भाषा अथवा साहित्याभ्यास ही प्रक्रिया अव्याहत अशी तर आहेच, शिवाय ती आनंद आणि आकलन वर्धित ठेवणारीही प्रक्रिया आहे. "एका वाक्यात उत्तरे द्या'' किंवा बहुपर्याय देत एका पर्यायावर "बरोबर''ची खूण करणे या पद्धतीचा भाषांचा- साहित्याचा अभ्यास स्पर्धा परीक्षा अथवा यासम असणाऱ्या नाना प्रवेशपरीक्षांच्या अर्हता प्राप्त करण्याच्या दृष्टीने यथार्थही असेल, नाही असे नाही. परंतु स्नातक व स्नातकोत्तर परीक्षांसाठी मराठीसारखा विषय निवडताना शब्दांत, वाक्यात "मराठी'' समजून घेणे नक्कीच अनाठायी आहे. हल्ली विविध ठिकाणी मराठीचा साहित्याभ्यास, भाषाभ्यास अशा संकोचीकरणाचा शिकार होताना आढळतो. त्याबद्दल भाषाशिक्षकांची हळहळ समजून घेण्यासारखी स्वाभाविकच आहे. शिवाय, विद्यार्थ्यांचीही आनंद, आकलनाची विहीर या प्रकारच्या भाषा संकोचीकरणामुळे कोरडी राहणार आहे. याचे शैक्षणिकच नव्हे तर सामाजिक दुष्परिणामही असतात, हे व्यापक चौकटीत विचार केला तर समजू शकते.
परीक्षांचे तसेच पाठ्यक्रमांचे प्रारूप निदान विद्यापीठ स्तरावर तरी तोट्याचे आणि साहित्यातला जीव गमावून टाकणारेच आहे. उदाहरणार्थ, एखादा कवितासंग्रह शिकणे- शिकवणे फार आनंदाचे पर्व असते. कवीची ओळख, त्याचा समकाल, प्रवाह, जीवनानुभव, काव्यानुभव हे समजून घेत पुस्तकांकडे जाणे समुचित असते. याशिवाय कवितेची प्रकृती, काव्याशय, शैली, भाषा, त्यातील छंद-अलंकार विचार आणि कवितेचा समग्र अभ्यास- प्रभाव, एकंदर सामर्थ्य-मर्यादा या सर्व बाजूंनी कवी व कवितासंग्रह समजून घेणे आनंदाचेही आणि आकलनदृष्ट्याही अधिक समर्पक असते. मग हाच नियम कमीअधिक भेदाने अन्य साहित्य प्रकारांना संलग्न करता येईल. ही इतकी सुंदर प्रक्रिया हळूहळू, विद्यापीठ भाषाभ्यासातून मालवत जाण्याची भीती विद्याथी- शिक्षक नोंदवताना दिसतात.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
संकोचीकरणाचा तोटा
भाषाभ्यास- साहित्याभ्यास यांतील संकोचीकरणाचा हा तोटा ऐरणीवर यायला हवा. कारण सुट्या सुट्या विधानांचे प्रश्न देऊन हा अभ्यास करता येत नाही, आणि जर केला तर "तशा'' बीए, एमए होऊन "मराठी'' होण्याला मुळात फारसा अर्थ नाही. मधल्यामधल्या व जवळच्या वाटा या रीतीने निर्माण करून साहित्यगंगा आपण कोरडीठाक ठेवतो आहोत, याचा विचार विद्यापीठ अधिकारमंडळांनी विशेष करून अभ्यासमंडळांनी करायला हवा. "नारायण सुर्वे यांच्या पहिल्या कवितासंग्रहाचे नाव सांगा'', "ग्रेस यांचे पूर्ण नाव काय'' किंवा "कोसला ही कादंबरी कुणी लिहिली'' अथवा "ना. धों. महानोरांच्या कोणत्या कवितासंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला'' या स्वरूपाचे प्रश्न मराठीचा अभ्यास करू पाहणाऱ्या बीए- एमएच्या अभ्यासापुरते वा परीक्षांपुरते असायला नकोत. उलट, शंभर गुणांसाठी अशा साहित्यिकांचा किंवा अशाच निवडक चार-सहा पुस्तकांचा नीटपणाने आणि सौंदर्यदृष्टी तसेच वाङ्मयीन जाणिवांसह विस्तृत अभ्यास व्हायला हवा. समजून घेत, आनंदात व्हायला हवा. पूर्वी हे सारे या प्रकारे चालत असायचे. अलीकडे, पाठ्यक्रम, परीक्षा यांची प्रारूपं बदलत चालली. यात चांगले गुण जरूर असतील. पण सामाजिकशास्त्रे यांतील ज्ञानप्राप्ती आणि ललितकला अथवा भाषा-साहित्याचा अभ्यास निदान, विशिष्ट मराठीसारखा विषय निवडून हाच अभ्यास ऐच्छिक- अनिवार्य अशा रूपात करताना सामाजिक शास्त्रांचे फॉर्म्युले भाषांना व साहित्याला लागू करणे अहिताचे आणि एकांगी ठरू शकतात.
कला विद्याशाखेतील मराठीचा, इंग्रजीचा, हिंदीचा अभ्यास ‘एका वाक्यात उत्तरे द्या किंवा जोड्या लावा’, असा पूर्ण होत नाही. पदवी- पदव्युत्तर परीक्षांना तर नाहीच नाही. आणि जरी केला तरी पोपटासारखा तो होईल, पण "आकलन, जाणिवा, संदर्भ, निपुणता'' या दृष्टीने हा भाषाभ्यास व साहित्याभ्यास पालथ्या घड्यावर पाणी अशाच पद्धतीचा व्हायची भीती आहे. विद्यापीठांच्या भाषाव्यवस्थेत आणि महाविद्यालयांच्या रचनेत "मराठी''चा साहित्य म्हणून होणारा हा संकोचीकरणाच्या पथावरून धावणारा अभ्यास वा अभ्यासक्रम ज्ञानमूलक नाही आणि समाधानही देऊ करणारा नक्कीच नाही. भाषाभ्यासातील संकोचीकरणाचा हा तोटा व्यवस्थित समजून घेतलाच पाहिजे.
तथापि, शालेय पाठ्यपुस्तकांपुरती संकोचीकरणाची अथवा जोड्या लावा, एकवाक्यी भाषा समजून घेण्याची रीत योग्य नक्कीच. शिवाय - स्पर्धा परीक्षा - प्रवेश परीक्षा यांच्यासाठीही पर्यायवाचक, विधानप्रधान भाषा व साहित्याभ्यास ही धकून जाणारी व स्थळदृष्ट्या योग्यच पद्धत आहे. पण बीए घेऊन ऐच्छिक मराठीचा अभ्यास करणारे विद्यार्थी आणि त्यापुढचं शिक्षण घेणारे मराठीचे विद्यार्थी साहित्याकडे, भाषेकडे या अशा संकोचीकरणाची वाट काढत "पास'' होत असतील तर भाषा शिक्षणातील आनंद गमावलेली आणि मराठीबद्दल क्षीण ज्ञान हशील केलेली किडलेली मराठीची फौज फक्त बाहेर येईल. आकलनानंदाचा पाय खोलात गेलेला असेल. यापेक्षा दुसरे काय?
सारांश, वाङ्मय अथवा भाषा या मानव्यविज्ञान विद्याशाखेमधील एकंदर अभ्यासाचे स्वरूप त्रोटक राहिले तर साहित्याभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पदरात फार काही पडणारे नसते. साहित्याभ्यास किंवा भाषाभ्यास असा एकदम संकोचीकरणाच्या पातळीवर सोडून देता येणार नसतो. एका लेखकाचा अभ्यास करताना तसेच एखाद्या अभ्यासपत्रिकेमध्ये दोनचार काव्यसंग्रहांचा अभ्यास करताना भाषेच्या विद्यार्थ्यांना पुरते समाधान तर मिळतेच. पण त्यासमवेत लेखकाची एकंदर प्रकृती, साहित्य प्रकाराचे वेगळेपण, आकलनाच्या बहुविध मिती, प्रकार, भाषा, शैली, संस्कार, प्रभाव, परिणाम आणि मूल्यमापन अशा अनेक घटकांचा विचार लेखकाभ्यासामधून, काव्यसंग्रहाच्या अभ्यासामधून करता येतो. यातून भाषा- साहित्याचे विद्यार्थी नीट घडायला साह्य होते. एका वाक्यात प्रश्न बसवून आणि त्या प्रश्नांना चार पर्याय देऊन दिलेल्या पर्यायांवर "योग्य'' उत्तराची खूण करून साहित्यातला, भाषेतला आनंद सांडून जातो. हे या प्रकारचे साहित्यसुखाचे आणि भाषानंदाचे संकोचीकरण मराठी भाषा- साहित्य संस्कृतीला स्वाभाविकच उपकारक अजिबात नाही. महाविद्यालयांतील, विद्यापीठांतील भाषा- साहित्याचे शिक्षण आणि त्या शिक्षणाचे बराकीकरण आनंद हद्दपार करणारे ठरणारे असते.
कारण, एक लेखक अभ्यासताना त्यांचे समकालीन विविध लेखक समजून घ्यावेच लागतात. शिवाय, कथासंग्रह, कादंबरी, नाटक, काव्यसंग्रहाचे अध्यापन- अध्ययन करताना इतर पुष्कळ त्या त्या प्रवाहातील ग्रंथ संदर्भासाठी गाठीशी ठेवावेच लागतात. पाया म्हणून मौलिक समीक्षेचीही आणि साहित्येतिहासाचीही सढळ मदत अशा वेळी कामास येते. यातून भाषा संकोचीकरणाचे अडथळे दूर होतात आणि साहित्य भाषाभ्यासांची तजेलदार पिढी उभी राहते हे सत्य आहे. तशी ती उभी करण्याचा संकल्प आणि निर्धार आजच्या ‘मराठी राजभाषा दिना’च्या निमित्ताने करूयात.
(लेखक नांदेडच्या स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक व विभागप्रमुख आहेत.)
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.