Marathi Language
Marathi LanguageSakal

भाष्य : मराठी विषयात चैतन्य यावे…

मागील अनेक वर्षापासून मराठी भाषा विषयाकडे विद्यार्थ्यांनी अगदीच पाठ फिरवली आहे.
Published on

मागील अनेक वर्षापासून मराठी भाषा विषयाकडे विद्यार्थ्यांनी अगदीच पाठ फिरवली आहे. बीए.सारखा स्नातक आणि एमए.सारखा स्नातकोत्तर अभ्यासक्रम निवडताना महाविद्यालयांतून तसेच विद्यापीठांमधून मराठीविषय ‘न’ घेण्याकडे कल वाढला, जो अंतर्मुख आणि अस्वस्थ करणारा मुद्दा आहे ! नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रकाशात योग्य दिशेने प्रयत्न केले तरच हे चित्र बदलू शकेल.

काळाचा ध्वनी ओळखताच यायला हवा. त्यादृष्टीनं, बदलही अनिवार्यच ठरतात. आज विद्यापीठांमधला मराठी विषयासंदर्भात काळाचा हा विचार आणि बदलांची भूमिका निर्णायक ठरणारी आहे. मागील अनेक वर्षापासून मराठी भाषा विषयाकडे विद्यार्थ्यांनी अगदीच पाठ फिरवली आहे. बीए.सारखा स्नातक आणि एमए.सारखा स्नातकोत्तर अभ्यासक्रम निवडताना महाविद्यालयांतून तसेच विद्यापीठांमधून मराठीविषय ‘न’ घेण्याचा कल वाढला, जो अंतर्मुख आणि अस्वस्थ करणारा मुद्दा आहे ! शिक्षणक्रांती झाली ही गोष्ट खरीच.

सर्वस्तरीय विद्यार्थी शिकू लागले, ही पण गोष्ट खोटी नाही. विद्यापीठांच्या, सरकारच्या, नाना संस्थांच्या शिष्यवृत्या वाढल्या हेही सत्य. पण, म्हणून विद्यार्थी मराठी विषय निवडत शिक्षणाची शिडी सर करतात, हे मात्र घडताना दिसत नाही. मराठी विषयासंबंधीची अनास्था का बळावतच चालली, याचे सखोल चिंतन सगळ्यांनीच करण्याची गरज आहे. अन्यथा मराठीचा पुकारा व्यर्थ ठरेल!

केवळ नोकरदार पोसण्यासाठी शिक्षण नसते. नसावे. मात्र अध्यापक उत्तम असावा आणि तो शिकवणारा असावा, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. पुष्कळ ठिकाणी मुलं वर्गात असूनही वर्ग किंवा तासच होत नाहीत. यातून शिकवतच नाहीत, तर मग विषय घ्यायचा कशासाठी? असे विद्यार्थीभान जागं रहाते, आणि यामुळेही ‘मराठी’ विषय मग कशासाठी घ्यावा? ही मानसिकता प्रबळ होते, यात चुकीचे काही नाही. मराठीप्रमाणे ही स्थिती इतर विषयांतही असते! अर्थात, तासानुकूल सकारात्मकता यास अपवाद. म्हणजे परीक्षणासोबतच आत्मपरीक्षणाचाही विचार इथ सोडून देता येणारा नाही.

खरं म्हणजे मराठी विषयाचा ढाचा पारंपरिक असणं आणि तसा ठेवणं, हे एक कारण या विषयाकडे विद्यार्थी ‘न’ येण्यामागं आहे. म्हणजे एखाद्या लेखकाचा एमए.ला अभ्यास करून संधी म्हणून किंवा वेतन म्हणून विद्यार्थ्यांना काय मिळेल? याचे उत्तर काहीही मिळणार नाही, असेच आहे!

वाङ्‌मयप्रकार, लेखक, भाषा, प्रवाह, प्रकृती, विशेष म्हणून लेखकाभ्यास ठीक. मात्र, जगणं आणि अन्नपाणी म्हणून या सर्व ‘ज्ञाना’चा उपयोग काय? हे जाणावे लागेलच. यापेक्षा मराठी विषयात वर्ष, अर्धवर्षाचे प्रमाणपत्र, पदवी अभ्यासक्रम विद्यापीठांनी वाढविले पाहिजेत. तसा फार खोलवरचा विचार करत अभ्यास मंडळांनीही या नव्या, कालानुरूप अभ्यासक्रमांची रचना करायला हवीच.

नियमित लोकांच्या नोकऱ्यांना धक्का नको, हे मान्य करूनही तरुणांच्या आयुष्यालापण धोका नको, याचाही ठळक विचार ज्ञानधुरिणांनी, विद्यापीठांनी, अभ्यासक्रम निश्‍चित करणाऱ्या प्राधिकरणांनी बिलकुल करायलाच हवा. अन्यथा, मराठी विषयाची वाट-वहिवाट अधिकाधिक बिकट होईल, यात काहीही शंका नाही.

वस्तुतः कोणत्याही काळात आणि कोणत्याही शिक्षणप्रणालींमध्ये हमी आणि समाधान असणं अगत्याचंच असतं. कारण, केवळ वृथा स्वप्नं दाखविण्याचा हा काळ नाही. त्यामुळं, शिक्षणात विद्यार्थ्यांचे कल नेमके हेरता यायला हवेत. त्यांना प्राप्त होणाऱ्या संधींचे चिंतनही विद्यापीठांनी केलेच पाहिजे. कारण या वाढत्या महागाईत विद्यार्थी प्रचलित शिक्षणात भरडला जातो, जे त्यांना परवडणारे मुळीच नाही.

त्यासाठी, सहा महिन्यांचा, वर्षभराचा संधी-कौशल्ये प्रदान करणारा मराठी विषयांत अभ्यासक्रम सर्वत्रच (देशभरही) असायला हवा. यामुळे तो मराठी शिक्षणात ‘अमृत’ होईल, ती मराठीही सर्व बाजूंनी उत्तम व जिवंत राहील. याप्रकारचे समाधानात्मक प्रयत्न काही विद्यापीठांनी अर्थातच चालवलेले आहेत.! यामुळे, मराठी विषयाची विद्यार्थी संख्याघटीची स्थिती नक्कीच सुधारेल. विषयाची अनास्थापण कमी होईल. विद्यार्थ्यांना रोजगारही नक्की मिळेल आणि ‘मराठी विषयाचा चेहराही बदलेले!’’

जगण्याचे प्रश्‍न

हे खरंच की, जरी मराठी म्हणून आवश्‍यक असतील तरी नुसत्या कादंबऱ्या, फक्त कवितासंग्रह, कथासाहित्य, ललित, आत्मचरित्रं, प्रवासवर्णनं ह्या एवढ्या अवाढव्य, गतिमान काळात ‘अभ्यासून’ मिळणार ते काय? नुसतेच व्याकरण घोकून, पाठ करून त्यामधूनसुद्धा मला ‘जगावयास’ मिळणार तरी काय? हे प्रश्‍न काळाच्या मुखांतून उमटणारे अगदीच रास्त प्रश्‍न आहेतच.

शिवाय मराठीची चौकट समजून घेण्यासाठी आणि ‘मराठी मराठी’ असं म्हणण्यासाठी हे सगळं योग्य असलं तरी, यासाठी सगळं आयुष्य वाळवंटात उभी करायला नवी पिढी मुळीच तयार नाही. हेही समजून घ्यायला हवेच, त्यापेक्षा

१) उत्तम बोलण्याचे कौशल्यं शिकवले जायला हवे.

२) मराठी लेखन उत्तम तपासून देणारे प्रमाणपत्र अभ्यासक्रम असावेत.

३) मालिका-सिनेमांची पटकथा लिहिण्याची तंत्रकला देणारा एखादा वर्षभराचा एखादा उत्तम अभ्यासक्रम असायला हवा.

४) सहजी गाणं लिहिण्यासाठी काय कला, कोणते कौशल्यं पाहिजेत, हेही शिकवणारी एखादी छोटी पदविका निर्माण करता यायला हवी.

५) प्रादेशिक बोलींचे सर्वेक्षण करून त्याचे प्रत्यक्षात उपयोजन कसे करता येईल, याबद्दल, प्रमाणपत्र कोर्स तयार करावा.

६) दृकश्राव्य माध्यमांसाठी लेखन कसे करावे? मुलाखती कशा घ्याव्यात, वाचावे-बोलावे-लिहावे कसे? यासंबंधीचे अगदी लहान-लहान (परंतु, कमालीचे गुणवत्ताधिष्ठीत-श्रेष्ठ अभ्यासक्रम तयार झाले पाहिजेत.) हे सगळे सगळे ‘मराठीसारखा’ विषय घेऊन बीए., एमए.च्या वर्गांतून आता शिकवले जायला पाहिजे. यामुळे मराठी विषयनिष्ठ म्हणून असलेली अनास्था निश्‍चित कमी व्हायला मदत होईल.

नवशिक्षणप्रणाली मुळात, यापद्धतीनेच सुदृढ, नवा, आधुनिक, संधिसंपन्न, अगदीच कौशल्याधिष्ठीत अशाच धारांचा विचार पुढे नेऊ पहाते. तात्पर्य कौशल्ये प्रदान करणारे शिक्षण असले पाहिजे. आपले सांप्रतचे कोठलेही शिक्षण हे भारतीय’धारा समजून घेणारे हे तर असले पाहिजे आणि आंतरविद्याशाखीय अर्थात, कोणत्याही ज्ञानशाखांच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही इतर ज्ञानशाखांच्या काही विशिष्ट विषयांत शिकून ‘निपुण’ होता यायलाच पाहिजे.

यादृष्टीने नवीन शैक्षणिक धोरण देशाच्या शिक्षणात जी सढळ, सुदृढ पायवाट निर्माण करू पहाते, ती समुचित, समाजहितैषी आहे. परंपरा आणि नवता यांचा विचार हा कुणालाच टाकून देता येणारा नसतो, हे सत्यच. तथापि, अशा परंपरेला नवतेचे आत्मसातीकरणही करता यायला हवे. विविध संधींच्या संदर्भात परंपरेतले जे जीर्ण आहे, ते काढूनपण टाकता यायला हवे आणि नवतेमध्ये समकालाचे स्पष्ट निनाद ऐकू येत असतील आणि म्हणून शिकणाऱ्यांना समाधान जर मिळणार असेल तर नवतेचा स्वीकारही अपरिहार्य असावाच.

हे सगळे समजून घेत ‘मराठी विषया’त बदल अपेक्षित आहे. ‘तोच तो पाढा’ मुखपाठ करून काही उपयोग होणार नसेल तर जीवन-शिक्षणाची उजळणी अवश्‍य बदललीच पाहिजे. ज्ञान हवेच, याविषयी कुणालाच संशय किंवा शंका नाही. पण, त्यापुढं जाऊन जीवनज्ञान, जीवनशिक्षण उभे राहिले तर ती सामाजिक समाधानाची बाब ठरते. मराठी विषयातलं शिक्षण कुशल, कलासंपन्न, घरी दोन वेळांची चूल पेटवणारं, समाधानाचं संधीसमृद्ध शिक्षण हवं. म्हणूनच, मराठी विषयाला या नव्या दिशा आता ओळखू यायलाच हव्यात!

(लेखक मराठीचे प्राध्यापक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()