शिक्षणाच्या पलीकडे अथवा पुस्तकांच्याही पलीकडे असणारे बोलींचे हे ‘अबाधितपण’ आमच्या समाजभाषा विज्ञानाला नवी रसद पुरविणारेच होय. एवढेच नव्हे मानव्यविद्या शाखांतील इतरही विषयांना बोलींच्या अभ्यासाचा उपयोग होऊ शकेल.
‘भाष’ म्हणजे बोलणे. तथापि ‘बोल’ ही संज्ञा बोलण्याशी अधिक निकट. हा धागा धरून ‘बोली’ ही महाव्याप्त संवादाची शाखा समजून घेता यायला हवी. कुठलेही शिक्षण अथवा कुठलाही अभ्यासक्रम न करता ‘बोली’ लोक बोलतात. म्हणजे संवादासाठी आम लोकांसाठी ‘बोली’ अनिवार्य बनून राहाते.
‘बोली भूगोल’ यासारखे भाषाविज्ञानांमधील प्रगत, नवे ध्यासक्षेत्र हे काय ध्वनित करते? तर, सुभा किंवा प्रांत किंवा विशिष्ट प्रदेश निवडून तेथील लहान-मोठे लोकसमूह आपले दैनंदिन भाषेचे दळणवळण बोलीतून करतात. त्यांचा ‘भूगोल’ आणि त्यांची ‘बोली’ बहुजिनसी, बहुपदरी, बहुआयामी, बहुगुणी अशी असते. इतकेच नाही तर, अन्नव्यवस्था, जलव्यवस्था, हवामान, संपर्क क्षेत्राची विविधता, सांकेतिकता, रूढी, परंपरा, संस्कृती यानुसारही लोकांच्या बोलींची विविधता अगदी ‘निराळी’ आहे; हे समजून येते.
सारांश, शिक्षणाच्या पलीकडे अथवा पुस्तकांच्याही पलीकडे असणारे बोलींचे हे ‘अबाधितपण’ आमच्या समाजभाषा विज्ञानाला नवी रसद पुरविणारेच होय. एवढेच नव्हे मानव्यविद्या शाखांतील इतरही विषयांना या अभ्यासाचा उपयोग होतो. केवळ, लिंगभावाचा दृष्टिकोन विचारात घेतला तरी बोलींतून हे कळून घेता येईल की, पुरुषांची बोली आणि स्त्रियांची बोली यासंबंधी स्वतंत्र अभ्यासपण करता येतो. तसे प्रयत्न भाषाभ्यासकांनी केले आहेत. ‘भाषा आणि जीवन’ यासारख्या भाषेसंबंधीच्या पत्रिकेतून याप्रकारचा चिंतनशील झालेला प्रयत्न स्वाभाविकच भूषणावह म्हणता येणारा प्रयत्न आहे.
वस्तुतः कुठलीही बोली लवचिक, सहज, परिणामजन्य, प्रवाही, मधूर, ओघवती आणि ‘संस्कृती विचारपुष्ट’ अशीच असते. सरासरी प्रमाणभाषेत या प्रकारचा बोली एवढा अवीट ‘गोडवा’ अर्थात नाही. नसतो; हे पण तेवढेच खरे !
मराठवाड्यासारखा एक मोठा प्रदेश जरी आपण इथं दाखला म्हणून घेतला तरी असे लक्षात येईल की, तेथील बहुतांश जिल्हे हे शेतीपरंपरेला घट्ट जोडून असलेले आहेत.
‘ग्रामीण’ अशा उपाधीला धरून असणारा एकंदर हा भाग श्रम, जीवन, लोक, बोली या विषयांना कायम घट्ट धरून असणारा भाग आहे. तेथील अस्सल बोलीभाषेची खुमारी वेगळीच. समाजभाषा विज्ञानाला नवे शब्दधन पुरविणारी अशी ती आहे. शब्द, प्रतिमा, रूपक, सारभूत संज्ञा, म्हणी, वाक्यप्रचार यांनी डवरलेली ही बोली प्रदेश, समाज, साहित्य यांना नवा आयाम देणारी ठरली.
भास्कर चंदनशिव यांचे कथालेखन किंवा राम निकम यांचे कथालेखन अथवा अगदी गणपत भिसे, सदानंद पुंडगे यांचे अनुक्रमे : कादंबरी-आत्मकथा लेखन मराठवाडी अस्सल अशा बोलीचे सगुण रूप दर्शविते. अशी अजूनही किती तरी दाखले या अनुरोधाने सांगता येणारी आहेत. असो. उदा. लघुशंकेला "इराकत'', जखमेला "खावंद'' किंवा गुडघ्याला 'टोंगळा' अंगात येण्याला "हाजरी'' मानवी दुष्ट प्रवृत्तीला "खतेस'', श्रीमंताला "लाख्या'', देहाने उंच माणसाला "हुटाड्या'', अस्ताव्यस्ततेला `गबाळ’, हकनाक ये-जा करण्याच्या क्रियेला ‘हेलपाटा’, ताटांमध्ये उरवून ठेवणाऱ्या अन्नपदार्थांना ‘भंदं’, पिंडरीला ‘फेंड्री’ (फॅण्ड्री नव्हे.), आळशी माणसाला ‘गाताड्या’, शेतांमधील वरूनच कणसं खुडण्याच्या अभिनव पद्धतीला ‘लाड घेणे’, डोक्यावरील संपूर्ण केस काढण्याला ‘भादरणे’ किंवा ‘व्हंडी’ करणे, असे बोलीभाषेतील हे ‘शब्दधन’ लक्षावधी किंवा त्यापल्याड कितीतरी पुढे जाणारे हे शब्दधन आहे. बोलीतील या शब्दरूपांना, प्रतिमांना, विविध शब्दसमूहांना प्रदेशमातीचा स्वतंत्र गंध असतो. पाणी बदलले की वाणीत बदल पडत,. असे जे म्हटले जाते, ते अगदीच खरे आहे.
बोलीचाच आधार पूर्णतः घेऊन सांगायचे तर ह्या मराठवाडा मुलखात चुलींवर कायकाय शिजते ? त्या त्या पदार्थांची यादी जरी पाहिली तरी तोंडाला पाणी सुटेल; आणि पदार्थ नामसूची वाचून-ऐकून आपण अगदी थक्कच होऊन जाऊ. जसे की ः खरडखिस, फळं, धोंडे, आळन, येसोर, धिलडे, शेंगाळे, धोलडे, लाभडं, वळवट, तंगडेलाडू, बोटवे, खारोड्या, उसऱ्या, बोंडं, सरगुंडे, मांडे, घोळाना, कन्या, भल्डा, घुगऱ्या, सोजी, बेलडीची भाकर, कानोले...अशा अगणित पदार्थांची ‘रटरट’ मराठवाडी चुलींवर पिढ्यान्पिढ्या भाजत- शिजतच आली. यातूनच कितीकांची नावे-आडनावेही पुढेपुढे आली. ‘अन्न-माणूस-भूगोल-समाज-संस्कृती आणि एकूण जीवन’'' यांचा फार सुंदर पीळ प्रादेशिक बोली ह्या सांभाळून ठेवतात.
लक्षणीय शब्दसंपत्ती
विविधतेला फार उत्तम अर्थाने नांवे ठेवणारा मराठवाडा किंवा हा विविध जिल्ह्यांचा मुलूख बोलीसंदर्भात मराठी भाषा विज्ञानालाही नवी शब्दसंपत्ती पुरविणारा आहे. उदा. प्र. ई. सोनकांबळे यांच्या "आठवणींचे पक्षी''सारख्या अत्यंत प्रसिद्ध आत्मकथनाने किंवा याप्रकारच्या विविध आत्मकथनांनी साहित्य आणि समाजालाच नवे शब्दभान आणि नवे बोलीदर्शन घडविलेले आहे.
किंवा साहित्य अकादमी सन्मानप्राप्त लक्ष्मण गायकवाड यांची ‘उचल्या’ ही आत्मकथा समाज, संकेतप्रधान बोलीभाषेचे मराठवाडी बोलीदर्शन घडवते. प्रस्थापित समाजाच्या भाषेपासून कोसो दूर असलेला संघर्षरत, धैर्यवान एक हा समाज आणि त्या समाजाची ‘अस्सल बोली’ गायकवाडांच्या ‘उचल्या’ आत्मकथेतून प्रभावीपणे पुढे येते; ज्याला तोड नाही.
नांव, वस्तू, पदार्थ, प्रवृत्ती यासंदर्भात बोलीप्रभाव लक्षणीय आढळतो. झोऱ्या म्हणजे पिशवी, पाणी भरण्याचे खापरी भांडे म्हणजे बिन्गी, भाकरी थापण्याची लाकडी परात म्हणजे काठोट, लाकडाचा मोठा पळा म्हणजे चाटू, दूध तापविण्याचे खपरी भांडे म्हणजे दुधानं अथवा ओला हरभरा भाजून खायचा म्हणजे तो हुळा; आणि भोळा माणूस म्हणजे 'येडा की खुळा..'.
एकाचवेळी गंमत आणि त्याचवेळी अर्थसौंदर्य वाढवणारी खास बोलीतील शब्दकळा म्हणजे मराठीचे सोनेच. थंडीपासून बचावासाठी लागते ते 'ढाबळं.' अंगात घालायला लागतं ते कुडतं. किंवा मनिला. स्त्रिया नेसतात त्या लुगड्याला ‘नाटी’ म्हणायचे. आणि मजबूत लाकडी माडी बांधताना पिलर्स किंवा इंग्रजीत ज्यास बीम म्हणतात त्यांनाही 'नाटी' असेच संबोधले जाते.
बांधकामासाठी पूर्वी आयताकृती लांब घडवलेले दगड वापरले जात; त्यांना ‘तंडी’ असा सुंदर शब्द जनलोकांनी शोधला. अशी खेळती आणि वाहाती बोली संस्कृतीचा अपरिहार्य भाग बनवते. किंवा शेतांमध्ये एखादी पेरणी काहीशी आधी झाली तर त्याला ‘आबक’ म्हटले जाते. पेरताना ‘बी’ जमिनीत पोहोचले नाही तर त्याला ‘बेरणे’ म्हणायचे. बाळपिकांतून तण काढून टाकण्यासाठी लहान असा वखर- औत वापरण्यात येतो; त्यांना ‘डवरे दुंडे’ असा काव्यस्पर्शी शब्द लोकांनी शोधला.
हिवाळ्यात हरभरा, गहू, लाख, करडी अशी पिकं घेतली जातात; त्यांना ‘रब्बी’ या सरकारी रूढ शब्दाऐवजी ‘कठान’ असा शब्द गांवमातीच्या लोकांनी बोलीत शोधून भाषेची चव अधिक चवदार बनवली. ‘माथन’ - यासारखा गोड शब्द पाणी साठवायला असलेल्या खापराच्या घागरींना वापरला जातो. सीलसील म्हणजे धिंगाणा, डेंगरं म्हणजे गिल्ला करणारी लहान मुलं, थंड म्हणजे हिवसं, कोरडे लाल तिखट पावडर म्हणजे भुरकी. कापसाचे जमिनीत खोवले जाणारे बी म्हणजे सरकी. गांवमातीतील हे लोक धुराला धुपट म्हणतात. मातीतून वर उडणाऱ्या धुडीला धुलडा म्हणतात. इथून तिथे लवकरात पोचलात ते म्हणजे ‘येरवाळी’. गावात रात्र होते रातरशा. सकाळची वेळ तिथे असते हिवशीवेळ.
पहाटेपहाटे म्हणजे तामटाच्या आत (म्हणजे तांबडं फुटण्याच्या आधी.)आम लोकांच्या जीभेवर असलेली ही बोली समाज जोडून व संस्कृतीलाही जोडून राहिलेली आहे. ती जशी व्यवहार पूर्ण करते तद्वतच ही बोली मनं जोडून ठेवते. तुकोबांच्या भाषेत सांगायचे तर हे शब्दधन ‘रत्न आणि शस्त्र’ अशा बहुपद्धतीने समाज ‘बोलता’ ठेवणारे मोठे भाषिक धन आहे.
(लेखक शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे सदस्य व प्राध्यापक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.