शं भर वर्षांपूर्वी माणसाचे सरासरी आयुर्मान जेमतेम ४७ वर्षांचे होते. आता जगातील अनेक देशांमध्ये लोक सत्तरी सहज गाठतात. पूर्वी कॉलरा, देवी, घटसर्प, धनुर्वात, प्लेग, विषमज्वर, क्षय, न्यूमोनिया अशा अनेक संसर्गजन्य रोगांमुळे मोठ्या प्रमाणात प्राणहानी व्हायची. संसर्गजन्य रोगांवर सुदैवाने रामबाण औषध मिळालं. सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांना नव्वद वर्षांपूर्वी पेनिसिलियम नोट्याटम् या बुरशीमध्ये प्रभावी जीवाणूनाशक रसायन सापडलं. नंतर ते पे. क्रायसोजेनम् बुरशीत जास्त प्रमाणात आढळलं. त्याला पेनिसिलीन अँटिबायोटिक्स (प्रतिजैविक) या नावाने ओळखलं जाऊ लागलं.
अर्न्स्ट चेन आणि हॉवर्ड फ्लोरी यांनी त्या रसायनाचं संशोधन केलं. सुरवातीला पेनिसिलिनचं उत्पादन कमी प्रमाणात होतं. त्यासाठी बुरशीचं विविध पद्धतीने म्युटेशन (उत्परिवर्तन) करण्याचे प्रयोग यशस्वी झाले. उत्परिवर्तित (बदललेल्या) बुरशीमार्फत अनुकूल द्रवरूप माध्यमात वाढवून पेनिसिलिनचं उत्पादन हजारो पटींनी वाढवण्यात यश आलं. द्रवरूप माध्यमात फेनोक्सि ॲसिटिक आम्ल आणि कॉर्न स्टीप लीकरचा समावेश केल्यामुळे पेनिसिलिनची निर्मिती वाढली. या संशोधनाबद्दल फ्लेमिंग, चेन आणि फ्लोरी यांना १९४५ मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला.
पेनिसिलिनचा (सुरवातीला बाहेरून) उपयोग सुरू झाला आणि युद्धातील सैनिकांच्या जखमा लवकर भरल्या गेल्या. संसर्गजन्य रोगामुळे होणारी प्राणहानी कमी झाली. पेनिसिलिनमुळे (अपायकारक) जीवाणूपेशींचं आवरण तयार होताना अडथळा होतो. त्यांची संख्या रोडावते. या क्रियेत उपयुक्त पेशीदेखील बळी पडत असल्या, तरीही वैद्यकशास्त्राला एक उत्तम उपचारपद्धती मिळाली होती. प्रो. सेलमन वॉक्समन यांनी रटजर्स युनिव्हर्सिटी (न्यू जर्सी) मध्ये स्ट्रेप्टोमायसेस ग्रिसिअसपासून स्ट्रेप्टोमायसिन हे प्रतिजैविक शोधलं. यामुळे क्षयरोगावरील प्रभावी प्रतिजैविकांचा शोध लागला. जगातील एक टक्का लोकांना अँटिबायोटिक्सची अॅलर्जी असते; पण इतर रुग्णांना रोगमुक्तीसाठी त्याचा उपयोग होत आहे.
प्रतिजैविकं काही रोगांवर रामबाण ठरल्याने त्यांचा सतत वापर करण्यात आला. व्याधिग्रस्त व्यक्ती डॉक्टरांकडे येऊन सरळ ‘अँटिबायोटिक्स लिहून द्या’ म्हणून विनंती करू लागली. सर्दी, फ्लू यांचा संसर्ग ‘व्हायरल’ असतो. त्या रुग्णांनाही अँटिबायोटिक्स घ्यावंसं वाटू लागलं! खरंतर कोणत्या सूक्ष्मजीवांचा प्रादुर्भाव झालाय त्याची चिकित्सा होऊन विशिष्ट प्रतिजैविकांचा उपयोग केला गेला पाहिजे; पण त्याचा जास्त (गैर) वापर झाला. अनेक रुग्ण थोडंसं बरं वाटू लागलं की अँटिबायोटिक्सचा ‘कोर्स’ संपूर्ण सलगपणे न करता मध्येच सोडून देऊ लागले. परिणामी संसर्गजन्य जीवाणूंचा निःपात होत नाही. उलट प्रतिजैविकांपासून आपला बचाव करण्याची त्यांची क्षमता वाढली. काही लोक (डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय) शिल्लक राहिलेल्या आणि त्यावरील तारीख उलटून गेलेल्या अँटिबायोटिक्सच्या गोळ्यांचा उपयोग करू लागले! गोळ्या वाया जाऊ नयेत म्हणून दुसऱ्या व्यक्तीला देऊ लागले. परिणामी अपायकारक जीवाणूंवर हल्ला करण्याची अँटिबायोटिक्सची ‘प्रतिकार’क्षमता काही काळानंतर निष्प्रभ पडू लागली. उलट संसर्गजन्य जंतूंमध्ये अनुकूल बदल झाले.
अँटिबायोटिक्सच्या हल्ल्याला परतावून लावण्याची ताकद संसर्गजन्य जीवाणूंनी प्राप्त केली. याला ‘अँटिबायोटिक्स रेझिस्टंट’ म्हणतात. अँटिबायोटिक्सच्या माऱ्याला पुरून उरलेले जीवाणू अधिक सक्षम बनून बाहेर पडू लागले, त्यामुळे झालेली संसर्गजन्य रोगाची बाधा प्रबळ होते. यामुळे ६० टक्के अपायकारक जीवाणू कोणत्याच अँटिबायोटिक्सला दाद देईनात. स्ट्रेप्टोकॉकस् न्यूमोनिया, स्टेफायलोकॉकस् ऑरिअस, एंटेरोकोकाय आदी जीवाणू ज्या प्रतिजैविकामुळे बळी पडायचे, ते अबाधित राहू लागले. अपायकारक जीवाणूंना निष्प्रभ करण्याची प्रतिजैविकांची ‘प्रतिकारशक्ती’ क्षीण झाली. डॉक्टरांना नाइलाजाने औषधांची मात्रा वाढवावी लागली. औषधोपचाराचा खर्च वाढला. साइड इफेक्ट वाढले. पेनिसिलिन, मेथिसिलिन, व्हॅन्कोमायसिन यांसारखी हमखास गुणकारी असणारी प्रतिजैविकं काही वेळा जीवाणूंपुढे निष्प्रभ ठरत गेली. नवीन अधिक गुणकारी प्रतिजैविकांचा शोध घेण्यासाठी करावं लागणारं संशोधन विकसित देशांमध्ये जास्त प्रमाणात होतं. आता तिथं यासाठी पुरेसा निधी मिळत नाही. संसर्गजन्य रोगांचं प्रमाण विकसनशील देशांमध्ये जास्त आहे. असं असलं तरी ‘अँटिबायोटिक्स रेझिस्टंट’ची झळ आणि होणारी प्राणहानी यामुळे जगभर बरीच मोठी प्राणहानी झाली आहे.
यासाठी संशोधन करून जास्त क्षमतेच्या अँटिबायोटिक्सचा शोध घेता येईल. एखाद्या व्याधीवर अँटिबायोटिक्स व्यतिरिक्त अन्य गुणकारी औषधं आहेत. त्यांचा उपचारासाठी उपयोग करायचा. आता आपल्या देशातील विविध रुग्णालयांतून उपयुक्त आणि विस्तृत माहितीचं संकलन करण्यात आलं आहे. त्या आधारे भारतातील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि इंडियन क्रिटिकल केअर मेडिसिन सोसायटीने ‘अँटिबायोटिक्स गाइडलाइन’ तयार केली आहे. त्यांनी कोणत्या अँटिबायोटिक्सचा केव्हा, किती आणि कसा उपयोग करायचा, यासंबंधीची नियमावली तयार केली आहे. ही अतिदक्षता विभागासाठी आहे. या आधी राष्ट्रीय पातळीवर सर्व प्रकारच्या प्रतिजैविकांच्या वापरासंबंधीची गाइडलाइन तयार करण्यात आली होती. यामुळे प्रतिजैवकांचा बेसुमार (आणि गैर) वापर होणार नाही आणि ‘अँटिबायोटिक्स रेझिस्टंट’च्या समस्येची तीव्रता वाढणार नाही, अशी अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.