उंबरठ्यावर आलेलं तंत्रज्ञान

dr anil lachke
dr anil lachke
Updated on

विज्ञानाचे उद्दिष्ट माणसाचे जीवन सुखी आणि वैभवशाली करणे, असे असते. किंबहुना, तसे ते असायला हवे. शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांमुळे कोणती तांत्रिक उपकरणे आपल्या पुढ्यात येतील, कोणत्या नव्या सुविधा मिळतील, याची झलक दाखविणारा लेख.

नवीन वर्षांची प्रतीक्षा करताना मनात विचार येतो, की २०१८मध्ये सामान्य माणसाला विज्ञान-तंत्रज्ञानाने नवीन काय दिलं? अभिनव तंत्रज्ञानावर आधारलेली उपकरणे पेटंट घेतल्याशिवाय थेट बाजारात येत नाहीत. ती योग्य किमतीत ग्राहकाला मिळण्यासाठी प्रयत्न चालू असतात. प्रयोगशाळेतून आपल्याकडे येऊ शकणारे तंत्रज्ञान उंबरठ्यावरच रखडलेले असते; पण निदान काही कालावधीनंतर ते जनमानसात येऊन रुळतं. त्यादृष्टीने मावळत्या वर्षात काय काय घडले, याचा आढावा घेणे सयुक्तिक ठरेल.
एक नवीन तंत्रज्ञान काही वर्षांमध्ये शेतकरीबंधू वापरायला लागतील. हातभर लांबीचं एक उपकरण आहे. एखादी कांब जमिनीत रोवावी, तसं ते रोवायचं. त्याला वरच्या बाजूला एक संवेदक आहे. त्यावरील तबकडीवर जमिनीमध्ये किती ‘वाफसा’ (आर्द्रता) आहे, कोणतं खत कमी आहे, प्रकाशाची तीव्रता, तापमान किती आहे-अशी बरीच माहिती मिळते. गरज पडल्यास तो स्वयंचलित पद्धतीमार्फत ठिबक सिंचन करून अगदी मोजके पाणी पिकाला देतो. भावीकाळात अशी उपकरणे शेतकऱ्यांची जणू मित्रच ठरतील. ‘द्रोण’ हे पायलटविना कमी उंचीवरून पुनर्भारित करता येणाऱ्या बॅटरीवर भ्रमण करणारं वाहन आहे. द्रोणकडून पिकाची पाहणी करून शेतावर कीडनाशकाचा किंवा खतांचा फवारा विनासायास मारता येतो. शेतमजुराला त्याच्या वासाचा त्रास होण्याची शक्‍यता कमी असते. या वर्षी भारतातील अनेक शेतांमध्ये त्याची चाचणी घेतली गेली. ड्रोनची हाताळणी कौशल्याने करावी लागते. शेताची माहिती एका सॉफ्टवेअरमध्ये भरली की ते द्रोण कामगिरी आटोपून स्वतःहून अलगद लॅंड होईल.

आगामी काळातील मोटारी विद्युतघटावर (बॅटरी) चालतील. पण दरवेळी बॅटरी विद्युतभारित करण्याचा कंटाळा येऊ शकतो. यासाठी ‘स्टॅन्फोर्ड युनिव्हर्सिटी’तील तंत्रज्ञांनी क्वांटम फिजिक्‍सचे तत्त्व वापरून एक खास रस्ताच तयार केलाय. अशा ‘वायर्ड रोड’वरून मोटारीने प्रवास केला की मोटारीतील ७० सें.मी. उंचीवरील बॅटरी आपोआप विद्युत-भारित होईल. या यंत्रणेत रेडिओ-लहरी विशिष्ट वारंवारितेला (फ्रिक्वेन्सी) निर्यात केल्या जातील. यातून ऊर्जाभारित (एक्‍ससायटेड) झालेले इलेक्‍ट्रॉन्स एका नलिकेत निर्माण होतील. याला ‘रेझोनंट इंडक्‍टर’ म्हणतात. मोटारीतील ग्रहणयंत्रणा (‘रिसिव्हर रेक्‍टिफायर’) त्याचे विद्युतशक्तीत रूपांतर करून बॅटरी चार्ज करील.

सध्या बऱ्याच लोकांना पर्यटन किंवा कामानिमित्त बाहेरगावी जावं लागतं. तिथं पोचल्यानंतर लक्षात येतं, की मोबाईलचा चार्जर घरीच विसरलाय. तंत्रज्ञांनी आता मोबाईललाच पॉवर-प्लग फिक्‍स केलाय! काही मोबाईलला छोटीसी वायर आणि बिल्ट-इन प्लग असेल.
संतप्त जमावाला रोखण्यासाठी पोलिसांना बॅरिकेड किंवा ढालीसारखं आवरण वापरावं लागतं. ते जड आणि जाड असतंच, पण वापरायला सुलभ नसतं. आता बुलेट-प्रूफ आणि वॉटरप्रूफ; तरीही वजनानं हलक्‍या असणाऱ्या केव्हलर धाग्याचं मजबूत आवरण तयार झालंय. छत्रीसारखी त्याची सुटसुटीत घडी घालता येते. यामुळे पोलिसांना बंदोबस्ताची ड्यूटी सुलभतेने करता येईल.

आपण मोक्‍याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सोय झाली असल्याचं पाहतो. चोर, दरोडेखोर, गुन्हेगार दुष्कृत्ये करण्याआधी त्या गुप्त कॅमेऱ्यावर फडकं टाकतात, किंवा कॅमेऱ्याची दिशा बदलतात. हे लक्षात घेऊन वैज्ञानिकांनी भिंग-विरहित कॅमेरा तयार केला असून, तो कार्डबोर्ड कागदाएवढाच जाड असून, तो कॅमेऱ्याचं काम करतो आणि स्वतःच लेन्सचा ॲपर्चर बदलून फोकस लावू शकतो. तो गरजेनुसार ‘वाइड अँगल‘ बनू शकतो. लेन्स नसल्याने तो कागद कुठे फिक्‍स केलाय, ते कळत नाही. भावीकाळात एखाद्याच्या शर्टाचं कापड, पेन, आंगठी, घड्याळ, चष्मा आदीपैकी काहीही चीज कॅमेऱ्याची भूमिका पार पाडून चोरांना चकवू शकेल. तंत्रज्ञांनी दर्जेदार कागदी मायक्रोफोन आणि लाऊडस्पीकर देखील तयार केला आहे.

अवकाश तंत्रज्ञानामध्ये भारताच्या ‘इस्रो’ने १५ फेब्रुवारी २०१७ रोजी पीएसएलव्हीच्या एकाच उड्डाणात १०४ उपग्रह प्रक्षेपित करून जागतिक विक्रम केला होता. त्यातले १०१ परदेशी उपग्रह होते. ‘इस्रो’ने १२ जानेवारी २०१८ रोजी ३१ उपग्रह अचूकपणे अंतराळात सोडले. त्यातील २८ परदेशी उपग्रह होते. अशा रीतीने इस्रोने पीएसएलव्ही मार्फतचा १००वा भारतीय उपग्रह प्रक्षेपित करून विक्रम केलाय. पीएसएलव्हीच्या सर्व मोहिमा यशस्वी झाल्याने याला ‘मेडन सेंचुरी’ म्हटलं जातंय. जीसॅट-११ हा आतापर्यंतचा सर्वांत जड (५८५४ कि.ग्रॅ.) उपग्रह इस्रोने ३६ हजार कि.मी. उंचीवर पाठवला आहे. यासाठी युरोपियन स्पेस एजन्सीची मदत घेतलेली होती. यामुळे इंटरनेट स्पीड बराच वाढवता येईल. या वर्षी भारतीय संशोधकांनी एक तारांगण शोधून काढलेले असून त्याच्या एका भागात दोन कोटी अब्ज सूर्य आहेत. या भागाला ‘सरस्वती’ नाव दिलंय. फाल्कन-९ हेवी हे अवकाशयान जगातील सर्वांत शक्तिशाली असून ते सात फेब्रुवारी २०१८ रोजी ४० कोटी कि. मी. प्रवास करून मंगळाच्या जवळून जाणार होतं; पण त्याचा मार्ग चुकल्याने ते यान भरकटत गेलं. यानाचे खासगी प्रवर्तक एलॉन मस्क यांची टेस्ला मोटार फाल्कनवर होती. रॉकेटमध्ये उड्डाणाच्या वेळी जम्बो जेट विमानांच्या इंजिनांएवढी शक्ती निर्माण होते. फाल्कन- हेवीची दोन महागडी बूस्टर रॉकेट कार्य संपल्यावर समुद्रात विसर्जित होत नाहीत. ती पुन्हा अलगद पृथ्वीवर उतरवून पुन्हा वापरण्यासारखी करता येतात. चंद्रावर मानव पाठवायला याचा उपयोग होईल. आगामीकाळात निवडक लघुग्रहांवर उत्खनन करून तेथील मौल्यवान मूलद्रव्ये मिळवण्यासाठी आणि श्रीमंतांना अंतराळातील सहल करण्यासाठी याचा उपयोग होईल.

क्रिस्पर कॅस नावाचे एक तंत्र जनुक अभियांत्रिकी (जेनेटिक इंजिनिअरिंग) साठी सुलभ आणि अचूक असून ते कमी वेळात पार पाडता येते. यामुळे गर्भावस्थेत असतानाच त्या जिवाला जन्मजात होऊ शकणारी व्याधी कायमची दुरुस्त करता येते. या तंत्राचा उपयोग कृषिक्षेत्रात सुधारित वनस्पती घडविण्यासाठी होतो. या तंत्रामुळे भावीकाळात ‘डिझाइन्ड बेबी’ तयार करता येईल. जनमानसात यामुळे गैरसमजुती वाढल्या आहेत. यामुळे न्यूटन, रामानुजन, मदर तेरेसा, आइन्स्टाईन, सचिन तेंडुलकर, मधुबाला ‘क्‍लोन’ (प्रतिकृती) करून पुन्हा तयार करता येतील. काही जणांना वाटतं की दहशतवादी या तंत्राचा उपयोग करून हिटलर, लादेन किंवा कसाब तयार करतील. पण असं काही होणार नाही. याचं कारण ‘डिझायनर्स बेबी’साठी जगात परवानगी नाही. एखादा गर्भ खात्रीने व्याधीमुक्त होणार असेल, तर मुश्‍किलीने अनुमती मिळते. कारण यामध्ये ‘नीती, अनीती, धर्म-अधर्म‘ अशा अनेक गोष्टी आहेत.  उत्क्रांतीमध्ये जनुकांमधील प्रत्येक छोटा बदल-परिवर्तन होण्यासाठी काही लाख वर्षे खर्ची पडलेली असतात. हे संकेत-प्रतिबंध डावलून -‘मी जगातील पहिला डिझाइन्ड बेबी घडवणारा डॉक्‍टर आहे’- असं चीनच्या ‘हे यांकुई’ नामक एका चिनी संशोधकाने जाहीर केलंय. त्याने लुलू आणि न्याना या दोन गर्भातील मुलींना कायमचं ‘एचआयव्हीमुक्त‘ केलंय. तज्ज्ञ-जाणकारांनी याच्या चौकशीची मागणी केली आहे. विज्ञानाचे उद्दिष्ट माणसाचं जीवन सुखी आणि वैभवशाली करणे, असे असते. नवीन तंत्रज्ञान आपल्यापर्यंत येण्यापूर्वी तावून-सुलाखून घेतलं जातं आणि जायला हवंच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.