क्रिप्टोकरन्सी ‘फक्त’ ऑनलाइन उपलब्ध असणार. हे एक डिजिटल चलन असून वस्तू किंवा सेवांच्या खरेदीसाठी वापरले जाते.
आभासी चलन सुरुवातीपासूनच जोखीमयुक्त होते. तरीदेखील त्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली हे सर्वांना ज्ञात आहे. तथापि, त्याची वाताहत होत असताना गुंतवणूकदारांनी त्यापासून धडा घेणे अत्यंत आवश्यक आहे.
क्रिप्टोकरन्सी ‘फक्त’ ऑनलाइन उपलब्ध असणार. हे एक डिजिटल चलन असून वस्तू किंवा सेवांच्या खरेदीसाठी वापरले जाते. या चलनात ‘क्रिप्टोग्राफी’ म्हणजे सांकेतिक भाषा वापरली जाते. जरी ही पैशाच्या रूपातील पैशासारखी वाटणारी मालमत्ता असली तरी सदर मालमत्ता ठेवण्यासाठी बँक, एटीएम व्यवस्थेची आवश्यकता नसते. क्रिप्टोकरन्सी म्हणजे आभासी चलन. चलनी नोटांना पर्याय असणार ‘डिजिटल’ चलन. प्रत्येक देशाचं स्वतःचं असं एक चलन असतं. तसंच ‘क्रिप्टोकरन्सी’ हे आभासी चलन आहे. ते कागदी किंवा धातू स्वरूपात नसतं. तरीही त्याला मूल्य असतं हीच याची विशेषता. कोणत्याही देशाचं सरकार वा बँक हे चलन ‘छापत’ नाही. मायनिंगद्वारे या करन्सीची निर्मिती होते आणि ब्लॉकचेनच्यामार्फत याचे व्यवहार होतात. आज जगभरात बिटकॉईन, लाईटकॉईन, रिपल, इथेरियम आणि झेड कॅश नावाच्या काही प्रसिध्द क्रिप्टोकरन्सीज चलनात आहेत.
२००९ मध्ये जपानमध्ये सातोशी नाकामोतो नावाच्या एका अभियंत्याने ‘बिटकॉइन’ची संकल्पना जन्माला घातली. एका संगणकीय प्रोग्रॅममधील गणितीय आकडेमोड करून ‘बिटकॉइन’ अस्तित्वास आले. त्यानंतर गेल्या दशकभरात शेकडो प्रकारच्या ‘क्रिप्टोकरन्सी’ संगणकीय जगात निर्माण झाल्या. अशा प्रकारच्या आभासी चलनाद्वारे केलेले आर्थिक व्यवहार अतिशय गोपनीय व कोणत्या बँकेशी संलग्न असत नाहीत. विकेंद्रित व्यवस्था असल्याने कोणा एका कंपनीची वा देशाची मक्तेदारीही नसते. कोणत्याही देशाच्या सीमेचे बंधन नसल्याने आणि कोणत्याही स्वरूपाचा कर त्यांना लागू होत नसल्याने गेल्या दशकभरात आभासी चलनाचा वापर जगभर खूप वाढला. गेल्या दशकभरात या आभासी चलनांची उलाढाल अब्जावधी डॉलरच्या घरात पोहोचली. अनेक देशांतील बँका, हॉटेल, कंपन्या, संकेतस्थळे यांनी आभासी चलनाचा स्वीकार केला. त्यामुळे या चलनाचे मूल्यही दिवसेंदिवस वाढले. यातूनच या आभासी चलनांचे विनिमय बाजार एफटीएक्स उभे राहिले. या बाजारांत जगभरातील आभासी चलनांचे भौतिक चलनांच्या तुलनेतील मूल्य दररोज ठरते. ‘बिटकॉइन’ या आभासी चलनाच्या मूल्याने तर आकाशाला गवसणी घातली आहे. आजचे म्हणजे १७ नोव्हेबर २२ रोजी एका बिटकॉइनचे मूल्य जवळपास १६६१२ डॉलरइतके (भारतीय रु. १३,५०,५५२), आहे जे एकेकाळी ७०००० डॉलर्सपर्यंत पोहोचले होते. आभासी चलनाला अनेक देशांत मान्यता मिळालेली नसताना, कायद्याच्या चौकटीत बसत नसताना या आभासी चलनाचं साम्राज्य वाढतं व त्याची उलाढाल अब्जावधी डॉलरच्या घरात गेली यातच या चलनाचे महत्त्व अधोरेखित होते.
तथापि अघटित घडले. वॉरन बफेनी पूर्वी भविष्यवाणी केली होती तसेच झाले. जागतिक शेअर बाजाराची पडझड व युक्रेन रशियाचे युद्ध यांनी जगभरातील महागाईचा उच्चांक गाठला. त्यामुळे प्रत्येक सरकारला व्याज दर वाढवावे लागल्याने कर्जे महाग झाली. जागतिक मंदीमुळे वाढलेल्या बेरोजगारीमुळे उत्पन्न घटले तर जीवनावश्यक पैसे मिळविण्यासाठी धडपड वाढली. उच्च चलनवाढ आणि जगण्याच्या खर्चाच्या संकटामुळे क्रिप्टोकरन्सी विकून त्यांच्या बिटकॉइन मधील गुंतवणूकीची जोखीम ग्राहकांनी कमी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे झालेल्या विक्रीमुळे दर खूप कमी होऊ लागल्याने त्याचा क्रिप्टोवर दबाव आला. त्यातच ‘सेल्सियश नेटवर्क’, नावाच्या क्रिप्टोकरन्सीवर कर्ज देणाऱ्या एका प्रमुख अमेरिकन कंपनीने,;''अत्यंत’ गंभीर परिस्थितीचा हवाला देत क्रिप्टोतील ‘पैसे काढणे’ आणि ‘हस्तांतरणे’ गोठवली. चीनमधील बँका आणि पेमेंट संस्थांना क्रिप्टो व्यवहार सक्षम करणे थांबवण्यास सांगण्यात आले आणि, बिटकॉइनच्या आवडींवर बंदी घालण्यात आली. तसेच, ‘बायनांस’ या जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजेसपैकी एका संस्थेने ‘अडकलेल्या व्यवहाराला’ दोष देऊन बिटकॉइन पैसे काढण्यास नकार दिल्याने अनुशेष निर्माण झाला. रशिया क्रिप्टोकरन्सी ऑपरेशन्सवर बंदी घालू शकतो असा अहवाल आला. या व इतर कारणामुळे जगभरातील क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये उलथापालथ होऊन कोट्यवधी डॉलर्सचा चुराडा झाला.
क्रिप्टोकरन्सीचे ‘एकूण’ बाजार मूल्य २०२१ मध्ये तीन ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स होते ते एक ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सच्या खाली आले. अशावेळी क्रिप्टो एक्सचेंज दिवाळखोरीत जाईल असे वाटत असतानाच गेल्या सप्ताहात बहामा येथे मध्यावर्ती कार्यालय असणाऱ्या ‘एफटीएक्स’ नावाचा परंतु आभासी चलनाचा म्हणजे क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार करणारा बाजार एका रात्रीत उद्ध्वस्त झाला. एका दिवसाला एक अब्ज डॉलरचा व्यवहार करणाऱ्या ‘एफटीएक्स’ने दिवाळे जाहीर केले. यामुळे कोट्यवधी गुंतवणूकदारांच्या आभासी चलनातील गुंतवणुकीची अक्षरशः माती झाली. क्रिप्टो क्षेत्रातील गुंतवणूकदारांचा विश्वास उडाला असल्याने बिटकॉइनचा फुगा फुटला. आत्मविश्वास कमी झाल्यामुळे किमती कोसळल्या. जगभर खळबळ माजली. एफटीएक्स साम्राज्याच्या पतनाने, ज्याचा इतिहासातील सर्वात मोठ्या संपत्तीच्या विनाशांपैकी एक असा उल्लेख करता येईल त्याने सह-संस्थापक सॅम बँकमन-फ्राइडची संपूर्ण १६ अब्ज डॉलरची संपत्ती नष्ट केली. मुख्य प्रवाहात विश्वासार्हता मिळविण्यासाठी धडपडत असलेल्या व आधीच अडचणीत असलेल्या उद्योगाचा आत्मविश्वास त्यामुळे पूर्णतः डळमळीत झाला. बिटकॉइन आणि इथर या आघाडीच्या क्रिप्टोकरन्सीच्या किमती जबरदस्त घसरल्या. या घटनेनंतर आभासी चलनाच्या मृगजळामागे धावणारा जगभरातील गुंतवणूकदार ‘हेचि फल मम काय तपाला’ म्हणत घबराटीमुळे ‘मिळेल ती लंगोटी’ या तत्त्वावर आभासी चलनाची विक्री केली त्यातच विनाश जवळ आला. अशारीतीने तेरा वर्षानंतर क्रिप्टोचा बुडबुडा फुटला.
भारतातील परिस्थिती
भारतात, रिझर्व्ह बँक पहिल्या दिवसापासून आभासी चलनाला ठामपणे विरोध करत आहे, तर सरकार आभासी चलनांबाबत जागतिक सहमती आवश्यक आहे असे मत मांडत आहे. क्रिप्टो सीमारहित आहे, तर त्यात गुंतलेली जोखीम खूप जास्त आहे. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, क्रिप्टोकरन्सी विशेषतः नियमन केलेल्या आर्थिक गोष्टींना बायपास करण्यासाठी विकसित केल्या गेल्या आहेत. सरकार आणि आरबीआयच्या सावध दृष्टिकोनामुळे भारत जगातील इतर देशांच्या तुलनेने सुरक्षित राहण्यात यशस्वी झाला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ‘क्रिप्टोकरन्सी’ ओळखण्यास आणि त्यांच्यामध्ये व्यापार करण्यास नकार देऊन व्यवहारांच्या विरोधात वारंवार चेतावणी दिली असतानाही एका अंदाजानुसार क्रिप्टो मालमत्तेमध्ये भारतीय गुंतवणूकदारांचे दायित्व केवळ तीन टक्के आहे.
जागतिक मंदी असूनही, भारत-केंद्रित क्रिप्टोकरन्सी कंपन्या अद्याप धोक्याचा सायरन वाजवत नाहीत, हे अनाकलनीय आहे. भारतातील सर्वात मोठे क्रिप्टो एक्स्चेंज ‘वझीरएक्स’ आणि ‘झेबपे’ चे कार्य आजही सुरू आहे. तथापि, क्रिप्टोपासून मिळणारे उत्पन्न आता ३०% दराने करपात्र केल्याने तसेच रु. दहा हजारावरील मिळणाऱ्या उत्पन्नावर टीडीएस लागू केल्याने करदात्यांचा ओढा या क्रिप्टोक्षेत्राकडे कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. भारतीय गुंतवणूकदारांचे हित संरक्षित केल्याबद्दल केंद्र सरकार व रिझर्व्ह बँकेचे आभारच मानायला हवेत. आभासी चलन सुरुवातीपासूनच जोखीमयुक्त होते. तरीदेखील त्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली हे सर्वाना ज्ञात आहे. तथापि, त्याची वाताहात देखील काही गुंतवणूकदाराना समज देत नाही हे अनाकलनीय आहे कारण काही महाभाग गुंतवणूकदार आजही या आर्थिक संकटात संधी शोधत असून गुंतवणूक वाढवीत आहेत.
(लेखक चार्टर्ड अकाउंटंट आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.