आत्महत्या करणे किंवा तसा प्रयत्न करणे हे मानसिक आरोग्याशी संबंधित विषय आहेत. आत्महत्या टाळण्यासाठी अनेक प्रभावी पद्धती आपल्याकडे उपलब्ध आहेत.
आत्महत्या करणे किंवा तसा प्रयत्न करणे हे मानसिक आरोग्याशी संबंधित विषय आहेत. आत्महत्या टाळण्यासाठी अनेक प्रभावी पद्धती आपल्याकडे उपलब्ध आहेत. मात्र त्यांचा वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी याविषयी जनजागृती व्हायला हवी. जगभर दहा सप्टेंबरला ‘आत्महत्या प्रतिबंधक दिन’ पाळला जातो. त्यानिमित्त.
समाजातील आत्महत्या वाढत असल्याचे जी सार्वत्रिक भावना आहे, त्याला पुष्टी देणारा राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. ह्या अहवालानुसार सरत्या वर्षात भारतात एक लाख ६४ हजार आत्महत्या झाल्या आहेत. त्याच्या मागील वर्षाच्या तुलनेत भारतातील आत्महत्यांच्या संख्येत सात टक्क्याने वाढ झाली आहे. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींची संख्या लक्षात घेता त्यापेक्षा १०पट अधिक व्यक्तींनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला असतो. आणि त्याच्या साधारण शंभरपट लोकांच्या मनात आत्महत्येचे विचार येऊन गेलेले असतात. हे प्रमाण लक्षात घेता आत्महत्या हा एक गंभीर सामाजिक प्रश्न आहे, हे स्पष्ट होते. जगात होणाऱ्या आत्महत्यांपैकी एक तृतीयांश आत्महत्या भारतात होतात, हे लक्षात घेतले तर याचे गांभीर्य आणखी वाढते. कुठल्याही दहशतवादी अथवा सीमेवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये होणाऱ्या मृत्यूंच्या तुलनेत स्वत:च्या हाताने स्वत:चे आयुष्य संपवून घेणाऱ्या आपल्या समाजातील लोकांची संख्या कितीतरी प्रमाणात जास्त आहे. समाज म्हणून आपण अजूनदेखील या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहात नाही, हे खेदाने नमूद करायला हवे.
आत्महत्या करणे हा गुन्हा मनाला जाणारा कायदा रद्द होऊन चार वर्षे झाली तरी अजूनदेखील आपल्या देशात आत्महत्या नोंद करण्याची यंत्रणा ही राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागातच होते. आत्महत्या करणे किंवा तसा प्रयत्न करणे हे मानसिक आरोग्याशी संबंधित विषय असून देखील सरकारच्या आरोग्यविषयक आकडेवारीमध्ये जसे मातामृत्यू -बालमृत्यू मोजले जातात त्यासारखी आपली देशात होणाऱ्या आत्महत्यांची साधी नोंददेखील आरोग्य विभागात ठेवली जात नाही. आत्महत्यांची नीट नोंद ठेवली जात नसल्याने प्रत्यक्षात आपल्या देशात घडणाऱ्या आत्महत्या या नोंद झालेल्या आकडेवारीपेक्षा साधारण ५० हजाराने जास्त असतील, असे ‘लॅन्सेट’ या जगप्रसिद्ध शास्त्रीय नियतकालिकात प्रसिद्ध अहवाल सांगतो. आरोग्य विभागाच्याकडे खात्रीशीर नोंदच नसल्याने पुढे आत्महत्याप्रतिबंधक कार्यक्रम राबवणे आणि त्याच्या आढावा घेवून त्यामध्ये सुधारणा करणे ह्यामधील कोणतीही गोष्ट घडत नाही.
आत्महत्या टाळण्यासाठी अनेक प्रभावी पद्धती आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यांचा आपण वापर करणे आवश्यक आहे. आत्महत्या प्रतिबंध हेल्पलाईन हे त्यातील एक महत्त्वाचे माध्यम आहे. सरकारच्या वतीनेही अशी हेल्पलाईन चालवली जाते. ‘आय call’,‘कनेक्टिंग’, ‘परिवर्तन’ अशा स्वयंसेवी संस्थांच्या हेल्पलाईनदेखील आहेत. समाजात त्यांच्याविषयी पुरेशी माहिती नाही. समाजातील प्रत्येक माणसाला जसा १००हा पोलीस ठाण्याचा क्रमांक माहीत असणे आवश्यक आहे, तसे त्यांच्या फोनबुकमध्ये एका आत्महत्या प्रतिबंध हेल्पलाईनचा नंबर असणे ही अत्यावश्यक गोष्ट आहे.
भावनिक प्रथमोपचार
आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या आधीच्या आठवड्यात असा प्रयत्न करणाऱ्या बहुतांश व्यक्ती या जवळच्या कोणाशी तरी या विषयी बोललेल्या असतात. अशा वेळी योग्य हस्तक्षेप झाला तर त्यामधून पुढील आत्महत्या टाळता येवू शकते. ह्या व्यक्तींना ‘गेट कीपर’ म्हणतात. गेटकीपर म्हणजे आत्महत्येचे विचार आलेल्या व्यक्तीला भावनिक प्रथमोपचार देवून योग्य तज्ज्ञाच्या कडे पाठवणारी व्यक्ती! केवळ दोन तासाच्या प्रशिक्षणाच्यामध्ये हे कौशल्य ऑनलाईन पद्धतीने देखील घेता येवू शकते. या प्रशिक्षणामध्ये आत्महत्येच्या विषयी असलेले अनेक गैरसमज दूर करण्यावर भर असतो.आत्महत्या करणारी व्यक्ती नाटक करत आहे, असा समज आपल्याकडे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. या गैरसमजातून त्या व्यक्तीच्या भावनिक अस्वस्थतेकडे दुर्लक्ष होते. प्रत्यक्ष जेव्हा त्या व्यक्तीला आधाराची गरज असते तेव्हा मदत मिळत नाही. या स्वरूपाचे गैरसमज जर दूर झाले तरी अनेक जीव वाचू शकतात.
शेतकरी आत्महत्या किंवा गेल्या काही वर्षात वाढलेल्या हातावर पोट असलेल्या वर्गातील आत्महत्या ह्यांचा संबंध हा व्यापक आर्थिक-सामाजिक समस्यांशी आहे. त्या प्रश्नांची सोडवणूक ही महत्वाची गोष्ट असली तरी प्रत्येक आत्महत्या करण्याचा निर्णय ही शेवटच्या टप्प्यावर एक मानसिक कृती असते. व्यापक सामाजिक अडचणी सोडवणे हा लांबचा रस्ता आहे. ते पूर्ण होईपर्यंत समोरच्या व्यक्तीची त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता वाढवणे आणि त्याला आधार देणे हे मानसमित्र/मैत्रिणी नक्की करू शकतात. असंघटित कामगार आणि शेतीच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यानादेखील असे प्रशिक्षण आवश्यक आहे. या लोकांच्या सोबतच शिक्षक, पोलीस ग्रामसेवक,आशा,अंगणवाडी सेविका, जागरूक नागरिक अशा लोकांनी समोरच्या व्यक्तीला भावनिक आधार देणे आणि योग्य तज्ज्ञाच्यापर्यंत पोचवणे हे कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून आत्मसात केले तर त्यामधून आपण अनेक जीव वाचवू शकतो.
जवळच्या व्यक्तीची आत्महत्या हा मनावर खोलवर चरा उमटवणारी घटना असते. जरी ती व्यक्ती लहान मूल किंवा युवा असेल तर त्या अस्वस्थतेचा दाह अनेक पटींनी वाढतो. अशावेळी ज्या कुटुंबातील व्यक्तीच्या मनावर दीर्घकाळ त्याचा परिणाम राहतो. समाजात ह्या विषयी मोकळेपणाने बोलले जात नसल्याने मनातल्या मनात घुसमट होत राहते. आत्महत्या करण्याच्या कारणांत एक भाग आनुवांशिक असल्याने त्या कुटुंबातील व्यक्ती आत्महत्या करण्याचा धोकादेखील जास्त असतो. ज्याच्या कुटुंबात आत्महत्या झाली आहे, त्या कुटुंबाला भावनिक आधार देणारी यंत्रणा विकसित करणे आवश्यक आहे. हे केवळ मानसोपचार तज्ज्ञावर सोडता येऊ शकत नाही. आपल्यातील प्रत्येकाला हे कौशल्य शिकणे आवश्यक आहे. प्रशिक्षित मानसमैत्र/मैत्रिणी ह्या स्वरूपाचे आधार नक्कीच देऊ शकतात.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि परिवर्तन संस्थेच्या पुढाकाराने अशा स्वरूपाचे ‘मानसमैत्री’ हे मोफत प्रशिक्षण दिले जाते. सरकारनेदेखील मोठ्या प्रमाणात असे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. तरुण मुले आणि विद्यार्थी यांच्या आत्महत्यांच्यामध्ये आपल्या देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. हे आपल्या राज्याला कमीपणा आणणारे आहे. हे चित्र बदलावे म्हणून संघटित आणि ठोस प्रयत्न आवश्यक आहेत. त्यासाठी अनेक छोटी पाऊले आपण उचलू शकतो.
अशीच एक छोटी व महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्महत्येविषयी वृत्तपत्रांत येणाऱ्या बातमीखाली आत्महत्या प्रतिबंधक हेल्पलाईनचा नंबर छापणे होय. ही ‘जागतिक आरोग्य संघटने’ने सुचवलेली एक प्रभावी पद्धत आहे. समाजातील वाढती मानसिक अस्वस्थता बघता हे आव्हान येत्या कालखंडात आणखी गंभीर होणार आहे. सरकार आणि समाज यांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच आपण हे आव्हान पेलू शकू असे वाटते. आत्महत्या प्रतिबंधक ‘मानसमैत्री’चे प्रशिक्षण घेवून त्यासाठी आपण स्वत:पासून सुरुवात केली पाहिजे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.