भाष्य : जनतेच्या बाजारबोलीची रसद

बाजारात ‘सर्व’ भाषा असतात. विविध बोलींचा मुक्त आढळ, ही बाजारांची ठळक ओळख असते.
Weekly Bazar
Weekly Bazarsakal
Updated on

बाजारात ‘सर्व’ भाषा असतात. विविध बोलींचा मुक्त आढळ, ही बाजारांची ठळक ओळख असते. हीच ओळख भाषाशास्त्राला नवी रसद पुरविण्यास अगदी ‘आशयसंपन्न’ सहाय्य करते.

‘लोकसमूह’ जिथे एकत्र येतात तेव्हा भाषाच बहुमुखी होतात. म्हणजे भाषांचे रसायन तयार होते. आठवडा बाजारांची संकल्पना या संदर्भात खूपच बोलकी ठरणारी. गावांची भाषा, परिसरांची भाषा, ग्रंथभाषा, कार्यालयांची भाषा, विद्यापीठांतील भाषा, वाहनचालकांची भाषा, पोलिसांची भाषा हे असे भाषांचे वर्गीकरण खूप विस्ताराने मांडता येणारे आहे.

पुढाऱ्यांची म्हणून असणारी भाषा तर कितीक तऱ्हांनी ऐकायला मिळते! म्हणजे, भाषा एकमुखी, एकसारखी, स्थिर अशी मुळीच नसते. तिच्यामध्ये सतत सारखे बदल घडून येतात. म्हणूनच, परिवर्तनशीलता हा भाषेच्या संदर्भात लक्षणीय विशेष नमूद करण्यात येतो; तो अगदी यथार्थच होय. कारण एकसाची, एक-ढाची भाषा नसते.

आता हेच पाहाः ‘बाजारबोली’ हा विषय जनतेच्या बोलींच्या अनुरोधाने संवादाचे लवचिक पण प्रवाही माध्यम म्हणून भाषावैज्ञानिकांना खुणावणारे असे माध्यम म्हणता येईल. तालुका, जिल्ह्यांच्या अथवा साधारणतः शहरी म्हणवल्या जाणाऱ्या शहरांत- वसाहतीत- गावांमध्येही ‘आठवडा बाजार’ एक विशिष्ट वार ठरवून भरतात/ बसतात.

भाषिकदृष्ट्या अशा बाजारांचा अभ्यास होणे आणि तेथील जनतेच्या ‘बोलीं’ची संशोधनाच्या संदर्भात सविस्तर मीमांसा होणे, म्हणजे एका अर्थाने भाषाविज्ञानास अथवा समाजभाषावैज्ञानिकांना नव-शब्दांचे ‘भांडार’ प्राप्त झाल्यासारखेच आहे. आठवडी बाजारांची विशेषतः काय? तर तेथे येणारे एकंदर बेपारी (व्यापारी) बहुभाषी, बहुप्रदेशी, बहुगावी किंवा बहुशहरी असतात.

बाजारात येणारा ग्राहकवर्गही त्या त्या व्यापाऱ्यांप्रमाणे ‘बहुभाषाविशेषी’ असाच असतो. मात्र बाजारांशी कृषीपरंपरा, खेडी, शेतकरी, मजूर, व्यावसायिक, श्रमकरी असा मुले-मुली, स्त्रिया, पुरुष यांचाही मोठा वाढता भरणा असतो. मग असा बाजार सोमवार ते सोमवार असा एक आठवडा व्यापून, शहरे- गावे बदलून भरतो. इथे होणारी मालांसोबत ‘बोलीभाषे’ची जी ‘उलाढाल’ होते ती अत्यंत जिवंत, प्रभावी, लयबद्ध, विविध गुणदर्शी, टवटवीत, परिणामलक्ष्यी अशी असते आणि नेमका हा ठळक गुणविशेष ‘बाजारबोली’त जाणवणारा असतो.

बाजारबोलीसंबंधी काही अगदी लक्षणीय नमुने उदाहरणादाखल पुढीलप्रमाणे उद्धृत करता येतील -

- ‘बाबा, काका, मामा बैंगनं केवढ्या पाव लावले?’

- आज औऱ्याच्या सेंग्या आनल्या नाहीत कानू?

- अवो, काकड्या तर कडूडक लागल्यायत?

- झाला का बजार? निंघाले का गावाकडं?

- आजच्या वारी का आन्लं इकायला?

- ढेम्सं, बोंडं कसे दिल्ले किल्लो?

- दाळी लै म्हाग हायीत; खायला परवडत नाही!

- अबाबाबाबा! तेलाचे भाव तर डळाभाळाला भिडलेत!

- स्त्रियांमधील एक संवाद -

‘दिस माळोत्याच्या आत येरवाळीच घराकडं निंघू आणि संगंमंगंच जाऊ!’

‘दर बुधवारी ह्यो मुतारा (मद्य) पेवूनच घरी येतू आणि सगळ्या घराला तरास होतू!’

‘हाब्रीट, कल्डी, माळवं इकलं की आपून संगमंगंच घराकडं निघू...’

हे एकंदर संवाद जनतेच्या ठेवणीतल्या भाषांना घेऊन येतात. खेड्यापाड्यांची बाया/ पुरुष मंडळी या प्रकारच्या संवादांतून बोलींचे बहुपदरी अनुभव बाजारांमधून देतात/ घेतात. वांग्यांऐवजी बैंगनं, कडूऐवजी कडूडक, बाजारऐवजी सरळ बजार, दिलपसंद फळभाजीला ढेम्सं आणि भेंडीला बोंडं, दारू- मद्याचा उल्लेख ‘मुतारा’ असा चीडोत्पन्न, म्हणजे नकारमूलक असा करण्यात येतो.

दारू पिणाऱ्या पतीबद्दल इथे स्त्री हा संतापजन्य असा उल्लेख करते, तो लक्षात घेण्यासारखा आहे. त्यामागे स्त्रीच्या छळाचा, वेदनादायक असाही पदर आढळतो. माल चढवणारा- उतरवणारा हमाल, चहा, भजी तळणारा आणि विकणारा मामू, धान्य विकणारी मावशी, मुलांची खेळणी विकणारा खेळिया, गूळ विकणारा गूळविक्या, सर्व प्रकारची तेलं विकणारा तेलबेपारी किंवा नित्य संसारोपयोगी वस्तू विकणारे कुंभार, लोहार, सुतार आणि गांवरहाटीमधील सर्व प्रकारचे कुशल कारागीर हे आठवडी बाजारात त्यांची भाषा आणि त्यांच्या आपल्या विक्रेय वस्तूंसह बसतात, व्यवहार चालवतात.

‘जनता आणि व्यापारी’ यांच्यात अखंडपणे चालणारी ही ‘खास अशी बाजारबोलीभाषा’ मोठी श्रवणीय, फारच अर्थवाहक प्रवाही अशीच भाषा असते.’’ अशा प्रकारची बोलभाषा रोजच्या गावभाषेत आढळत नाही. कारण आठवडे बाजारात येणारी ‘हिंडणारी- बोलणारी- देवघेव करणारी एकूण जनता’ रोज गावात कुठे असते? अशा बाजारबोलीत ऐकायला मिळणारे नवे/ वेगळे/ प्रभावक्षम/ रसरशीत शब्द कसे असतात ते पहा, त्याचेच काही दाखले- पास-औताला खाली आडवे लावावयाचे लोखंडी पाते; ज्यामुळे रानातली माती भुसभुशीत, मोकळी करता येते.

बोंडं- तळलेली गरमगरम भजी. ताग -अंबाडीची वाळलेली साल, ज्यूट. बरबटी - चवळीचे बी, डाळवर्गीय द्विदल धान्य. खुरपन- तण काढावयाचा लहान विळा. पहार = खोदावयाचे लांब भे लोखंडी जड हत्यार. मुचके =बैलांनी पीक खाऊ नये म्हणून विणलेले जाळीदार छोटे टोपलेवजा साधन. गुंजावळी =ज्वारीचा एक प्रकार. पिवळा = ज्वारीचा एक प्रकार. वारती = बैलगाडीचे जू बांधण्याचे चामडी दोर मजबूत.

बेलड्या =बैलगाडीच्या बैलांच्या गळ्याभोवती बांधावयाचा चामड्याचा ‘यू’ काराचा पट्टा. धांद = जूटपासून बनवलेला मोठा पीळदार दोर. उसऱ्या = वाळून बनवलेल्या फळभाज्यांच्या फोडी. शेन्न्या = गावरान, छोट्या, चवदार काकड्याच. संबार =हिरवी कोथिंबीर. करटुले = रान- फळभाजी. वाघाटं = रान- फळभाजी. घोळ = रानपालेभाजी/ पाचकपूरक असते. (त्यामुळे गावी तिला हागरी घोळ म्हणण्याचीही रीत आहे...)

बाजार हा रोजच्या गरजांशी जुडलेला असा असतो. वस्तू, फळ, धान्य, भाज्या, साधनं यांची बाजारांमध्ये सत्वर खरेदी विक्री होत रहाते. या सर्वांसमवेत एकंदर लोकांच्या जीभेवर असणारी बोलभाषापण प्रवाही- प्रसन्न राहिलेली पहायला मिळते. आठवडी बाजारामध्ये त्यामुळेच या ‘भाषांचे बहुपदरी’ रूप फार विलक्षण असते.

महत्त्वाचे म्हणजे लोकशाही मार्गाने भरणाऱ्या अशा बाजाराला जात- धर्म- पंथ- प्रांत- लिंग- वय- व्यवसाय यांचा ‘साचा’ मुळीच नसतो. हा बाजार सर्वांचा असतो. बाजारात ‘सर्व’ भाषा असतात. विविध बोलींचा मुक्त आढळ, ही बाजारांची ठळक ओळख असते. हीच ओळख भाषाशास्त्राला नवी रसद पुरविण्यास अगदी ‘आशयसंपन्न’ सहाय्य करते.

समूहांची भाषा म्हणून बाजारबोलींची गुणविशेषता तसेच गुणविविधता म्हणूनही व्यापक पद्धतीने स्पष्ट करता येणारी नक्कीच आहे. मोठा महिलावर्ग तर किती नव्या शब्दांसह बोलतो; जे अद्‍भूत ‘बोलणे’ श्रवणीय आणि आपल्या कानांवर कधी न पडलेले असते. अगणित वस्तूंची विक्री करणारे परिसरातील लहानमोठे गावव्यापारी हे त्यांच्या त्यांच्या व्यवसायजन्य अशा भाषेत बोलतात; तेव्हा त्या भाषेत केवढी तरी मिठास असते.

बाजारात, शेतकरी त्यांच्या कृषिनिष्ठ जाणिवाप्रवण बोलीभाषेत बोलतात. त्यांच्या भाषेतील/ बोलीतील शब्दांना, त्यांच्या वाक्यरचनांना, वस्तूपदार्थ नामोच्चारांना गावमातीचा, खास अशा श्रमसंस्कृतीचा ‘मृदगंध’ असतो. ही अशी जनतेचीच म्हणून असणारी ‘बाजारबोली’ ग्रामजीवनदर्शनासोबतच आणि ग्रामबोलीदर्शनही घडवते. ते दर्शन अफलातूनच शिवाय अचंबित करणारेही असते.

(लेखक ज्येष्ठ प्राध्यापक आणि महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे तज्ज्ञ सदस्य आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.