माणूस रोगांमुळे मरतो. पण रोग कशामुळे होतात? ‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज २०१५’ या जागतिक अभ्यासाने रोगांच्या कारणांचा शोध घेतला आहे. सर्वांत महत्त्वाच्या दहा कारणांमध्ये तंबाखू व दारू ही दोन कारणे आहेत. या दोन पदार्थांचा वापर हा आता निरुपद्रवी विरंगुळा किंवा सवय उरलेला नाही. जगातील कोणत्याही विषापेक्षा होत नाहीत, एवढे जास्त मृत्यू; त्याचप्रमाणे हृदयरोग, पक्षाघात, रक्तदाब, कर्करोग व यासारखे २०० प्रकारचे रोग या दोन विषारी पदार्थांमुळे होतात. खरोखरच हे आजच्या जगातील मृत्युपथ झाले आहेत.
भारतात तंबाखूविरोधी केंद्रीय कायदा आहे. महाराष्ट्रात गुटखा, मावा, खर्रा, नस इत्यादी सुगंधित तंबाखूवर बंदी आहे. गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यांत दारूबंदी आहे आणि तरीही स्थिती काय आहे ? ‘सर्च’, गडचिरोली या संस्थेने गोंडवन विद्यापीठाच्या सहयोगाने मार्च २०१५ मध्ये केलेल्या जिल्हा सर्वेक्षणानुसार ११ लाख लोकसंख्येच्या गडचिरोली जिल्ह्यातील लोक वर्षाला ८० कोटी रुपयांची दारू सेवन करतात. मग ‘दारूबंदी’ अयशस्वी का? तर त्याच वेळी दारूबंदी नसताना शेजारच्या चंद्रपूर जिल्ह्यातील अर्धी म्हणजे ११ लाख लोकसंख्या एका वर्षात १३७ कोटी रुपयांची दारू पीत होती. म्हणजे गडचिरोलीतील दारूबंदीमुळे ५७ कोटींची दारू कमी झाली. याचा अर्थ ती अंशतः यशस्वी झाली. निष्कर्ष असा की दारूबंदी आवश्यकच असली तरी निव्वळ बंदी पुरेशी ठरत नाही. शिवाय तंबाखूचा प्रश्न आहेच.
महाराष्ट्रात बंदीच्याही पुढे जाऊन उत्तरोत्तर वाढणारी दारूमुक्ती व तंबाखूमुक्ती कशी व्हावी? खुर्ची चार पायांवर उभी असते. निव्वळ बंदीच्या एका पायावर दारू-तंबाखूमुक्ती कशी उभी राहणार? म्हणून एक नवा प्रयोग गडचिरोली जिल्ह्यात सुरू झाला आहे. त्याचे नाव ‘मुक्तिपथ’. तीन वर्षांत जिल्ह्यातील दारू व तंबाखू निम्म्याने कमी करणे या उद्देशाने चार कलमी कृती कार्यक्रम ‘मुक्तिपथ’मध्ये आखला आहे. १. व्यापक माहिती व जनजागृती २. गावा-गावांत सक्रिय लोकसहभाग ३. बंदीची प्रभावी अंमलबजावणी ४. व्यसनमुक्ती उपचार. दारू व तंबाखू दोघांपासून एकत्र मुक्तीचा असा जिल्हाव्यापी प्रयोग भारतात प्रथमच होतो आहे. महाराष्ट्रातल्या चार शक्ती यासाठी एकत्र आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारचा कार्यगट, गडचिरोली जिल्ह्यात आरोग्यसेवा व व्यसनमुक्तीचे कार्य करणारी ‘सर्च’ ही स्वयंसेवी संस्था, कर्करोगविरोधात पुढे असलेले ‘टाटा ट्रस्ट’ व गडचिरोली जिल्ह्यातील जनता अशा चार शक्तींनी संयुक्तपणे हा प्रकल्प सुरू केला आहे. याच्या योग्य अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापित व कार्यरत झाली आहे. प्रत्येक तालुक्यात तालुका समिती व गावोगावी ग्रामसमिती स्थापून याची व्यापक रचना उभी केली जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यात याबाबत उत्सुकता, अपेक्षा, सक्रिय उत्साह, उपेक्षा, उपहास व विरोध अशा सर्वच प्रकारच्या प्रतिक्रिया आहेत. जिल्ह्यातील ३०० गावांनी आपल्या संकल्पाने व प्रयत्नांनी गावाला दारूमुक्त केले आहे. खुर्सा, गरंजी, टेंभा अशा अनेक गावांनी तर दारू व तंबाखू दोन्हीपासून गाव मुक्त केले आहे. पोलिस व उत्पादनशुल्क विभाग काही प्रमाणात सक्रिय झाले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सर्व शासकीय विभाग यासाठी सक्रिय केले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात मकरंद अनासपुरेंच्या हस्ते पेटवलेली तंबाखूची होळी आणि सत्यपाल महाराज या लोकप्रिय कीर्तनकारांची कीर्तने यातून, तसेच मार्कंडा येथे भरणाऱ्या दहा लाख यात्रेकरूंच्या यात्रेला या वर्षी तंबाखूमुक्त करून जिल्हाभरातील लोकांना संदेश दिला आहे. ‘सर्च’च्या मदतीने पोलिस विभागाने ‘संकल्प’ व्यसनमुक्ती केंद्र सुरू केले आहे व त्यात व्यसनाधीन झालेले पोलिस उपचार घेत आहेत. गोंडवन विद्यापीठाच्या सहकार्याने ‘सर्च’ ने नवे जिल्हाव्यापी वार्षिक सर्वेक्षण पूर्ण केले आहे. सुरवात तर चांगली झाली आहे.
हा प्रयोग यशस्वी झाला तर रोग, मृत्यू, व्यसन व पैशाची उधळपट्टी या चार समस्या कमी व्हाव्यात. ‘मुक्तिपथ’द्वारे महाराष्ट्राच्या दारूमुक्ती व तंबाखूमुक्तीचा मार्ग सापडेल काय?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.