भाष्य : गजर मराठीचा, अभाव ठोस कृतीचा

शिक्षण आणि मराठी भाषा हे समीकरण अमान्य करता येत नसले तरीही, शिक्षणाच्या बाहेरही एक प्रचंड असा लोकसमूह आहेच की, ज्यांचा ‘मराठी’ भाषा किंवा बोली सांभाळण्यात मोठा वाटा आहे.
Marathi Language
Marathi LanguageSakal
Updated on
Summary

शिक्षण आणि मराठी भाषा हे समीकरण अमान्य करता येत नसले तरीही, शिक्षणाच्या बाहेरही एक प्रचंड असा लोकसमूह आहेच की, ज्यांचा ‘मराठी’ भाषा किंवा बोली सांभाळण्यात मोठा वाटा आहे.

शिक्षण आणि मराठी भाषा हे समीकरण अमान्य करता येत नसले तरीही, शिक्षणाच्या बाहेरही एक प्रचंड असा लोकसमूह आहेच की, ज्यांचा ‘मराठी’ भाषा किंवा बोली सांभाळण्यात मोठा वाटा आहे. त्यांनी भाषा वाहती ठेवली आहे. या अशा मराठी भाषेला मात्र आपल्या शिक्षण व्यवहारात महत्त्व आणि ममत्व का दिलेले नाही, हा प्रश्न आहे.

अलीकडेच वैश्विकतेचा गजर करत मराठी भाषकांची दोन संमेलने झाली. एक मुंबईत राज्य सरकारच्या वतीने, तर दुसरे पिंपरीत जागतिक मराठी अकादमीच्या वतीने. मराठी भाषा आणि साहित्याचे हे असे उत्सव आपण नियमित भरवतो आणि मनसोक्त साजरेही करतो. परंतु जे मूलभूत प्रश्न आज मराठीला भेडसावत आहेत, त्यांच्या सोडवणुकीसाठी काही प्रयत्न होणार की नाही, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. छोट्या प्रमाणात आणि विखुरलेल्या स्वरुपात काही जण प्रयत्न करत आहेत. पण त्यांची परिणामकारकता वाढविण्यासाठी व्यापक प्रयत्न हवेत. नुसता वैश्विकतेचा झेंडा मिरविण्यात काय अर्थ आहे?

मराठी भाषेपुढच्या प्रश्नांचा विचार करताना पहिली समस्या ठळकपणे आज पुढे येत आहे ती म्हणजे मराठी शाळा बंद पडण्याचे भय. ‘मराठी’ घेऊन शिकणारे विद्यार्थी महाविद्यालयांमधून कमी कमी होत आहेत. विद्यापीठांच्याही मराठी विभागांना विद्यार्थिसंख्येची घरघर सतावत आहे. तर मराठी मुलांना कौशल्यज्ञानच नसल्यामुळे आज नोकरी अथवा संधी मिळत नाही. या सर्वच्या सर्व बाजू स्वाभाविक सत्य असून त्या मराठी माणसाला अस्वस्थच करणाऱ्या आहेत. तथापि ही अशी वेळ का आली? किंवा मराठी विषयांत काय आमूलाग्र बदल केले पाहिजेत? किंवा मराठी बदलायची, म्हणजे नेमके काय करायचे? किंवा संधी मिळविण्यासाठी आणि कौशल्ये आत्मसात करण्यासाठी मराठीची नवी दिशा कुठली अशी असावी? हे सारे प्रश्न आता लगोलग विचारामध्ये घ्यावे लागतील. ज्यामुळे मराठी विषयासंबंधी निश्चित काही एक आश्वासक स्थिती उत्पन्न होऊ शकेल.

खरं म्हणजे मुळात नोकरदारांना पोसण्यासाठी केवळ मराठी नाही; हे पण विचारात घ्यावे लागेल; आणि शाळा-महाविद्यालये म्हणजेच काही ‘‘मराठी जगवणारी प्रदान केंद्रे होत,’’ असाही भ्रम बाळगता कामा नये. हे भ्रम दूर व्हायलाच हवेत. म्हणजे मोंढ्यातला, बाजारातला, चौकातला, हॉटेलातला किंवा गावचौकांतला ‘माणूस’ हापण मराठी बोलतो; म्हणजे मराठी जगवतो. भाषा तोही वाहाती ठेवतो. या सगळ्याचा विसर आपणास पडता कामा नये. वृत्तपत्रांचे वाचन करणारी अनेक मराठी माणसे, टीव्हीवरून मराठी पाहणारी-ऐकणारी खूप माणसे, रेडिओंच्या विविध प्रसारण केंद्रांवरून माय मराठी ऐकणारी माणसे आणि घरोघरी किंवा अगदी दारोदारी मराठी बोलणारे लोक आपण आपली मराठी बोलणाऱ्यांची संख्या मोजताना ध्यानीमनी ठेवत नाही. नेमका हा मुद्दा मराठीवरच प्रायः मराठी बोलणाऱ्या ‘लोकां’वर अन्यायच करणारा ठरतो.

साहित्य संमेलनांमधून मराठीचा एवढा होणारा ‘गजर’ अजिबात महत्त्वाचा नाही, असे कोणी म्हणणार नाही. पण, ‘संमेलनांनीच मराठी वागवली, जगवली.’ असे तरी सरसकट कसे म्हणता येईल? किंवा चर्चा, कार्यशाळा, परिषदा यांच्यामधूनच मराठीवर थोर उपकार हे होत असतात, असे म्हणणेही खूप धैर्याचेच ठरू शकेल! हे मराठीसाठीचे प्रयत्न मोलाचेच; पण मराठीपणाचे सगळे श्रेय त्यांना देऊन भागत नाही. तसे केले तर आम जनता जनार्दनांच्या भाषेवर अन्याय होईल! शेतबांधांवर, बांधकामांवर, गिरणी कारखान्यांत जे श्रमिक-राबणारे एक हाडामांसाचे भव्य ‘माणसांचे जग’ ‘मराठी’ बोलते, याची आपल्याला जाणीवच नाही, असा त्याचा अर्थ होईल. हे सामाजिक वास्तव दृष्टीआड करता कामा नये.

लोकजीवनातील श्रीमंत मराठी!

अगदी घरकाम, हॉटेल, शेतशिवार, लहानमोठे व्यवसाय, लोककथा, लोकगाणी, उपलब्ध असणाऱ्या नोकऱ्या, दुकाने, सार्वजनिक बाजार, बाजारपेठा : ह्या विविध अशा विपुल जागा दर्शवता येतील, जिथे ‘मराठी’च बोलली जाते. जगविली जाते. संवादी ठेवली जाते.

वर दर्शविलेल्या जागांवर हजारो, लक्षवेधी पुरुष-स्त्रिया-मुले-मुली अस्सल, जिवंत, प्रवाही अशी प्रभावक्षम ‘बोलीभाषा’ बोलताना आपण दररोज ऐकतो. मग त्यांच्या या मराठीची आपण ‘मराठी मराठी’ असा एक जप करताना कधी दखल घेणार आहोत? जात्यांवरच्या ओव्यांनी अर्थात, येथील स्त्रियांनी लयदार-गोड ‘मराठी’ केवढ्या श्रीमंतीने जपली, हा तर सर्वांना ठाऊक असणारा विषय आहे. लोकजीवनाच्या अंगाने प्रवाही, समृद्ध ही मायमराठी महिला जगताने सांभाळली, जपलेली आहे. उदाहरणासह सांगायचे तर, रानशिवारांत पेरणी, निंदणी, खुरपणी करताना, नदी, ओढ्यांवर धुणे धुताना, पिकांची वेचणी, कापणी करताना, दूरवरून घरांच्या दिशेने पाण्याच्या भरल्या घागरी घेऊन जाताना, मैतरणी कधी एकठायी आल्या की, सूर गुणगुणताना, नागपंचमीचे झोके लयदार खेळताना, श्रमांचा शीणभाग उतरवताना...ह्या विविध तमाम मराठी स्त्रिया आपले मराठी भाषावैभवच वाढवतात. परंतु, त्यांच्या समग्र मराठीपणाची, त्यांच्या मराठी भाषेची उचित नोंद किती शाळांनी घेतली? किती महाविद्यालयांनी घेतली? किती विद्यापीठाच्या अंगणामध्ये ह्या जिवंत स्त्रीनिष्ठ मराठी भाषेला स्वतंत्र जागा मिळाली?..वरील या प्रश्नांची उत्तर मात्र आपले समग्र पुरते समाधान करु शकणारी नाहीत.

प्रयत्नांची दिशा

फक्त शिक्षणातच मराठी आहे किंवा असते असे मानणे हे मराठी अस्मितेचे ‘अर्धे उत्तर’ आहे. ते पूर्णतः उत्तर मुळीच नाही. शिक्षण आणि मराठी हे जरी समीकरण अमान्य करता येत नसले तरीही, शिक्षणाच्या बाहेरही एक प्रचंड असा लोकसमूह आहेच की, ज्यांचा ‘मराठी’ भाषा किंवा बोली सांभाळण्यात मोठा वाटा आहे. तो नाकारता येणारा नाही. वामनदादा कर्डक, सत्यपाल कीर्तनकार, दादा कोंडके यांच्यारखा मराठी मोहरा किंवा निवृत्ती इंदुरीकर कीर्तनकार किंवा आमचे सगळे लोकशाहीर, लोककलावंत यांनी वापरलेली ‘मराठी’ ही लोकांच्या रोजच्या व्यवहारातील ‘मराठी’ ही मराठी शिक्षणात नसली तरी ‘लोकशिक्षणा’त मात्र तळ ठोकून आणि बळ मिळवून टिकून आहे. या अशा मराठी भाषेला मात्र आपल्या शिक्षण व्यवहारात महत्त्व आणि ममत्व का दिलेले नाही, हा प्रश्न आहे.

समजा त्यात काही उणे असेल पारखले पाहिजेत आणि अधिकचे काही असेल तर शिक्षणातल्या मराठीत मिसळून घेतले पाहिजेत. मराठीत म्हणजे केवळ साहित्यात नव्हे. सर्व शैक्षणिक पाठ्यपुस्तकांत, भाषांतरांत, विविध आणि नवे ज्ञानविषय मराठीत आणण्याच्या प्रयत्नांत या मराठीचा उपयोग करून घेतला तर ती एक चांगली भर ठरेल. अलीकडे अगदी तांत्रिक विषयदेखील मराठीत कसे येतील, यासाठी खटाटोप सुरू आहे. पण ते विषय कृत्रिमरीत्या आणि क्लिष्ट पद्धतीने दिले तर विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होणार नाही. पण ते प्रवाही, ओघवत्या आणि मराठमोळ्या भाषेत आपण करू शकलो तर किती चांगले होईल! नवे प्रतिशब्द घडवावे लागतील. तेही अवघड न करता अर्थवाही,सोपे शब्द कसे शोधता येतील, यावर काम व्हायला हवे.

केवळ सोहळा-समारंभातूनच ‘मराठी’ तगेल असा एकमात्र विचार फार करता येणारा मुळीच नाही. जागरातून वातावरणनिर्मिती जरूर होईल. परंतु मराठी भाषा अथवा मराठी बोली बोलणारे जे अथांग असे मराठी लोकाचे जग आहे, या अशा जगाला आमच्यांत पूर्णतः सामील करून घेतल्याशिवाय मराठी प्रेमाचे अस्सलपण स्पष्ट होईल तरी कसे?

(लेखक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे मराठी विभाग प्रमुख आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.