अनायासेन मरणम्...

वैद्यकीय क्षेत्रात निर्माण होणारे काही प्रश्न निव्वळ रोगमुक्ती किंवा रुग्णाचा जीव वाचवणे यांपुरते मर्यादित नसतात
Deepti Gangavane writes doctor health medical life and human life till death
Deepti Gangavane writes doctor health medical life and human life till deathistock
Updated on
Summary

वैद्यकीय क्षेत्रात निर्माण होणारे काही प्रश्न निव्वळ रोगमुक्ती किंवा रुग्णाचा जीव वाचवणे यांपुरते मर्यादित नसतात

वैद्यकीय क्षेत्रात निर्माण होणारे काही प्रश्न निव्वळ रोगमुक्ती किंवा रुग्णाचा जीव वाचवणे यांपुरते मर्यादित नसतात. ते आपल्या जीवन-मृत्यू या विषयीच्या आकलनाविषयीच मूलभूत शंका उत्पन्न करतात. सध्या गेल्या दोन शतकांच्या मानाने माणसाचे एकंदर आयुर्मान वाढलेले आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे हे शक्य आहे. आपण सर्वसाधारणपणे असे समजतो की जीवन चांगले, श्रेयस्कर असते आणि मरण वाईट व टाळण्याजोगे असते. म्हणूनच येऊ घातलेला मृत्यू टाळणे हे डॉक्टरांचे परम कर्तव्य असते असे डॉक्टर स्वतः आणि रुग्णही मानतात. पण या समजुतीबद्दल थोडा विचार करायला हवा. जीवन खरोखरच नेहमीच चांगले, वांछनीय असते का? शक्य असेल तर, शक्य असेल तेव्हा मरण टाळणेच इष्ट असते का? वैद्यकीय नीतिमीमांसेच्या चौकटीत विचार करायचा झाला तर आजारी पडून जे मरणाच्या दारात उभे असतात किंवा आजारपणामुळे ज्यांना जगणे असह्य होते, त्यांच्यासाठी जगण्या-मरण्याचा हाच अर्थ असतो का? असावा का? डॉक्टरांना रुग्णाला दयामरण किंवा इच्छामरण देण्याचा अधिकार असावा का? काही पाश्चात्य देशात काही पूर्व अटींचे पालन केले तर असा अधिकार दिला जातो. भारतातील कायदा असा अधिकार मानत नाही, पण या प्रश्नावर कित्येक वर्षे विचारमंथन चालू आहे.

इच्छामरण किंवा दयामरण हे शब्द आपण ‘Euthanasia’ या मूळ ग्रीक शब्दाचा प्रतिशब्द म्हणून वापरतो. याचा मूळ अर्थ आहे ‘चांगले मरण’ किंवा सहज येणारे मरण. आज त्याचा अर्थ प्रामुख्याने असहनीय वेदनांमधून सुटका देणारे मरण असा होतो. आपले हाल न होता शांतपणे मरण यावे अशी बहुतेकांची इच्छा असते. पण ‘इच्छामरण’ या संकल्पनेत नुसते ‘मरणे’ नाही तर ‘मारणे’ समाविष्ट असते, म्हणून त्याचा नैतिक अंगाने सखोल विचार करावा लागतो. इच्छामरण आत्महत्या किंवा खून यांपेक्षा वेगळे आहे. असाध्य आजार, प्राणांतिक वेदना यांमुळे रुग्ण स्वेच्छेने मरण पत्करायला तयार असतो. तसेच रुग्णाचा आजार असाध्य आहे हे एकापेक्षा अधिक डॉक्टरांना मान्य असावे लागते.

इच्छामरणाच्या बाजूने आणि विरुद्ध अनेक युक्तिवाद केले जातात. इच्छामरणाचे ‘सक्रिय’ आणि ‘निष्क्रिय’ असे दोन प्रकार करता येतात. असाध्य आजाराने ग्रस्त रुग्णाला प्राणघातक इंजेक्शन देऊन त्याला जीवन संपवायला प्रत्यक्ष मदत करणे हा पहिला प्रकार, तर अशा रुग्णावर केले जाणारे उपचार थांबवून त्याचे मरण जवळ आणणे हा दुसरा प्रकार. अनेकदा असे समजले जाते की जन्म आणि मरण या गोष्टी ईश्वराधीन आहेत, त्यात माणसाने ढवळाढवळ करू नये. पण जात्या जीवाला वाचवायची डॉक्टरांची धडपड हीसुद्धा ढवळाढवळच म्हणायला हवी. नास्तिकांना हा युक्तिवाद मान्य असण्याचे कारणच नाही. नैतिकदृष्ट्या या प्रश्नाकडे बघताना रुग्णाचे हक्क आणि त्याच्या कुटुंबियांचे हक्क यांचा प्रामुख्याने विचार करावा लागतो.

जगण्याचा हक्क प्रत्येकाला असतो, तसा मरणाचाही असावा का? जगणे गुणवत्तापूर्ण राहणार नसेल, त्यात आनंद नसेल आणि त्याचा कुणाला उपयोग नसेल, तर मरणाची इच्छा करणे खरंच गैर आहे का? त्याचप्रमाणे रुग्णाला मरणाचा हक्क देणे किंवा नाकारणे या दोन्हींचे कुणावर आणि काय परिणाम होऊ शकतात हे लक्षात घ्यावे लागते. रुग्णांचे वय, शारीरिक स्थिती, सांपत्तिक स्थिती, बरे होण्याची शक्यता असे घटक विचारात घ्यावे लागतात. बरे झाल्यानंतर रुग्णांचे आयुष्य पूर्ववत होणार आहे की उर्वरित काळ अंथरूणाला खिळून, परावलंबी राहावे लागणार आहे याचा विचार करावा लागतो.

एखाद्या वयस्क व्यक्तीच्या खर्चिक उपचारांसाठी तरुण पिढीच्या मूलभूत गरजांना मोठ्या प्रमाणात कात्री लावणे प्रत्येक वेळी योग्य असते का? अर्थात कुणाही व्यक्तीला तिच्या इच्छेविरूद्ध मरायला भाग पाडणे हे निश्चितच अनैतिक आहे. स्वेच्छेच्या नावाखाली अशा हत्या होण्याची शक्यता हा इच्छामरणाला कायदेशीर परवानगी मिळण्यातला मोठा अडथळा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.