...वर्तमान ते खोटे!

कृत्रिम बुद्धिमत्ता वरदान नक्कीच आहे, पण ती चुकीच्या हातात गेली की तिचे शापात रुपांतर होते.
deepfakes personal data artificial intelligence machine learning  information technology act
deepfakes personal data artificial intelligence machine learning information technology actSakal
Updated on

एरवी वरदान ठरणाऱ्या आधुनिक शास्त्रांना दुसरी काळी बाजूदेखील असते. सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नव्या संशोधनाचा बराच बोलबाला चालू आहे, आणि यात मानवजातीच्या भविष्यकाळाची बीजे दडली आहेत, हे गृहितक आता सर्वमान्य झाले आहे. हीच कृत्रिम बुद्धिमत्ता वरदान नक्कीच आहे, पण ती चुकीच्या हातात गेली की तिचे शापात रुपांतर होते.

‘डीपफेक’ तंत्रज्ञान हे अशाच विध्वंसकांच्या हाती लागलेले नवे खेळणे. त्याला आवर कसा घालायचा, याची चिंता जगभर व्यक्त केली जात असून भारतातही केंद्रीय केंद्रीय माहिती- तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी नुकतीच माहिती तंत्रज्ञानातील महत्त्वाच्या कंपन्यांच्या प्रमुखांची बैठक घेऊन ‘डीपफेक’ प्रकरणांची तड लावण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमण्याची घोषणा केली.

मध्यंतरी दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना, कतरिना कैफ आणि काजोल यांच्यासारख्या अव्वल तारकांच्या अश्लील चित्रफिती वेगाने व्हायरल झाल्या. त्या कितीही हुबेहूब असल्या तरी नकलीच होत्या आणि ‘डीपफेक’ या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नव्या तंत्रज्ञानानिशी केलेले ते उद्योग होते.

त्यामुळे देशभर गदारोळ उठला. ‘डीपफेक’चा पहिला बळी महिलाच ठराव्यात, हा काही योगायोग नाही. तो घाणेरड्या मानसिकतेचाच एक भाग आहे. जगभरातच असल्या नकली अश्लील चित्रफितींचा सुळसुळाट झाला आहे. स्कार्लेट जोहान्सन, ‘सुपरवूमन’फेम गाल गाडोट किंवा अन्य हॉलिवूडच्या तारकांनाही ‘डीपफेक’चा बळी ठरावे लागले आहे.

बराक ओबामा, ट्रम्प किंवा विद्यमान अध्यक्ष ज्यो बायडेन यांनाही याची झळ सोसावी लागली आहे. असल्या प्रकारांना कुठेतरी आळा घालणे भाग असले तरी त्याबाबत पावले युद्धपातळीवर उचलली जाताना दिसत नाहीत,

ही मात्र चिंतेची बाब. समाजमाध्यमांच्या सर्वव्यापी अस्तित्वामुळे माहितीची देवाणघेवाण क्षणार्धात होऊ लागली, मोठमोठाले व्यवहार, संपर्क विनासायास होऊ लागले, एका अर्थी जग हे एक खेडे होऊन बसले, जिथे सरहद्दींचे काच नव्हते की वर्गविग्रहाचे ताण नव्हते.

पण ‘डीपफेक’सारखे प्रगत तंत्रज्ञान याच सर्वव्यापी जाळ्याच्या मिषाने आपले विषही वेगाने पसरवू लागले आहे. भारतात ‘डीपफेक’ तंत्रज्ञानाची चर्चा आत्ता होऊ लागली, पण ते अस्तित्वात आले सहाएक वर्षांपूर्वीच. पहिला गैरप्रकार २०१७ मध्ये उघडकीस आला होता.

अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुका २०१९मध्ये झाल्या, तेव्हा माजी अध्यक्ष बराक ओबामा यांना शिवराळ बोलताना दाखवणारी चित्रफित सर्वदूर प्रसारित झाली होती. याबाबत काहीतरी करायला हवे, असे जगातले सगळेच प्रमुख सत्ताधारी म्हणत असतात. प्रत्यक्षात जुनाट कायद्यांच्या आधारानेच ‘डीपफेक’ गुन्हेगारांना शिक्षा ठोठावावी लागते.

स्वामित्त्व कायद्याचा भंग, डेटाचोरीचा आरोप, माहितीचा दुरुपयोग यासंबंधीची कलमेच लावली जातात. साहजिकच ‘डीपफेक’वाल्यांना शिक्षाही तुलनेने जुजबीच होते. भारतात तर यासंबंधीच्या कायदेकानूंच्या बाबतीत वानवाच आहे.

आपल्याकडील माहिती-तंत्रज्ञानविषयक कायदे तेवीस वर्षांपूर्वी तयार केलेले आहेत! ‘डीपफेक’ चित्रफिती स्वत:हून काढून टाका, असे मंत्रिमहोदयांनी कंपन्यांना फर्मावले. पण एवढे निश्चितच पुरेसे नाही. समाजमाध्यमांवरील विविध मोठे मंच हीच ‘डीपफेक’वाल्यांची ‘कर्मभूमी’ असते.

माध्यममंचांनी आचारसंहिता पाळावी, असा विचार काही वर्षांपूर्वी पुढे आला होता आणि तशी तयारीही या कंपन्यांनी दाखवली होती. प्रत्यक्षात काय घडले? स्वतंत्र अधिकारी नेमून किंवा आचारसंहिता आणून यामध्ये बदल होण्यासारखा नाही. याचे कारण आंतरजालावर असले उद्योग करणारे महाभाग नेमके कुठून आपला कार्यभाग साधतात, हे हुडकून काढणे प्रचंड जिकीरीचे आणि खर्चिकही आहे.

‘डीपफेक’ तंत्रज्ञानाच्या दुरुपयोगाची झळ महिलावर्गाला सर्वाधिक बसते, हे तर उघड आहे. पण याचे राजकीय परिणामही गंभीर आहेत. विशेषत: ज्या देशात कुठे ना कुठे सतत निवडणुका होत असतात, अशा आपल्या देशात ‘डीपफेक’ प्रचार सगळे वातावरण विखारी करून टाकू शकतो, हे ध्यानात घ्यावेच लागेल.

दुर्दैवाने या दिशेने कुठलाच पक्ष- त्यात सत्ताधारीदेखील आलेच- प्रयत्न करताना दिसत नाही. कारण या धुळवडीत सगळेच सामील आहेत. प्रत्येक पक्षाचे प्रचाराची धुरा सांभाळणारे समाजमाध्यम विभाग आहेत, आणि असली उफराटी कामे करण्यात वाकबगार असलेले ‘तज्ज्ञ’ प्रत्येक पक्षाकडे आहेत. कुणीही धुतला तांदूळ नाही!

अशा परिस्थितीत ‘डीपफेक’ किंवा खोट्या प्रचाराला आळा बसणार कसा? तेलंगण, राजस्थान, मध्य प्रदेशासह पाच राज्यांच्या निवडणुकीचा धुरळा आत्ताच उडाला आहे. या राज्यांतील प्रचारातही ‘डीपफेक’चे अनेक मासले बघायला मिळाले. ‘

डीपफेक’ तंत्रज्ञानाशिवायही प्रचाराने अतिशय खालची पातळी गाठली. पुढले वर्ष तर सार्वत्रिक निवडणुकीच्या धामधुमीचे असेल. त्यावेळी प्रचार कुठल्या थराला जाईल याची कल्पनाच केलेली बरी. सध्याचे जग हे सत्यपश्चात (Post-truth) राजकारणाचे आहे, असे मानले जाते.

म्हणजेच या राजकीय रणधुमाळीत सत्य-असत्याशी मन ग्वाही करण्याचे काही कारण नाही. ‘आम्ही लटिके ना बोलू’ असे म्हणत ‘खोटे वर्तमान’ रेटत राहिले तरी कार्यभाग साधतो. ‘डीपफेक’ गैरप्रकार अशाच राजकारणाच्या गढूळ पाण्यात फसफसणार आणि फोफावणारही. ही बिघडलेली कृत्रिम बुद्धी आहे.

तिला मार्गावर आणण्यासाठी पुन्हा कृत्रिम बुद्धिमत्ताच कामाला लावावी लागणार. काट्याने काटा काढलेला बरा असतो! एकूणच या नव्या तंत्रज्ञानाच्या गैरवापरांना आळा घालण्यासाठी नियमनाच्या सक्षम यंत्रणा तयार करणे, हे पुढच्या काळातील मोठे आव्हान आहे.

‘सत्य’ बाहेर पडण्याची तयारी करेपर्यंत ‘असत्य’ जगाच्या अर्ध्या भागापर्यंत पोचलेले असते!

- विन्स्टन चर्चिल,ब्रिटनचे माजी पंतप्रधान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.