‘रोजगाराभिमुख शिक्षण’ या संकल्पनेला येत असलेले महत्त्व भाषाशिक्षण देतानाही विचारात घ्यावे लागेल.
‘रोजगाराभिमुख शिक्षण’ या संकल्पनेला येत असलेले महत्त्व भाषाशिक्षण देतानाही विचारात घ्यावे लागेल. महाविद्यालयीन पातळीवर मराठी शिकविताना अभ्यासक्रमात त्यादृष्टीने बदल करावे लागतील. आता काळाची पावले ओळखली पाहिजेत.
जिथे काही आशा आणि जिथे काही तरी संधी उपलब्ध होतील, अशा अभ्यासक्रमांकडे ओढा वाढता राहील; हे स्वाभाविकच आहे. या उलट, परंपरानिष्ठा, जुनाट, तोच तो अभ्यासक्रम जर असेल तर `मग शिकायचे कशासाठी?’ या प्रकारची मानसिकता डोके वर काढणे स्वाभाविक ठरते. विद्यापीठांमध्ये स्नातकोत्तर चालणारे मराठी विषयांचे अभ्यासक्रम आणि या अभ्यासक्रमास प्रवेश घेणारे विद्यार्थी यांची स्थिती अर्थात फार बरी नाही. जर ही स्थिती अशीच राहिली तर उद्या भविष्यात विद्यार्थी नाहीत म्हणून विभाग गुंडाळून ठेवण्याच भीती वाढू शकते किंवा आंतरविद्या शाखा पद्धती अवलंबून असे विभाग इतर विभागांना जोडून देत डबघाईला आलेल्या विषयांचा ‘श्वास’ सुरू ठेवला जाऊ शकतो. या धोक्याचा गंभीरतेने विचार करायला हवा.
आधी कारणांच्या मुळाशी जायला हवे. मराठी विषयाचे अभ्यासक्रम बरेचसे साचेबद्ध झाले आहेत. त्यात व्यापक बदल व्हायला हवेत. विद्यार्थी गरजा आणि रोजगारांच्या संधी यांचा विचार अभ्यासक्रमात आग्रहपूर्वक करायला हवा. वर्तमानाचा सूरही समजून घेता यायला हवा. केवळ साहित्य प्रकारांचा विचार करून किंवा साहित्येतिहासांचे पठण करून विद्यापीठाची मराठी टिकून राहील, याची मुळीच शक्यता नाही. मराठीतील संशोधनाचा दर्जाही फार गुणग्राहक दिसत नाही. दिवसेंदिवस त्याचेही स्वरूप पुष्कळच खाली खाली चालले, हे अमान्य करता येत नाही. भाषाविज्ञानावर शेकड्यात एखादा प्रबंध आढळतो. तेव्हा हे असे का? समाजसुधारक किंवा संत यांच्या साहित्याचा भाषिक पातळीवरून शोध घेत असा अभ्यास कितपत व किती केला जातो? किंवा नंदा खरे यांच्यासारखे अनेक लेखक, ज्यांनी मराठी साहित्यात वेगळे अनुभवविश्व, माणसे, शिवाय स्थापत्य क्षेत्रातील नवी सशक्त भाषा साहित्यात आणली; अशा नंदा खरे यांच्या साहित्याला मराठीच्या अभ्यासक्रमांमध्ये आपण जागाही देत नाही. अशा लेखनावर संशोधन, समीक्षाही होत नाही. आमच्या अभ्यासक्रमांच्या आणि संशोधनाच्या एकूण शोधमोहिमा एवढ्या का भरकटत चालल्या आहेत, याचाही जरूर करायला हवा.
सोपेपणाच्या नावाखाली...
संशोधनाचे एक वर्तुळ बनले आहे. त्यात नव्या वाटा धुंडाळण्याचे कष्ट फार कमी आढळतात. म्हणजे काय की, सोपेपणाच्या नावाखाली आणि केवळ सपाट, उथळ अनुकरणांपायी कुठेतरी गांभीर्य हरवून बसणारे असे आणि विद्यार्थी, वर्तमान, पालक, काळ, परिस्थिती यांचा कसलाच विचार न करता मराठी विषयांचे अभ्यासक्रम पुष्कळदा ‘पाट्या टाकू’ होताना दिसतात. हे बदलले गेले पाहिजे आणि हे बदलले गेले नाही तर मराठीचे काय होईल, हे ठाऊक नाही; मात्र मराठीचे विभाग आणि मराठीचा अध्यापकांचा वर्ग यांच्या प्रश्नांत मात्र वाढ होऊ शकते. अजून वेळ गेलेली नाही.
शास्त्र म्हणून समीक्षा, शिस्त म्हणून व्याकरण किंवा भाषाविज्ञान यांचे शिक्षण तर कोणत्याही भाषेतून शिकले पाहिजे; याबद्दल दुमत नाही. मात्र वाढत्या बेरोजगारीचा प्रश्नही विचारात घ्यावाच लागेल. या बेरोजगारीची कारणे लक्षात घ्यावी लागतील. कोरोनोत्तर स्थिती खूप बदलली. या बदलांचा विचार दुर्लक्षून चालणार नाही. शिवाय, बिगर संधीचे, बिगर कौशल्यांचे, बिगर रोजगारांचे मराठी शिक्षण घेऊन करायचे तरी काय, अशा प्रश्नांचा विद्यार्थीमनांत चाललेला भुंगा समजून घ्यायला हवा. मराठी विषय घेऊन विद्यापीठ शिक्षण पूर्ण करणे हिताचे, असे वाटायचे असेल तर काय करावे लागेल, याचा तमाम विषयशिक्षक आणि अभ्यास मंडळे यांनी विचार करावा. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने मराठी अभ्यासक्रम बदलांमध्ये विद्यार्थी- संधी- काळ- गरजा पुढ्यात ठेवत खूप बदल केले आहेत. पुढे पुढे भविष्यात त्याची चांगली फळं मिळतील, अशी आशा आहे. ‘पी हळद आणि हो गोरी’ असे होत नसते. पण परिस्थिती बदलण्यावर अभ्यास मंडळ आशावादी आहे.
जसे की, प्रादेशिक बोलींचे पेपर किंवा जाहिरात शिक्षण किंवा पटकथा लेखन, चित्रपट मालिका, गीत लेखन, भाषांतर मीमांसा, व्यावहारिक मराठी, मराठी कौशल्य विकास, निवेदन- भाषण कौशल्य या पद्धतींचे विविध घटक आणि या प्रकारच्या स्वतंत्र अभ्यासपत्रिका तयार करण्यात आल्या. त्या अनुरोधाने क्रमिक पाठ्यपुस्तके तयार करण्याचाही प्रयत्न झाला आहे. यात बऱ्यापैकी यश विद्यापीठास लाभत गेले असले तरी एकूण प्रयत्नांत आपण कमीच पडतो, याची जाणीव होत राहते. अद्याप खूप काही करण्याची आणि त्यासाठी संयुक्तपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. सारांश, अशा बदलाशिवाय गत्यंत नाही!
‘विद्यार्थ्यांचे समाधान हेच आमचे समाधान'' अशा न्यायाचा तोलकाटा मराठीविषयी विचारात घ्यावा लागेल. यात तत्त्वाला थोडी मुरड घालावी लागते, हे मान्य आहे; परंतु चालू काळाचे ध्वनी ऐकू घ्यावेच लागतील. विद्यार्थ्यांची गरज ओळखायला हवी. शिकणाऱ्या वर्गांचे हित आणि त्यांच्या अपेक्षांकडे दुर्लक्ष करून आता चालावयाचे नाही. कारण वय, पैसा, आयुष्य, आशा खडकांवर पेरण्यात विद्यार्थी आणि पालक यांची आता तशी मुळीच तयारी नाही. शिक्षण आणि लाभ यांची मोट बांधावीच लागेल. त्याशिवाय मराठी असो अथवा कोणताही विषय असो, त्यास भवितव्य राहील, याची शक्यता नाही. ‘वाचा, घोका आणि उत्तीर्ण व्हा’ ही रीत शिक्षणात आता तग धरणारी नाही; नसेल. त्यापेक्षा ज्यात एक दोन तीन पदव्या मिळवल्या; त्या पदव्यांचा जगणे आणि भवितव्य यांच्याशी सांगड बसली पाहिजे आणि हा विचार महाविद्यालये, विद्यापीठे येथे शिकवल्या जाणाऱ्या मराठी विषयासंबंधी कसोशीने करावा लागेल. अन्यथा, मराठीला सोडून शिक्षणाचा गाडा जिथे संधी आहेत त्या दिशेने धावण्याचे भय आहे.
( लेखक नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.