विद्यमान शिक्षण प्रक्रियेमध्ये साचलेपण आले आहे. त्याची उपयोगिता कमी झाली आहे. त्यामुळेच त्यामध्ये व्यापक परिवर्तन केले पाहिजे.
शिक्षणात क्रांती होऊन मोठा काळ लोटला. यामुळे शहरांसमवेतच ग्रामीण महाराष्ट्र परिवर्तनाच्या उजेडात आला; याविषयी दुमत असावयाचे कारण नाही. ‘गाव तिथे शाळा’ किंवा तालुका अथवा मोठ्या मानवी वसाहतींच्या ठिकाणी महाविद्यालयं सुरू झाली. शिवाय दोन-चार जिल्ह्यांचा परिसर कवेत घेणाऱ्या भू-प्रदेशांवर विद्यापीठंही उभी राहिली. हे घडले ते उत्तमच झाले.
तथापि, क्रांतदर्शी या अशा घडण्यांमागे महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील, स्वामी रामानंद तीर्थ अशा कितीतरी थोरांनी केलेल्या सत्कार्यांचा कृतार्थ अशा स्वरूपाचा वाटा आहे, हेही विसरून चालणार नाही.
हे सारं मान्य करून, मनोमन स्वीकारूनच आजचं आपल्या ‘शिक्षणाचं वास्तव’ जरा अधिक चिंतनगर्भतेनं समजून घेण्याची वेळ आली आहे. आज घरोघरी पोहचलेल्या शिक्षणाचा पोत कसा आहे. दिलं आणि घेतलं जाणारं शिक्षण किती यथार्थ आहे? किंवा या शिक्षणानं आनंद दिला का? किंवा सेवा-संधींच्या दृष्टीनं आजचं हे शिक्षण कुचकामी तर ठरत नाही ना? अशा मनांमध्ये रुंजी घालणाऱ्या प्रश्नांनाही आज नीट समजून घेतलेच पाहिजे.
अन्यथा, लक्षावधी पदवीधर हे विद्यापीठांच्या विविध फॅक्टरींमधून बाहेर पडत राहतील आणि निराशा मात्र अशीच गगनगात्री झालेली पाहाणं समाजाला, प्रायः येथील व्यवस्थेलाही मुळीच परवडणारं नाही.
आज शिक्षणाचा रूप, गुण, रंग हल्ली ‘माहितीप्रधान’ अधिक होत चालला; हे सर्वथा अमान्य करून चालणार नाही. रूढ अशा प्रकारच्या शाळा, महाविद्यालयांमधून दिलं जाणारं शिक्षण परीक्षांच्या रूक्ष दोरखंडाला बांधलेले, मार्क्सशीटवर गुण दाखविणारे, पुस्तकी, गौरवात विरघळणारे असे आहे.
त्यामुळे कौशल्यांना मुळात प्राधान्य देणाऱ्या शिक्षणाचा टक्का किती? चटकन संधीसेवा मिळतील, असा शिक्षणक्रम सध्या किती आहे? जिथं दोन किंवा त्यापेक्षा अधिक पदव्या घेऊन किंवा फार काय; एम.फिल., पीएच.डी. यांसारख्या संशोधन आधारित उच्च श्रेणींच्या मानल्या जाणाऱ्या पदव्या घेऊनही मुळीच संधी नाहीत, नोकऱ्या नाहीत.
खेदाची गोष्ट म्हणजे ‘ज्यात संशोधनच मुळी काही नाही’ अशाच उच्च शिक्षणाची ‘निष्फळ स्थिती’ दिसांमाजी वाढतच आहे आणि हे अस्वस्थ करणारेही आहे. ऐरणीवरच्या अशा या स्थितीचे मनन करण्याची आता वेळ आली आहे. वस्तुतः सर्वोत्तम अर्हता असलेले शिक्षक असलेच पाहिजेत, याचा आग्रहही समाजातून वाढला पाहिजे. पुष्कळ ठिकाणी जनावरं बांधण्यासारख्या गोठ्यांसारख्या शाळा पाहायला मिळतात. अशीच अनेक स्थळी महाविद्यालयं आहेत.
तिथं कुठले शिक्षण? कुठले कौशल्ये? असे हे जळते विषय सरकारनेही नीटपणे समजून घेत; त्यांना अर्थात चाप लावला पाहिजे. मास्तरकी, प्राध्यापकींच्या नेमणुका करताना अर्धा कोटी, पाऊण कोटी रुपये दिले-घेतले जातात; अशा वेळी शिक्षणाच्या मृत्यूशिवाय हाती काय दुसरं लागणार? यावरही कठोर उपाय योजले गेले पाहिजेत. त्याशिवाय, शिक्षणातली ही घरघर नक्कीच थांबणारी नाही.
सुलभीकरणाला गतिरोधक हवेत
शिक्षणाची एखादी बाजू भक्कम आणि दुसरी बाजू पांगळी हे कसं चालेल? विज्ञान शाखांमधील, अभियांत्रिकी क्षेत्रांमधील शिक्षणाची सततची स्थिती पुष्कळ प्रगत, संधी देणारी, दर्जा जपणारी, प्रात्यक्षिक सिद्ध स्वरूपाची असते. शिवाय शोधाधारित आणि समाजोपयोगिताही मग अशा ज्ञानशाखांतील शिक्षणाची जास्त आहे.
या उलट मानव्यविज्ञान शाखांमधील शिक्षणाची मुद्रा आणि या शिक्षणाची सांप्रत स्थिती परीक्षापुरस्कृत ‘घोका आणि ओका’ या पद्धतीची. त्यामुळं या शिक्षणात ‘पणाला लागणे’ असा काही भागच नाही. शिवाय खेदाची गोष्ट म्हणजे बीएसारख्या वर्गात एकदा विद्यार्थी शिरला की, तो पीएच.डी.पर्यंत सलामत पोहूनच बाहेर पडतो. मात्र बाहेर आला की तो ‘कोरडाच’ राहतो.
त्यासाठी एक प्रकारे हा पाट्याटाकू अर्थात टाकाऊ शिक्षणाचा प्रवाह अधिक नीट करायला हवा. यातील प्रचलित सुलभीकरणाला गतिरोधक हे असायला हवेत. अन्यथा, घरोघरी शिक्षण असेच पोचत राहील आणि ‘आडांत नाही तर पोहऱ्यांतही कुठून येणार’ अशा रिकाम्या शिक्षणाचा प्रवाह मात्र असाच सुरू राहील. प्रतिमांहून प्रत्यक्ष सुंदर ही दृष्टी निर्माण करायला हवी!
व्यवस्थात्मक बदल अनिवार्य
शिक्षण संस्था, विद्यापीठं आणि सरकार यांच्यात सतत चर्चा होत; शिक्षणक्रमांच्या रचना झाल्या पाहिजेत. म्हणजे सरकारकडे शिक्षणाचा पक्का आराखडा असलाच पाहिजे. यासोबतच अजून एक मोठी खंत अशी की, समाजालासुद्धा ‘थेट स्वरूपात’ शाळा, महाविद्यालये, विद्यापीठं बोलवतात का? ती त्यांना थेट सामावून घेतात का? तर या प्रश्नांचीही उत्तरं ‘नाही’ अशीच मिळतात!
याचा अर्थ असा की, साक्षात समाज, लोक यांचे शिक्षणातलं समावेशीकरण वाढलं पाहिजे. तमाम पालकांच्या भूमिका, आशा-अपेक्षा आमची शिक्षणप्रणाली मुळीच ऐकून घेताना दिसत नाही. शिक्षक-पालक बैठका किंवा ‘पॅरेंट मिटिंग्ज’ ही केवळ कागदावरची प्रक्रिया राहिलेली आहे, त्यातून फारसे काही साध्य होताना दिसत नाही. तेव्हा यात परिवर्तन घडलेच पाहिजे.
विद्यार्थी, पालक आणि एकंदर शिक्षण देणाऱ्या बहुतांश संस्था या छत्तीसच्या आकड्यांप्रमाणे परस्परांविरुद्ध तोंडं करून उभ्या आहेत! अशा या स्थितीत शिक्षणातील परिवर्तन मग समाजांपर्यंत कसे पोचेल?
मुळात सांप्रत शिक्षण व्यवस्थेत सकारात्मता वाढीस्तव, रूची आणि ओढ वाढण्यासाठी सतत चर्चिला जाणारा विषय असा की, मुलं, समाज, पालक यांची ‘मातृभाषा’ ही शिक्षणामध्ये, तसेच नेमलेल्या क्रमिक अभ्यासक्रमांतील पाठ्यपुस्तकांत यावी. हा विषय कबूल करावा, असा आहे. मराठीमधूनच पुस्तकं असावीत. आता सरकारने ‘मराठी भाषा विद्यापीठ’ प्रस्तावित केले आहे. त्यासाठी गतीनं विद्यापीठ उभारणीचे प्रयत्नही सुरू आहेत.
नेमलेल्या समितीने या कामी उत्तम वेग घेतलेलाच आहे. मराठी विद्यापीठाबाबतचा दृष्टिकोन (व्हिजन), कार्यपद्धती, आवाका हा नक्की उत्तमच असेल! कारण थेट समाजाला, प्रतिभावंतांना, तसेच जिथं कुठं गुणी लोक असतील अशा समाजांमधील सर्वच्या सर्व घटकांना ‘शैक्षणिक अर्हतांचे अवडंबर’ न माजवता प्रस्तावित ‘मराठी भाषा विद्यापीठ’ सामावून घेईल, असे दिसते.
अशाच सढळ पद्धतीने डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली काम करणारी समिती तसेच विद्यापीठ मसुदा समिती पायाभूत स्वरूपाचे कार्य करीत आहे. हे भाषा विद्यापीठ अर्थात, सर्वांसाठी ‘छत्र विद्यापीठ’ असावे, असा समिती अध्यक्ष डॉ. मोरे यांचा दृष्टिकोन व्यापक, प्रगत असाच! या प्रकारचे ‘व्हिजन’ त्यांच्या मूळ ढाच्याला धक्का न लावता इतर अकृषी विद्यापीठांनीही मानव्यकला ज्ञान शाखांकरिता लक्षात घ्यावयास हरकत नाही.
याचे कारण, नुसत्या पारंपरिक धारणांनी सध्याच्या शिक्षणाचा हा रथ पुढे जाऊ शकणारा नाही. त्यासाठी बदलांची अनिवार्यता तर आहेच. कारण केवळ पदवी बहाल करणाऱ्या शिक्षणाला बाहेर, जगातही यापुढं, कवडीइतकी किंमत राहणार नाही, हे लक्षात घ्यावे लागेल.
मुळात समाजांच्या कामी येईल, असे शिक्षण हवे. काळानुरूप समुचित असणाऱ्या एकूणच कलांची, कौशल्यांची, संशोधनांची, गुणांची, गुणवत्तेची पक्की कास आजच्या शिक्षणास धरावीच लागेल; त्याशिवाय वर्तमान शिक्षण टिकणार नाही. हे मनावर घेऊन यापुढे काम करावंच लागेल. अन्यथा, ‘चल मेरे हाथी’ या न्यायाप्रमाणे आपली शाळा, महाविद्यालयं, विद्यापीठं चालत राहतील आणि शिकणारा हा घटक जागच्या जागी रूतून बसलेला असेल! कारण मुळात शिक्षणप्रकृती आणि परिवर्तन यांची सांगड ही तर घालावीच लागेल.
(लेखक ज्येष्ठ प्राध्यापक असून, मराठी बोली आणि भाषांचे अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.