऱ्यांशी संवाद, तर त्यांच्या कुटुंबियांशी कायमस्वरूपी संपर्क ठेवला. यासाठी कंपनीतले सहकारी व गरजेनुसार विशेष समुपदेशकांची मदत घेतली. विशेषत: कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांचे मनोबल त्यामुळे वाढले. यानिमित्ताने वेगळ्या नात्याची निर्मिती झाली. या कंपन्यांनी त्यांच्या व्यवसाय नीतीमध्ये ‘कर्मचारी प्रथम’ या धोरणाचा परिचय दिला.
कंपन्यांच्या उच्च व्यवस्थापनाच्या मते कोरोना महासाथ हे वैयक्तिक, व्यावसायिकच नव्हे तर सामाजिक, राष्ट्रीय संकट ठरले. व्यावसायिक म्हणून नव्हे तर समाज म्हणून सर्वांचीच या निमित्ताने वैयक्तिक व सामुहिक स्वरूपात दीर्घकालीन परीक्षा ठरली. कंपनी आणि कर्मचारी कठीण, आव्हानाच्या काळात परस्परांच्या गरजांपोटी काय करू शकतात, याचा वस्तुपाठ सर्वांना मिळाला.
तातडीने आर्थिक मदतही
कोरोनाकाळात इतर समाज घटकांप्रमाणे कर्मचाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले. यामध्ये पगार कपातीपासून उशिरा पगार होण्यापर्यंतच्या अडचणींचा समावेश होता. कंपनी, कर्मचारी या उभयतांनी अधिकाधिक सामंजस्य, संयम व सहकार्यासह आपली भूमिका पार पाडली. प्रसंगी काही कंपन्यांनी गरजू कर्मचाऱ्यांना तातडीने आर्थिक मदतही दिली.
उदाहरणादाखल सांगायचे झाल्यास सेब्स फोर्स इंडिया कंपनीने कर्मचारी अथवा त्यांच्या कुटुंबातील कुणाला कोरोना बाधा झाल्यास एकरकमी १५ हजार रुपयांचे सहाय्य स्वपुढाकाराने दिले. कर्मचाऱ्यांना कोरोनावरील उपचारार्थ सहा आठवड्याची विशेष रजा दिली. बजाज अलायंझ लाइफ इन्शुरन्स कंपनीने कर्मचाऱ्यांना घरगुती उपचारापोटी वैद्यक सेवा धोरणांतर्गत तातडीने २० हजार रुपयांची मदत दिली. याशिवाय रुग्णालयात दाखल कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांचे दावे कंपनीने प्राधान्याने निकाली काढले. आर्थिक सेवा व्यवस्थापन व मानांकनासंदर्भात विशेष व महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या क्रिसिल या कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी विशेष आर्थिक तरतूद म्हणून आगामी वार्षिक बोनसपैकी अर्धी रक्कम देऊन कोरोना पीडित कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना सहकार्य केले. याशिवाय ज्या कर्मचाऱ्यांना कोरोनाविषयक उपचार घ्यावे लागले त्यांच्या वैद्यकीय उपचारांचा खर्च व्यवस्थापनाने केला होता.
संबंधांना नवा आयाम
उल्लेखनीय बाबी म्हणजे सनलाइफ कंपनीने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना महत्त्वाच्या गरजांपोटी प्रत्येकी १० हजार रुपये दिले. ‘टार्गेट इंडिया’ने कर्मचारी तसेच त्यांच्या घरच्यांच्या उपचारासाठी विशेष रजा, सल्ला मार्गदर्शन दिले. ‘आयबीएम’ने कोरोनाग्रस्त कर्मचारी व त्यांच्या कुटुंबासाठी उपचार आणि इतर खर्चापोटी ५ लाख रुपयांच्या अतिरिक्त विमाराशीची तरतूद केली. ‘अव्हेंच्युअर’तर्फे कोरोना उपचारादरम्यान गरजेनुरूप प्लाझ्मा दात्यांची वेळेत व गरजेनुरूप उपलब्धता करून देण्याचे काम केले आहे. याचा मोठा फायदा कंपनीच्या गरजू कर्मचाऱ्यांना झाला. व्यवस्थापक आणि व्यवस्थापन स्तरावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संदर्भात व आर्थिक, प्रशासकीय स्वरूपात कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्यांना साथ देणाऱ्या कंपन्यांप्रमाणेच त्यातील मुख्याधिकारी वा तत्सम उच्च पदस्थांनीही आपली जबाबदारी विशेष कर्तव्यासह पार पाडली.
यामध्ये व्यवस्थापन प्रतिनिधींनी कोरोनापिडीत कर्मचाऱ्यांशी संपर्क, संवाद साधून त्यांचे मनोधैर्य कायम राखणे, त्यांच्या कुटुंबियांना गरजेनुरुप मदत यासारखी कामे तर अनेक कंपनी अधिकाऱ्यांनी केली. त्यातही विशेष म्हणजे काही कंपन्यांच्या मुख्याधिकाऱ्यांनी कोरोनाचा प्रकोप तीव्र स्वरूपात असतांना आपल्या कर्मचाऱ्यांना रुग्णालयात प्रवेश मिळण्यापासून उपचार, आवश्यक ती औषधे वेळेत उपलबध करून देण्यासाठी रुग्णालय अधिकाऱ्यांपासून शासकीय अधिकारी व प्रसंगी नेते, मंत्र्यांपर्यंत संपर्क साधला. यातून कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्यांची निकड भागलीच, पण कंपनी कर्मचारी व्यवस्थापनादरम्यानच्या संबंधांना नवा आयामही त्याद्वारे मिळाला.
(लेखक मनुष्यबळ विकास, व्यवस्थापन सल्लागार आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.